पह्यलं नमन....

Posted by Abhijit at 11:02 PM

Sunday, September 7, 2008

वेदांपासून संतसाहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र "पह्यलं नमन' गणपतीला केलं जातं. आजही आपण सारेच गणेशवंदनाने कार्यारंभ करतो. ही प्रथा का पडली असावी? त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा? उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, ज्ञानोपासना, दूरदृष्टी, निर्णयक्षमता, लहानात लहान घटकाला सामावून घेण्याची, तसेच ज्येष्ठांचा आदर राखण्याची, त्यांचा सल्ला ऐकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा-उत्साह यांसारख्या गुणांचा त्यांनी विचार केला असेल का? या गोष्टींचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागतो का? कार्यारंभ उत्तम होणे म्हणजे पुढच्या यशाची शाश्‍वती असते का? चला... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू या!

कुठल्याही कार्याची सुरवात गणेशाच्या पूजनाने करण्याची प्रथा आहे. इतर धर्मीयांमध्ये गणेशाचे पूजन नाही; परंतु त्या त्या परंपरेनुसार प्रार्थना म्हणून कार्यारंभ केला जातो. सहज विचार केला तर या प्रथा परंपरांची कारणमीमांसा करता येते. कोणत्याही कार्याचा आरंभ शुभ घटनेने व्हावा, हीच यामागची इच्छा असते. नाटक किंवा वगाच्या सुरवातीलाच "पहिलं नमन इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळीला...' करतात. म्हणजे स्थानिक देवदेवता, प्रतिष्ठित नागरिक आणि अर्थातच जनताजनार्दन! हे असं पहिलं नमन केलं की काम करणं सुकर होतं, त्यामध्ये यश मिळण्याची शक्‍यता अर्थातच अतिशय जास्त असते.

हा विचार आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवला आणि तशी प्रथा निर्माण केली. त्यांनी दाखविलेला हा रस्ता आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. "वेल बिगिनिंग इज हाफ डन' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ तोच. चांगली सुरवात म्हणजे निम्मं काम झाल्याची पावतीच असते! आता कंपनीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादं काम सुरू करताना गणेशपूजन किंवा प्रार्थना करणं शक्‍य नाही. आपल्या पूर्वसुरींना ते अपेक्षितही नाही. कार्याचा आरंभ गणेशपूजनानं करणं, या प्रथेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्यांनी गणेशाचीच निवड का केली असावी, इतर कोणतीही देवता का निवडली नसावी, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा; तर योग्य तो मार्ग दिसेल. यासाठी पुराण कथा थोड्या बाजूला ठेवाव्या लागतील.

गणेशाचं चरित्र पाहिलं की त्याचे गुण समोर येतात. एक तर ही देवता बुद्धीची आहे. बुद्धीबरोबरच नेतृत्व, संघटना बांधण्याचं सामर्थ्य, तीक्ष्ण आणि दूरदृष्टी, प्रसंगी मानापमान बाजूला ठेवण्याची क्षमता, प्रचंड उत्साह-ऊर्जा, उंदरासारख्या लहानातल्या लहान घटकाला सामावून आणि सांभाळून घेणं, खटासी खट आणि नटखटासी नटखट राहणं, ज्येष्ठांचा आदर करणं, त्याचबरोबर प्रसंग पाहून त्वरित निर्णय घेणं, आदी गुण आपल्याला गणपतीमध्ये दिसतात. कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी या गुणांची नितांत आवश्‍यकता असते.

उदाहरणच घ्यायचं तर कंपनीच्या एखाद्या "प्रोजेक्‍ट'चं घेता येईल. समजा एखाद्या कंपनीनं विशिष्ट वस्तू बनविण्याचं कंत्राट घेतलं आहे. हे कंत्राट वेळेवर आणि उत्तम दर्जाचं द्यायचं आहे. अशा वेळी कंपनी काय करते? आपल्याच कर्मचाऱ्यांपैकी काही जणांची या कामासाठी निवड करते. आता हा कार्यारंभ उत्तम होण्यासाठी तेथे गणेशाचं म्हणजे गणपतीच्या गुणांचं अधिष्ठान असणं आवश्‍यक आहे. हे कसं शक्‍य होईल? तर संघाच्या निवडीपासून सुरवात केली पाहिजे. या संघातील सदस्यांना त्या कामाची पूर्ण माहिती, ज्ञान असणं गरजेचं आहे. फक्त माहिती असणं उपयोगाचं नाही तर ज्ञान असणं आवश्‍यक आहे. या सदस्यांमध्ये एकोपा पाहिजे, ते काम सांगितल्या वेळेत आणि दर्जानुसार पूर्ण करण्याची त्यांची मनोमन इच्छा हवी. (हॅ... काहीतरी करतात, आम्हाला विचारायला काय होतं? शक्‍य आहे का? उगाचच तोंडघशी पडणार आता... असा विचार करणारे नकोत. एक खराब आंबा टोपलीतले इतर आंबे नासवतो!) या संघाचं नेतृत्व अशाच एका कुशल कर्मचाऱ्याकडे किंवा संचालकाकडे द्यायला हवं. हा नेता सगळ्यांना सांभाळून घेणारा, प्रसंगी मानापमान दूर ठेवणारा हवा. त्याने अनुभवी लोकांच्या मताला मान दिला पाहिजे, त्याचबरोबर तो लहानातल्या लहान घटकाच्या सूचनाही लक्षपूर्वक ऐकणारा आणि त्याला मान देणारा हवा. या सर्व सूचना ऐकून त्याने गरजेप्रमाणे आवश्‍यक ते निर्णय पटापट घेतले पाहिजेत. त्याच वेळी असा निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्याने ओळखले पाहिजेत. काही निर्णय त्या वेळी तोटा करणारे वाटतात; परंतु पुढच्या काळात मात्र त्यांचा फायदाच होत असतो. नेता हा खटासी खट आणि नटखटासी नटखट असला पाहिजे. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेता स्वत: उत्साहाचं-ऊर्जेचं आगर हवा. त्याच्यामुळे त्याच्या गटातील सदस्यांना स्फूर्ती मिळते. तेही पडेल ते काम उत्साहाने करण्यास सरसावतात.

आता ते काम करण्यासाठी असा संघ तयार झाला, की निम्मं काम झाल्यासारखंच असतं. नंतर उरते ती कामाची औपचारिकता. त्यांना यश मिळालं की इतरही कर्मचारी अशा प्रकारे काम करण्यास पुढे येतात. ही मंडळी काम करत असताना एक वेगळाच उत्साह-ऊर्जा निर्माण झालेली असते. ती ऊर्जा इतर कर्मचाऱ्यांनाही जाणवत असते. या मंडळींची चर्चा, त्यांचा झपाटा पाहून इतर कर्मचाऱ्यांतही तो "माहोल' निर्माण होतो. मग त्या कामाशी संबंध असो वा नसो- प्रत्येकालाच ही "असाईनमेंट' पूर्ण झालीच पाहिजे, असं वाटू लागतं. आता इतके शुभेच्छुक आणि शुभेच्छा पाठीशी असल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे, नाही का?म्हणूनच महत्त्व आहे ते पहिल्या नमनाला, अशा अर्थाने गणेशाच्या पूजनाला. कर्मकांडात न गुंतता त्या त्या व्यक्तिविशेषाचा विचार करून मार्ग शोधला की उत्तर नक्की सापडतं. गणेशाचे हे गुण अंगी बाणवले की ती व्यक्ती उत्तम प्रशासक तर होतेच, परंतु त्या संघटनेच्या गळ्यातील ताईतही होते.

या गोष्टी सर्वांनाच लागू आहेत. केवळ कंपनीच्या कामकाजातच नाही, तर घरापासून इतर कोणत्याही कामापर्यंत "टीम लीडर'पासून "टीम मेंबर'पर्यंत सर्वच असा विचार करू शकतात. नव्हे, त्यांनी तो करावा. सध्याच्या राजकीय रणधुमाळीत तर कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत सर्वांनीच अशा तऱ्हेने विचार केल्यास आजचं राजकारणाचं चित्रच पालटून जाईल! येत्या गणेश जयंतीला अशा विचारांचं तोरण चढवलं तर ते गणपतीलाही निश्‍चित आवडेल.

1 comments:

Manoj said...

hyaa postla naman