मराठी ब्लाॅगर्स हो... नक्की वाचा...

Posted by Abhijit at 11:53 PM

Friday, August 27, 2010

नमस्कार,

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ब्लॉगींग हा प्रकार चांगला स्थिरावला आहे. रोज नव्या नव्या ब्लॉगची भर मराठीतही पडते आहे. ब्लॉगवर तयार होणाऱया आशयाची सुरक्षितता (कन्टेन्ट सेफ्टी) आणि त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील ब्लॉगर्सची तज्ज्ञांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे.

यामध्ये कॉपीराईट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आणि सायबर क्राईम या तीन विषयांतील तीन तज्ज्ञ ब्लॉगर्सना मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर आणि जळगाव या नऊ ठिकाणी सकाळ माध्यम समुहाच्या मुख्य कार्यालयांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठी ब्लॉगर्सना यामध्ये भाग घेता येईल.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे दोन उद्देश आहेत:
१. ब्लॉगर्सना व्यावसायिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
२. ब्लॉगर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रित जोडणे

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तारीख शनिवार, चार सप्टेंबर २०१० आणि वेळ संध्याकाळी चार ते सहा अशी आहे.

आपल्यापैकी ज्यांना या विषयात रस आहे, त्यांनी आपली उपलब्धता पुढील दोन ई मेल्सवर तातडीने कळवावी, ही विनंती. आपले नाव, ई मेल, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि ब्लॉगचे नाव या पाच गोष्टींचा आपल्या ई मेलमध्ये समावेश करावा. मोबाईल नंबर आवश्यक. त्यामुळे एेनवेळच्या सूचना एमएसएसद्वारे कळविता येतील.

(व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सदस्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे कृपया आपली उपलब्धतता लवकरात लवकर कळवावी.)

उपलब्धता कळविण्यासाठी ई मेल:
(Subject मध्ये VC असे जरूर लिहा. अन्यथा ई मेल ओळखण्यास वेळ लागू शकेल.)
अभिजित थिटे - abhijit.thite@esakal.com
सम्राट फडणीस - samrat.phadnis@esakal.com

बडबड…

Posted by Abhijit at 3:45 AM

Saturday, March 21, 2009

भावलेलं, आवडलेलं आणि इतरांनाही ऐकवावंसं वाटलेलं इतके दिवस मनातच राहात होतं. शक्‍य तेवढ्या मित्रांपर्यंत पोचवत होतो. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवं, म्हणून हा प्रयत्न… बडबड…

बडबड सुरू केली खरी… पण सुरवात कुठून करावी, या विचारात होतो… अचानक ट्यूब पेटली. स्वत:चं काहीतरी टाकण्यापेक्षा पु.लं.च्या कथाकथनानं सुरवात केली तर… म्हणून हा पहिला पॉडकास्ट पुलंचा… म्हैस या कथेचा… मला ही कथा प्रचंड आवडते. मी ती कितीदा ऐकली असेल, याला सुमारच नाही. काही गोष्टी कालानुरूप कंटाळवाण्या किंवा रिलेटेड वाटत नाहीत. या कथेचं तसं नाही… मी स्वत: फारसा कोकणात गेलेलो नाही किंवा तिथं एसटीनं प्रवासही केलेला नाही. तरीदेखील ही कथा आपली वाटते, भुरळ घालते…

अधेमधे माझ्या या नव्या उद्योगाला भेट द्यायलाही विसरू नका...



इफ यू कम टुडे

Posted by Abhijit at 3:25 AM

Friday, March 20, 2009

खरं तर ही पोस्ट मी ढापली आहे... सकाळी मराठी ब्लॉग्जवर सर्च मारत होतो, तेव्हा बाष्कळ बडबडकारांनी टाकलेली पोस्ट नजरेस आली. त्यात त्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्‍नांमध्ये या व्हिडिओ क्‍लिपची लिंक होती. ती पाहिली आणि काही सुचलंच नाही... भन्नाट, तुफान, कुत्र्यासारखं असं बरंच काहीतरी झालं... काय झालं ते असं शब्दात सांगता येत नाही... त्यामुळे हा मार्ग काढला. जे आपल्याला वाटतंय ते इतरांनाही वाटलंच पाहिजे... अशी प्रामाणिक म्हणा किंवा इतर कोणती म्हणा इच्छा निर्माण झाल्यामुळे ती व्हिडिओ क्‍लिप इथे टाकतो आहे...
पाहा... आनंदी व्हा... खूष व्हा...

सॉरी हृषिराज

Posted by Abhijit at 3:48 AM

Thursday, March 12, 2009

सतरा वर्षे उलटून गेली या गोष्टीला... मी नववीत किंवा दहावीत असेन. शाळेतला माझा एक जिगरी दोस्त होता. हृषिराज त्याचं नाव. राहायचाही माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये... शाळा एक, क्‍लास एक, रोजचा अभ्यास एकत्र... जाम धमाल करायचो आम्ही... शाळेत प्रत्येक मधल्या सुटीमध्ये मारामारी करणं, त्या सुटीएवढंच महत्त्वाचं होतं आमच्यासाठी...
एक दिवस काय झालं समजलं नाही. कोणत्यातरी गोष्टीवरून आमची भांडणं झाली. भांडणाचं कारण आता काही आठवत नाही; पण त्या भांडणानंतर आम्ही एकमेकांशी बोलणं सोडलं... रोज एकत्र असणारे आम्ही आता एकमेकांकडे बघेनासे झालो. आता समोरासमोरच राहात असल्यामुळे एकमेकांना दिसायचो; पण बघितलं-न बघितल्यासारखं करून निघून जायचो.
पुढे शाळा संपली. कॉलेज सुरू झालं... मग सगळंच बदलून गेलं. एकमेकांची आठवणही पुसट होत गेली... परवा परवा अचानकच हृषिराज ऑर्कुटवर दिसला. एकदम साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. न राहवून त्याला एक स्क्रॅप टाकला आणि फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली... अपेक्षेप्रमाणं त्यानं ती मान्य केली आणि माझ्या स्क्रॅपला उत्तरही पाठवलं... "अभिजित तुला पाहून आनंद झाला. जवळजवळ सतरा वर्षे झाली असतील, आपण भेटलेल्याला. आपल्या भांडणाबद्दल सॉरी... इतक्‍या वर्षांनी का होईना; पण सॉरी म्हणता आलं, हेच खूप बरं वाटतंय. माझ्या मित्रांपैकी फक्त तूच एकटा तुटला होतास, म्हणून खूप वाईट वाटायचं...'
सॉरी... तो सॉरी आत खोल कुठेतरी घाव करून गेला... त्या वेळचं ते मला आता न आठवणारं भांडण... एखाद्याच्या उरी एवढं सलत असेल... असतंच म्हणा... ज्याचे त्याचे घाव ज्याला त्याला ठाऊक... माझा त्याच शाळेतला एक मित्र आहे उपेंद्र म्हणून. त्याच्या जी टॉकचा स्टेटस मेसेज खूप छान आहे, "मैत्री आणि वैर दोन्ही बाजूने जपले, तर वाढतच जाते...'
आमची मैत्री छान होती. आम्ही भांडणही छान वाढवलं. अगदी सतरा वर्षांपर्यंत! खरंतर ते भांडण तिथेच संपायलाही हरकत नव्हती. कदाचित तेव्हा भावना तीव्र असतील; पण नंतर? ते काही जमलं नाही... अर्थात इतकी वर्षं भांडण वाढवत होतो किंवा तो राग मनात होता, असं नाही; पण भेट घडत नव्हती, एकमेकांचा पत्ता लागत नव्हता, जो तो आपापल्या नोकरी-व्यवसायात, घर-संसारात अडकला होता, हेच खरं...
आज तर भेट झाली ना? भेट झाली आणि दोन्ही बाजूनं हात पुढे आले, हे महत्त्वाचं. शेवटी आपली कमाई असते तरी कोणती? हीच की! मी काय किंवा हृषिराज काय... कुठेतरी अबोला संपला, पुन्हा बोलणं झालं हे महत्त्वाचं. आता ओघानं बोलणं वाढत जाईल, पुढे बोलणं थांबून संवाद सुरू होईल, हेही तेवढंच खरं...
हे असंच व्हायला पाहिजे नाही... परवा हृषिराजच्या निमित्तानं मी हेच तपासून पाहात होतो. असा किती ठिकाणी पूल तुटलाय ते... प्रत्येक वेळी भांडण व्हावं लागतं किंवा काहीतरी घडावं लागतं असं नाही, तर कधीकधी उलटती वर्षं, बदलणारे दिवसही कारणीभूत ठरतात.
काही दिवसांपूर्वीच आम्ही रमणबागेतले, 1992 मध्ये बाहेर पडलेले, तब्बल सतरा वर्षांपूर्वी वेगवेगळ्या वाटांनी गेलेले विद्यार्थी एकत्र भेटलो. सगळ्यांनी मिळून जाम धमाल केली... आम्ही सारे सतरा वर्षे कुठं होतो? एकेकाळी एकत्र डबा खाणारे, दिवसातले आठ तास एकत्र असणारे मित्र अचानक दूर कसे गेलो? मधली सतरा वर्षं कुठे हरवली?
वाट हरवली नाही, ती धूसर झाली. कॉलेजच्या निमित्तानं वाटा बदलल्या, पुढे करिअर, लग्न या साऱ्या गदारोळात ती लपली एवढंच... कॉलेजच्या मित्रांचं असं होत नाही. त्यांची संगत कॉलेज संपल्यानंतर सुटत नाही. ते बऱ्याचदा एकत्र राहतात...
असो, तर मी तुटलेल्या पुलांबद्दल बोलत होतो... नोकरीनिमित्त झालेल्या भ्रमंतीत काही ठिकाणी सूर जुळले, काही ठिकाणी मैत्री जमली, ऋणानुबंध जमले... काही टिकले, काही ठिकाणी विस्मृतीत गेले... आता ते धागेही पुन्हा जोडायला हवेत...
हे सारं आवर्जून नाही केलं तर कधीच होणार नाही... हृषिराजशी मी याआधीही बोलू शकत होतोच ना? तो कुठे आहे, काय करतो, हे शोधणं आजच्या एवढं सोपं नसलं, तरी अशक्‍यही नव्हतं... पण लक्षात आलं नाही... आता मात्र असं करून चालणार नाही... मला वाटतं आपल्या प्रत्येकाचेच कुठेतरी हरवलेले सूर असतात... काही प्रसंग असतील, तर काही माणसं! तर ती शोधायला हवीत. नाती पुन्हा जोडायला हवीत. धागे पुन्हा जुळायला हवेत.
उशीर झालाय; पण काहीच न होण्यापेक्षा उशीर परवडला... तरीदेखील चूक झाली ती झालीच...
सॉरी हृषिराज...

रमणबाग 1992 : 10 वी अ...

Posted by Abhijit at 1:02 AM

Monday, March 9, 2009

सतरा वर्षे झाली. साधारण हाच महिना किंवा थोडं अलिकडे पलिकडे... दहावी अ चा सेंडॉफ (आम्ही असंच म्हणायचो!) झाला. पुढे परीक्षा... त्यानंतर रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो, तो शेवटचा. त्यानंतर एखादा कार्यक्रम आणि सवाई याशिवाय शाळेत गेलोच नाही. कधीकधी त्या रस्त्यावरून जाताना "माझी शाळा...' एवढा एक उल्लेख! एवढ्या पटकन नातं तुटतं? पाचवी ते दहावी अशी पाच वर्ष काढली त्या शाळेत. त्या काळात शाळा हेच सर्वस्व होतं... दिवसाची सुरवात शाळेपासून व्हायची आणि शेवटही! तेव्हाचं, त्या वयात जेवढं काही विश्‍व होतं, त्यातील बहुतेक भाग शाळेनंच तर व्यापला होता...
तर ज्या शाळेनं विश्‍व व्यापलं होतं, तिची ही कथा, तर तेव्हाच्या जानी दोस्तांची काय कथा? शाळा संपल्यावर कॉलेजात साऱ्यांच्या वाटा बदलल्या आणि बदलूनच गेल्या... रोज कोंडाळं करून डबा खाणारे, आपल्या डब्यातलं दुसऱ्याला देणारे दोस्त गायबच झाले! कुठे गेले कोणास ठाऊक... अधेमधे कधीतरी एखादा भेटायचा तेवढंच... तेव्हा, तू काय करतोस? सध्या कुठे आहेस? जुनं कोणी भेटतं का? या तीन प्रश्‍नांच्या पुढे काही गाडी जायची नाही... एका खाणीतले काही दगड काही काळ एकत्र होते... नंतर वेगवेगळ्या बांधकामांवर गेले...!!
आज हे सारं अचानक बडबडायचं कारण म्हणजे परवा, शनिवारी आम्ही रमणबागेतले 14 मित्र भेटलो. सगळं क्रेडिट ऑर्कुटचं... च्यायला कोण कुठला ऑर्कुट, कुठल्या गूगल नावाच्या कंपनीत कामाला लागला. त्यानं हे नवं विश्‍व तयार केलं. आणि पुण्यातल्या एका शाळेतले 14 मित्र एकत्र आणायला कारणीभूत ठरला!!!
सतरा वर्षांपूर्वी लांब गेलेले मित्र एकत्र आले... जमले ते एकमेकांकडे डोळे बारीक करून पाहात... तू थिटे ना? तू ढोबळे ना? अरे जोश्‍या तसाच आहेस की अजून... अरे हा वाघचौरे... दुसरा कुठंय (हे वाघचौरे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकाच वर्गात!) ते जाऊ दे, तू अजय की विजय ते सांग आधी... अरे माम्या आला... ढेऱ्या केवढा बदललास... विसाळ... देशपांडेंची बातमी ऐकली आणि तुझी आठवण आली... (हा विसाळ शाळेत असताना "वऱ्हाड निघालंय लंडनला...' करून दाखवायचा) ओळख परेड संपली आणि सुरू झाली धमाल... ते चार-पाच तास कसे गेले समजलंच नाही... आता पुन्हा एकदा एकत्र भेटायचं ठरलंय... त्याआधी उरलेल्या वर्गाला एकत्र आणायचं आहे... पाहू पुढच्या वेळी किती जमतात ते...
मुद्दा या पार्टीचा नाही... सगळे भेटले याचा आनंद आहेच; पण मधली वर्षं गेली कुठे हा महत्त्वाचा मुद्दा आहे... अशा कितीतरी गोष्टी आपल्या हातातून निसटून जात असतात. जरा विचार केला, तर लक्षात येतं... अरे एकेकाळी खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतरानं हरवूनच गेल्या की... काहीवेळा वयामुळे फरक पडतो, काहीवेळा अनुभवामुळे... पण गंमत म्हणून... त्या काळाची आठवण म्हणून तरी त्या शोधायला काय हरकत आहे...
विषय शाळेवरून सुरू झाला असला, तरी तो बराच मोठाय नाही! खरंच कधीतरी स्वत:साठी वेळ काढावा आणि गेल्या काही वर्षांत आपण काय काय मागेच ठेवलंय, काय काय विसरून गेलंय आणि काय काय हरवलंय याचा हिशेब मांडायला हरकत नाही... अगदी व्यावहारिक विचार केला, तरी तो फायद्याचा ठरेल हे नक्की!

Remembering the Holocaust…

Posted by Abhijit at 3:45 AM

Wednesday, January 28, 2009

या आधीच प्रसिद्ध झालेल्या माझ्या "एका वंशसंहाराची स्मृती' या लेखाचे माझा मित्र गणेश कुलकर्णी याने इंग्लिशमध्ये भाषांतर केले. तोदेखील येथे प्रसिद्ध करतो आहे.

Undoubtedly, the only event which has caught imagination of three generations, all over the world is the Second World War. Is ‘the-fantastical-war-stories’ the only reason for this universal interest? Definitely not. If that were the case, equally large quantum of literature would have been written on many wars that have been fought before and after World War II (WWII) – which is not the case. Main point of interest in WWII is human emotions. The extent of human bravery, mistakes, the dark & evil side, and most importantly the genocide of Jews – the holocaust – all these things are now etched permanently on public memory.

Writing about this subject is not without reason. All these things come to mind because, this Tuesday, on 27th January, world will be commemorating United Nations’ Holocaust Memorial Day.

A lot may think, why to celebrate these kind of days? The thing that had happened is now past; what is the point in bringing the memories up year after year? Basically, what purpose is this going to serve by remembering the mistakes which somebody else committed in past? Need we do all this at all? The answer to all this is a big ‘Yes’.

Why do we revel sweet memories? Why yesterday’s success remains fresh in heart even today? This happens because such things bring happiness to our lives, they teach us something. By the same scale, we should also take bitter memories seriously.

These memories teach us

How beastly a human being can become is shown by the holocausts that happened during WWII. It is possible that a human being roots for termination of a whole race, acts on the desire, and in that state of mania kills millions of people even without excepting children and elderly people – this truth comes afore only due to these memories. Even small mistakes – like those made by Britain, France, Russia etc. – meant death for thousands of innocent people. How the extreme hatred in heart of a man with absolute power can cause mayhem was also seen during this war.

The episodes of genocide have happened before WWII and even after it. Though the targets, medium, and leaders were different each time, nothing in human history can equal Holocaust that happened during the great war.

A study in human behaviour

Remembering all this is not brooding over past. This actually is a research – a study in human nature. How extreme can the goodness and evilness in our minds can become is the subject of this study. Human being is actually the most dangerous and most caring animal at the same time.

‘Hate’ is exclusive to humans. Other animals do fight, they also gauge the opponents. Sometimes the issue for them is of prey and sometimes it is of winning the ‘female’. But the fight ends when one of them wins. That is not the case with us humans. We can nurture the vengeance and hatred for generations. The hate goes on increasing as the time passes. Hitler is a glaring example of this extreme hatred.

On the other side, human being also has a sense of caring and morality that no other animal has. At times human can risk his own life to save others. There are a lot of such examples even in the war. Irena Sendler and Oskar Schindler have proved this good side of a human being to whole world. When there is darkness all over and not a single ray of hope, people like these come forward. The light they bring, howsoever dim, is priceless in such conditions. It gives assurance to people running away from darkness; It gives them hope about the new dawn just hours away.

Why should we study history?

Many people study most bloody episodes of history for different reasons. I look at all this as a way of becoming wiser. I feel that our attitude towards history is a faulty one. We either deify the historical events, squabble over the facts, or choose to be completely ignorant of the history. Nobody cares looking at it from angle of human feelings and emotions. We do not learn from history and keep on repeating same mistakes again and again.

The historical figures tell us not to act in a certain way, and also give us strength and hope to fight injustice and cruelty. Extreme hatred and cruelty are not improbable, and in the same fashion, strength of standing tall against injustice is also not hard to find. This rule in history has been proved again and again. As the perpetrators do not care about the effects of their hatred, the people who stand against it also do not fear of the consequences of their resistance.

The revolutionaries in India who fought against oppressive British rule were not afraid of death. They died with a smile on their lips for justice and motherland. Many sages from ancient India had the strength to pronounce death and decay for the most unjust and cruel kings of their times. All these are of the same league. These are the people who have made our lives livable, have provided us strength. The strength of standing against injustice comes to some in their childhoods and to some, like the prince Prahlad, it comes from within.

Past - for Future

It is heartening to learn that there will always be some Oskar Schindlers and Irena Sendlers, whenever there will be some Hitler in future. We are currently agitated by the financial turmoil and its effects. World recession is very eminent now. However, when we think about what people have suffered during the WWII and the holocaust, and how they survived all the travails, we understand that what we are experiencing is nothing compared to what they have gone through.

Past is past and we need to look ahead. But the way to future is shaped by the past. When we read about holocaust, we stop being afraid of bad things happening around us, we get assured that good will finally win over evil. We get inspiration and strength to swim through battles in our daily lives. And this is the outcome of knowing about good stories from past.

Abhijit Thite


एका वंशसंहाराची स्मृती

Posted by Abhijit at 9:43 PM

Friday, January 23, 2009

दुसरं महायुद्ध हे अनेक गोष्टींमुळे लक्षात राहतं; पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो ज्यूंच्या वंशसंहाराचा! या साऱ्या कालखंडाचा उल्लेख करायचा झाला, तर तो "न भूतो न भविष्यती' असाच करावा लागेल. सुमारे साठ लाख माणसांची या कालखंडात हत्या झाली. ती हत्या त्या माणसांची, त्या एका वंशाची नव्हती, तर माणुसकीचीच होती. त्या कथा वाचताना आजही अंगावर काटा उभा राहतो.

मा गच्या दोन आणि आजची एक अशा तीनही पिढ्यांना साद घालणारा विषय कोणता, या प्रश्‍नाचं उत्तर नक्कीच दुसरं महायुद्ध हे असेल. "युद्धस्य कथा रम्यः' याच न्यायानं हा विषय साद घालतो का? निश्‍चितच नाही. तसं असतं, तर आजपर्यंत झालेल्या युद्धांवरही भरपूर पुस्तकं लिहिली गेली असती आणि वाचली गेली असती. तसं घडताना दिसत नाही. मानवी भावभावना, हा यातील कळीचा मुद्दा आहे. दुसरं महायुद्ध, त्यातील पराक्रम, चुका, त्यात दिसलेलं क्रौर्य, चमकून गेलेलं धैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यू समाजाचा झालेला वंशसंहार या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
हा विषय आत्ताच लिहिण्यामागं एक कारण आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 27 जानेवारीला "होलोकास्ट' (वंशसंहार) स्मृतिदिन पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिवस पाळला जातो.
काही वेळा मनात विचार येतो, की हे असे दिवस का पाळायचे? झाली घटना होऊन गेली. पुनःपुन्हा त्याची आठवण काढून काय साध्य होणार आहे? मुळात काही जणांच्या चुका, घडून गेलेल्या गोष्टी परत का उगाळायच्या? हे सारं केलंच पाहिजे का?
यावर उत्तर आहे, केलंच पाहिजे! आपण चांगल्या स्मृती का जपतो? एखाद्या यशाची आठवण मनामध्ये कायम ताजी का असते? तर या गोष्टी आपल्याला आनंद देतात, काहीतरी शिकवतात म्हणून. त्याच न्यायानं अशा कटू स्मृतीही जपल्या पाहिजेत. माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, किती क्रूर होऊ शकतो, हे या वंशसंहाराच्या आठवणींतून समजतं. एखादा वंश संपवून टाकायची इच्छा माणूस मनात धरू शकतो. त्यानुसार वागू शकतो. त्या वेडाच्या भरात लाखो लोकांचं शिरकाण करू शकतो, लहान मुलं-वृद्ध यांच्याकडे पाहूनही त्याला पाझर फुटत नाही, हे सत्य त्यामुळे तर समाजासमोर येतं.

या आठवणी आपल्यासाठीच
वंशसंहार दिनाचाच विचार करायचा, तर आपल्यातील क्रूरता आपल्यालाच दिसावी आणि त्यातून आपल्यात बदल व्हावा, हेच त्याचं साध्य आहे. वंशसंहाराचे प्रयत्न त्यापूर्वीही झाले होते आणि नंतरही होत राहिले. त्याची माध्यमं वेगळी होती, नेते वेगळे होते; परंतु ज्यूंच्या वंशसंहाराएवढा भीषण प्रकार आजपर्यंत कधीही झालेला नाही. माणसाची सारीच्या सारी रूपं या कालखंडात पाहायला मिळतात. लहानशा चुकीमुळेही मोठी घटना घडू शकते, मोठं नुकसान होऊ शकतं हेही याच कालखंडात दिसून येतं. ब्रिटन, फ्रान्स, पोलंड आणि रशिया यांनी केलेल्या लहान-लहान चुका लाखोंच्या जिवावर बेतल्या. हाती बेलगाम सत्ता असणाऱ्यांच्या मनातील द्वेष, टोकाचा द्वेष किती मोठा संहार घडवू शकतो, हेही यातूनच दिसलं.

मानवी स्वभावाचा अभ्यास
या आठवणी म्हणजे दु:ख उगाळणं नाही. हा अभ्यास आहे. मानवी स्वभावाला जाणून घेण्याचा अभ्यास. आपल्यातील सुष्टता आणि दुष्टता या दोन्ही अगदी विरुद्ध भावना किती टोकाच्या असू शकतात, याचा अभ्यास. जगातील सगळ्यात धोकादायक आणि सहृदय प्राणी मानवच आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या मनात द्वेष ही भावना नसते. त्यांच्यात काही कारणांमुळे भांडणं होतात, झटापटी होतात, शक्तिपरीक्षण होतं. काही वेळा मुद्दा भक्ष्य मिळविण्याचा असतो, तर काही वेळा मादी; पण एकाचा जय झाला, की विषय संपतो, वैर संपतं. माणूस मात्र डूख धरून राहतो. तो त्याला राग आला म्हणून अनेकांच्या जिवावर उठू शकतो. तो पिढ्यान्‌ पिढ्या राग बाळगू शकतो. माणसांबरोबर वैर संपत नाही, उलट ते वाढतंच राहतं. हिटलर अशा क्रौर्याचंच तर उदाहरण आहे.
हाच माणूस तेवढाच सहृदयही आहे. तो स्वतःच्या जिवाचा विचार न करता इतरांसाठी काम करू शकतो. दुसऱ्या कोणासाठी तरी तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्याही प्राणांची बाजी लावू शकतो. अशी उदाहरणंही याच इतिहासात सापडतात. इरेना सेंडलर, ऑस्कर शिंडलर यांनी ते सिद्धही करून दाखवलं. चारही बाजूनं अंधार दाटून आला, सूर्यही मावळला, सामान्यांच्या काळजाचा ठाव चुकला. आता काहीच होणं नाही, असं वाटायला लागलं, की काही जण स्वतःहून पुढे येतात. त्यांचा प्रकाश मंद असतो, मिणमिणता असतो; पण तेव्हा खूप मोलाचा असतो. अंधाराला घाबरून पुन्हा अंधारातच लपून बसलेल्यांना तो धीर देतो, शाश्‍वस्त करतो, की काळजी करू नका. ही रात्र सरू द्या, उद्या सूर्य उगवणारच आहे. तोपर्यंत आम्ही आहोत.

भविष्यकाळासाठी...
इतिहासातला सगळ्यात रक्तरंजित भाग अनेक जण वाचतात, अभ्यासतात. त्यांची त्यांची कारणं वेगळी असतील. त्यातील आपलं कोणतं, हे आपण ठरवायचं. मी स्वतः त्याकडे शहाणपण शिकणं, या दृष्टीनं पाहतो. मला वाटतं, की आपण इतिहासाकडे फार वेगळ्या दृष्टीनं पाहतो. एकतर तो डोक्‍यावर घेतो, त्यातील घटनांच्या खरेखोटेपणावरून वाद घालत बसतो किंवा तो पायदळी तुडवतो. त्यातील घटनांचा मानवी भावभावनांच्या दृष्टीनं कोणीच विचार करत नाही. तेव्हा झालेल्या चुका आपण समजावून घेत नाही. तसं झालं असतं, तर आपण पुनःपुन्हा तशाच चुका करत बसलो नसतो. यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याला कसं वागू नका हे सांगतात; तसंच जगण्याचं बळही देतात. अन्यायाविरुद्ध आपणही लढा देऊ शकू, असा आत्मविश्‍वास निर्माण करत असतात. एखादा वंशच संपवून टाकण्याएवढी तीव्र नकारात्मक भावना, द्वेष जसा निर्माण होऊ शकतो; तसंच त्याविरोधात उभं राहण्याची शक्तीही निर्माण होत असते. आजपर्यंत हा नियम वेळोवेळी सिद्ध झाला आहे. द्वेषाला, त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना जसं कोणाचंही सोयरसुतक नसतं; तसंच अन्यायाच्या विरोधात ठाकणाऱ्यांनाही नसतं. हा अन्याय दूर केला पाहिजे, एवढीच त्यांची तीव्र मनीषा असते, त्यांची जीवनेच्छा असते. इंग्रजांविरोधात उभे राहणारे, हसत हसत फाशी जाणारे क्रांतिकारक असोत, की हाल हाल होऊन मरणाची खात्री असतानाही तुझा अंत होणार आहे, असं रावणाला, कंसाला आणि पुराणातील अनेक राजांना उच्चरवानं सांगणारे ऋषिमुनी, सामान्य नागरिक असोत, या साऱ्यांची जातकुळी एकच. या साऱ्यांमुळेच आपलं जीवन सुरळीत चाललं आहे. ही मंडळी आपल्याला जगण्याचं बळ पुरवत असतात. यातील काहींना बाळकडू मिळालेलं असतं आणि प्रल्हादासारख्याला आंतरिक स्फुरण!

भूतकाळ भविष्यकाळासाठी...
भविष्यात पुन्हा असा काही प्रसंग उद्‌भवला, एखादा हिटलर निर्माण झाला, तर त्याला तोंड देण्यासाठी अशी माणसंही असणार आहेत, हा विचार दिलासा देणारा आहे. आज जागतिक मंदीसारखा प्रश्‍न आपल्यासमोर आ वासून उभा आहे. फक्त हाच नाही, तर इतरही अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहत असतात. अशा वेळी या गोष्टी आठवल्या, की आपली अडचण छोटीशी वाटायला लागते. या मंडळींनी एवढ्या मोठ्या संकटातून मार्ग काढला, मग आपल्यापुढचं संकट काहीच नाही, हे जाणवतं आणि रस्ता सापडत जातो. या गोष्टी यासाठीही महत्त्वाच्या आहेत.
गेला तो भूतकाळ आहे. आपण विचार करायचा तो भविष्याचा; पण भविष्याचा रस्ता भूतकाळातूनच जातो, हे विसरायचं नसतं. होलोकास्टच्या घटना या दृष्टीनं वाचल्या, की आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घटनांची भीती वाटेनाशी होते. चांगुलपणा साऱ्या वाईटपणाला पुरून उरतो, हे सत्य मनात लख्खकन प्रकाशून जातं. त्यातूनच रोजच्या धकाधकीत मुसंडी मारण्याचं बळ मिळतं आणि हेच त्या कथांचं फलित असतं.


27 जानेवारीच का?
होलोकास्टच्या त्या सहा वर्षांमध्ये नाझी सैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छळ छावण्या उभारल्या होत्या. बाहेरून पाहिल्यास साधा तुरुंग भासणाऱ्या या छळ छावण्यांमध्येच ज्यूंना ठार केलं जात होतं. आपण ऐकलेली "गॅस चेंबर्स' याच छावण्यांमध्येच होती. पोलंड या देशातील आउत्सविझ ही छळ छावणी त्यातील सर्वांत मोठी होती. तेथे 20 मे 1940 रोजी सुरू झालेला संहार पाच वर्षं सुरू होता. या काळात सुमारे 30 लाख लोकांची हत्या करण्यात आली. रशियाच्या सैन्यानं 27 जानेवारी 1945 रोजी या छळ छावणीवर कब्जा केला आणि शिल्लक राहिलेल्यांची मुक्तता केली. म्हणूनच वंशसंहाराच्या स्मृतीसाठी हा दिवस निवडण्यात आला.