इरेना सेंडलर यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात. आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर.
इरेना सेंडलर. पोलंडमधील वॉर्सापासून साधारण पंधरा मैलांवरील ओटवाक गावात 15 फेब्रुवारी 1910 रोजी जन्म. वडील डॉक्टर. इरेना सात वर्षांची असताना एका साथीच्या रोगात त्यांचं निधन. दुसरं महायुद्ध. नाझींचा नंगानाच अनुभवलेल्या इरेना यांचं वॉर्सामध्ये 12 मे 2008 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झालं. काय विशेष आहे या माहितीत? कोण या इरेना? 97 वर्षं जगल्या हे महत्त्वाचं, की त्यांनी दुसरं महायुद्ध अनुभवलं, हे महत्त्वाचं? ऑस्कर शिंडलर आठवतोय? शिंडलर्स लिस्ट सिनेमा पाहिलाय? त्यावरचं पुस्तक वाचलंय? सिनेमा पाहिलेला नसला, पुस्तक वाचलेलं नसलं, तरी ज्यूंच्या वंशविच्छेदाविरोधात उभ्या राहिलेल्या, एक हजार ज्यूंचा जीव वाचविणाऱ्या शिंडलरला कधीतरी मनोमन सलाम केलेलाच असेल. नाझींच्या क्रूरतेमुळे अंगावर काटा उभा राहिला असेल. ज्यूंसाठी जीवही कळवळला असेल. इरेना सेंडलर आणि ऑस्कर शिंडलर यांच्यात आडनावाच्या उच्चारातील काहीशा साधर्म्याशिवाय काय साम्य आहे?
मोठं आणि महत्त्वाचं साम्य आहे. शिंडलर यांच्याप्रमाणे इरेना यांनीही त्याच काळात थोड्याथोडक्या नाही, तर 2,500 ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून सोडवलं. हा आकडा चुकीचा वाटेल कदाचित. सुरवातीला कोणाचीही हीच प्रतिक्रिया होते. इरेना यांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतील इतिहास विषयाच्या चार विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिकेचीही हीच प्रतिक्रिया होती. 250 मुलं असावीत, असा त्यांचा अंदाज होता; पण इरेना हे व्यक्तिमत्त्व अशा साऱ्या अंदाजांना छेद देऊन, अनेक क्रिया-प्रतिक्रिया, अंदाज यांना मागे सारत इतकं उंच उभं राहतं, की भारावलेले आपण नतमस्तक होणंही क्षणभर विसरून जातो. इरेना एवढ्या मोठ्या होत्या, तर त्यांची माहिती कशी नाही? त्यांचं नावही कधी कानावर पडलेलं नाही. असं कसं?
इथेच इरेना आपल्या समजुतींना पहिला छेद देतात. तशी इस्राईलच्या याद वाशेम या संस्थेनं "राइट्स अमंग द नेशन्स' (सर्व देशांतील सर्वोत्तम) हा सर्वोच्च सन्मान देऊन 1965 मध्येच कृतज्ञता व्यक्त केली होती. पोलंड देशाचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या "व्हाइट ईगल'नंही त्या 2003 मध्येच सन्मानित झाल्या होत्या. त्याच वर्षी शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकासाठी पोलंड सरकारनं त्यांचं नामांकन केलं होतं. एवढं झालं, तरी त्यांची बाहेरच्या जगाला अजूनही फारशी माहिती नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांना त्यांची थोडीफार ओळख 1999 नंतर होत गेली. अमेरिकेतील पिट्सबर्ग, कनास येथील एका शाळेतील काही मुलींना "इतिहास दिवसा'साठी एक नाटुकलं सादर करायचं होतं. कोणती व्यक्तिरेखा निवडू या, काय करू या, अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या शिक्षिका नॉम कॉनार्ड यांच्या हाती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी लागली. ती बातमी होती इरेना सेंडलर यांच्याविषयी. "द अदर शिंडलर्स' या नावानं ही बातमी होती. त्यात इरेना यांच्यावर एक परिच्छेद होता. त्यामध्ये त्यांनी वॉर्सा घेटोमधून 2,500 मुलांना वाचविलं, असा उल्लेख होता. या मंडळींनी आणखी संशोधन करायचं ठरवलं. एक तर ती बातमी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे पोलंडमध्ये माहितीविषयी चाचपणी सुरू झाली. त्यांचं थडगं कुठे आहे, अशीही विचारणा करून झाली. मिळालेली माहिती उत्साह वाढविणारी आणि तेवढीच आश्चर्यकारक होती. इरेना सेंडलर अजूनही हयात आहेत. त्या पोलंडमध्येच, अगदी वॉर्सामध्येच राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2,500 हा आकडा अगदी बरोबर आहे. या मुलींचा आनंद गगनात मावेना. त्यांनी इरेना यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांच्याकडून माहिती मिळवली. अर्थात मिळालेली माहिती खूप कमी असली, तरी 10 मिनिटांच्या नाटिकेसाठी पुरेशी होती. स्वतःविषयी, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी बोलायला इरेना स्वतःच नाखूष होत्या, ही धक्कादायकच बाब होती.
आपण केलेल्या या मोठ्या कामाची माहिती इरेना यांनी कधीच कोणालाही सांगितली नाही. "राइट्स अमंग द नेशन्स' आणि व्हाइट ईगल असे मानाचे पुरस्कार मिळूनही त्या जगासाठी अनोळखी होत्या, याचं कारण हेच आहे. पण ही ओळख झाली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानं जगाला विनाश, क्रूरता, वंशविच्छेद, विध्वंस यासारख्या मानवी मनाच्या काळ्या बाजू दाखविल्या. माणूस किती पातळीपर्यंत हीन होऊ शकतो, तो किती क्रूर असू शकतो, याची उदाहरणं दिली. पण त्याच महायुद्धानं ऑस्कर शिंडलर, इरेना सेंडलर, फ्रान्समध्ये असणाऱ्या बुद्धिमंत आणि कलाकार ज्यूंना वाचविणारी मेरी जेन गोल्ड ही अमेरिकन महिला, हंगेरीतील जॉर्जिओ पेर्लास्का अशी माणसंही दिली. नाझींच्या ताब्यात जाऊनही आपल्या देशातील ज्यूंना छळछावणीत पाठवू न देणारं, त्यांना संरक्षण देण्यासाठी धडपडणारं, अगदीच अवघड परिस्थिती निर्माण झाल्यावर साऱ्या ज्यूंना पळून जाण्यास मदत करणारं आणि युद्ध संपल्यावर त्यांचं आनंदानं स्वागत करणारं डेन्मार्कसारखं राष्ट्रही याच युद्धात जगानं पाहिलं. होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद हा मानवी इतिहासातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. महायुद्ध संपून आज सत्तर वर्षं होत आली, तरी या जखमा काही भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकीही असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो, तो हाच असतो.
घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्यांत काही स्त्रियाही होत्या, लहान लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणाऱ्यांतही काही स्त्रिया होत्या, आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडविणारी, मायेची पखरण करणारी इरेना नावाची एक आईही होती. मारणाऱ्यापेक्षा वाचविणारा नेहमीच श्रेष्ठ असतो, हे वाक्य आपण साऱ्यांनीच कधी ना कधी, कुठे ना कुठे वाचलेलं, ऐकलेलं असतं. त्याची यथार्थता इरेना यांच्या कहाणीत दिसते. इरेना यांचा विचार करायचा तो यासाठीही.
"अणुरेणुया थोकडा, तुका आभाळाएवढा,' संत तुकाराम महाराजांचं हे वचन या साऱ्या कालावधीत ठसठशीतपणे सामोरं येतं. मानवी मनाच्या या दोन अवस्था या कालावधीचा विचार करताना प्रकर्षानं जाणवतात. स्वतःच्या मुलाबाळांची, घरातील वडीलधाऱ्यांची अगदी मनापासून काळजी घेणारा एक माणूस दुसऱ्याबाबत कल्पनातीत क्रूर होऊ शकतो, हे इथंच तर दिसतं. आपल्या बाळाला साधा ठसका लागला, तर धावाधाव करणारा एक डॉक्टरी पेशाचा माणूस केवळ ज्यू आहेत, या कारणासाठी लहान लहान मुलांवर विविध प्रयोग करतो, त्यांचा "गिनिपिग' म्हणून वापर करतो, तोही कोणत्याही प्रकारची भूलही न देता, या क्रूरतेला काय म्हणावं? घरातील ज्येष्ठांचा आदरसत्कार करणारा एखादा अधिकारी केवळ धर्म ज्यू आहे म्हणून एखाद्या आजोबांची दाढी हिसडून काढतो. वेदनेनं कळवळले, या "गुन्ह्या'ची शिक्षा म्हणून बेदम मारहाण करतो. मजा म्हणून संगिनीच्या धाकानं एका आजीबाईंना भर रस्त्यात नाचायला लावलं जातं. आपल्या बाळाला फुलासारखं जपणारा एक सैनिक एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतो, उंच उडवतो आणि दुसरा सैनिक त्या उडवलेल्या बाळावर गोळी झाडतो आणि या नेमबाजीचं बाकीचे कौतुक करतात, या साऱ्याची संगती लावायची तरी कशी? अणूपेक्षा लहान, कोतं आणि क्रूर मन वेगळं काय असणार?
हे सारं पाहून दुसरी एक स्त्री कळवळते. तिचं कळवळणं घरापुरतंच मर्यादित राहत नाही. काहीतरी केलं पाहिजे, कोणीतरी पुढं झालं पाहिजे, अशी फक्त दिवाणखान्यापुरती चर्चा राहत नाही. ती स्वतः पुढं होते. वॉर्सामधील ज्यूंसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या एका संघटनेसाठी काम करू लागते. लहान लहान मुलांना त्या घेटोतून बाहेर काढण्याचं, त्यांचा जीव वाचविण्याचं स्वप्न पाहते; ते प्रत्यक्षातही आणते. काम करताना पकडली जाते. प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सोसते. आपण बोललो तर आतापर्यंत वाचविलेली मुलं आणि त्यांना आश्रय देणाऱ्या शेकडो, हजारो पोलिश कुटुंबांवर नाझी अत्याचारांचा नांगर फिरेल, याची तिला जाणीव असते. हजारोंचा जीव, का एक जीव... तिच्यासमोर अगदी साधा, सरळ प्रश्न असतो. ती त्या एका जिवाची निवड करते. तो जीव तिचा स्वतःचा असतो, तरीही! इतका छळ सोसूनही ती तोंड उघडत नाही, हे पाहून संतापलेले नाझी तिला मृत्युदंड फर्मावतात. बातमी समजल्यावर ती गुप्त संघटना तातडीनं हालचाली करते आणि गोळ्या घालण्याआधी काही मिनिटं तिची सुटका होते. तिला मृत्युदंड देण्यात आला, अशी बातमी सगळीकडे पसरते. त्या संघटनेला ती सापडते ती एका निर्जन स्थळी, तीही बेशुद्ध आणि हातापायांची हाडं तुटलेलया अवस्थेत. संघटना काळजी घेते. ती बरी होते आणि युद्ध संपेपर्यंत लपून राहून काम करतच राहते. "आकाशाएवढा...' हे याहून वेगळं असतं? त्या तरुण मुलीचं नाव होतं इरेना सेंडलर.
पण तिची कहाणी, तिचं काम इथंच थांबत नाही. युद्ध संपल्यानंतर स्वतःकडची यादी बाहेर काढून त्या वाचविलेल्या ज्यू बाळांना त्यांची ओळख मिळवून देण्याचं काम ती त्या संघटनेमार्फत करत राहते. अडीच हजार मुलांपैकी चारशे मुलांचा शोध लागत नाही, म्हणून हळहळत राहते. तिचं पोलंडच्या संसदेत कौतुक झालं, मानसन्मान मिळाले, तरी "मी काहीच विशेष केलं नाही,' या मतावर ती ठाम राहते. "आम ्ही तीस जण हे काम करत होतो. कौतुक साऱ्यांचंच आहे. आमच्या एका सहकाऱ्यानं मृत्युदंड स्वीकारला आहे. मी हयात आहे, म्हणून हा मान मला मिळतो,' असं तिला प्रामाणिकपणे वाटत राहतं. पोलंडच्या पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना ती म्हणते, "आपण सारेच या भूतलावर काही ना काही कारणासाठी जन्माला येतो. मी जे केलं असं सांगण्यात येतंय, कदाचित माझ्या जन्माला येण्यामागे तेच कारण असेल...' इरेना यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. तेथून पुढे वयाच्या सत्याण्णवाव्या वर्षापर्यंतचं त्यांचं साधं, निर्व्याज आणि निगर्वी जीवन पाहून कोणती उपमा देणार? त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात.
आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर. सामान्यांना धीर देतात ही माणसं. अन्यथा लाखो ज्यूंचं शिरकाण करणारा हिटलर, मुसोलिनी, आताचा ओसामा बिन लादेन ते आपल्या गावात, शहरात खून पाडणारा एखादा पिसाट खुनी, गावगुंड यांच्या गर्दीत आपण सारे हरवून गेलो असतो. कदाचित त्यांचे गुलाम बनून राहिलो असतो. प्रसंगी आपणही प्रतिकार करू शकू, असं आपल्याही अंतर्मनात कुठेतरी वाटत असतं, त्याचं कारण इरेना यांच्यासारखी माणसं असतात. माणसातले पशू अशाच माणसांना घाबरून असतात. सामान्यांची असामान्य शक्ती त्यांना ठाऊक असते. आपल्याला मात्र नसते, हेच तर दुर्दैव.
(माझ्याच आगामी पुस्तकातून)