बेळगावमध्ये नुकताच एक घोटाळा उघडकीला आला. एका कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला. हा घोटाळा हजार ते पंधराशे कोटी रुपयांचा असावा असा अंदाज आहे. नेहमीप्रमाणे "स्कीम'चे योजनाकार पळून गेले आहेत आणि गुंतवणूकदार बंद ऑफिस आणि पोलिसांकडे फेऱ्या मारताहेत. अशा प्रकारची फसवणूक नवी नाही; पण यावेळी वेगळेपणा आहे, तो तंत्रज्ञानाची ओळख नसणाऱ्यांवर पाडलेल्या "वेबसाइट आणि मेसेज'च्या "इंप्रेशन'चा.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र आला होता कोल्हापूरहून. त्याच्याबरोबर आणखी काही जण होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं मस्त गप्पा झाल्या. बोलता बोलता त्यानं मला विचारलं, "तुला भरपूर पैसे कमवावे असं वाटत नाही का?' मी म्हटलं, "का नाही... भरपूर पैसे कोणाला नको आहेत?' मग त्यानं मला एक स्कीम सांगायला सुरवात केली. त्याच्याबरोबरचा एकजण पुढे आला आणि तो एका कागदावर वेगवेगळे आलेख काढत मला समजावून सांगू लागला. त्याची सुरवात एकदम "इम्प्रेसिव्ह' होती.
"मी आजकाल किती कमावतो माहिती आहे?'
"....'
"दहा लाख रुपये?'
"वर्षाला?' (समोरच्याला आनंद मिळावा म्हणून असा बावळट प्रश्न विचारायचाच असतो...)
"नाही महिन्याला...'
"हे पहा ही कंपनी कन्स्ट्रक्शन आणि पायाभूत सुविधांमध्ये पैसे गुंतवते. त्यामुळे रिटर्न्स भरपूर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये डॉलर्समध्येच पैसे गुंतवावे लागतात. किमान गुंतवणूक 500 डॉलर्सची. पैसे घेताना कंपनी एका डॉलरला पन्नास रुपये आणि देताना पंचेचाळीस रुपये, असा दर देते. याचा अर्थ आता तुला पंचवीस हजार रुपये गुंतवावे लागतील.'
"पैसे कसे द्यायचे, चेकनं?' माझी आपली मध्यमवर्गीय शंका...
"नाही नाही... जो काही व्यवहार आहे, तो रोखीनंच होतो. याची पावती वगैरे मिळत नाही. "हाय रिस्क, हाय गेन्स' हे तुला माहितीच असेल...'
"पण हे हाय गेन्स म्हणजे किती?' ...आपला संशयखोर स्वभाव काही बदलत नाही.
"20 टक्के!'
"वर्षाला?' पुन्हा एकदा भोळसट प्रश्न...
"महिन्याला...' उत्तर देणाऱ्याच्या चेहऱ्यावर आता त्रासिक भाव...
"महिना वीस टक्के मिळतात... म्हणजे साधारण आठ महिन्यांत तुझे गुंतवलेले पैसे वसूल! पुढे फक्त फायदाच फायदा! त्यानंतर तू आणखी काही मेंबर्स मिळवले, की प्रत्येक मेंबरच्या हप्त्यामागे तुझे पाच टक्के! आता घाल गणित...!'
"म्हणजे हा एमएलएमचाच प्रकार आहे...'
"बरोबर; पण खूप जास्त पैसे देणारा...'
"तरीपण रिस्क आहेच... आणि कंपनीला एवढे पैसे देणं कसं काय परवडतं?'
"ही कंपनी ज्या देशात आहे ना, तिथं कोणतेही टॅक्सेसच नाहीत. (इतक्या चांगल्या देशाचं नाव मी विसरलो, हा करंटेपणाच!) आणि मगाशी सांगितलं तशी गुंतवणूक पायाभूत आणि बांधकाम क्षेत्रात आहे... तू पुण्याला राहतोस आणि तुला बांधकाम क्षेत्रातला फायदा माहीत नाही...? (थूऽऽऽ तुझ्या... हे अध्याहृत. हे सारं चालू होतं, तेव्हा अमेरिकेतील बांधकाम व्यवसायाचा फुगा फुटला होता... मंदीनं हातपाय पसरायला सुरवात केली होती...)
आता माझा मित्र सरसावला... "उगाच शंका घेऊ नकोस. पावती नाही म्हणून काय झालं, त्यांची वेबसाइट आहे.(?) तू मेंबर होतोस तेव्हा तुझा पॅनकार्ड नंबर, एखादी फोटो आयडेंटिटी द्यावी लागते. त्यावरून ते पूर्ण चौकशी करून (?) मगच तुला मेंबर करतात... तुझा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेतात. मेंबर झालास की तुला मोबाईलवर मेसेज येऊ लागतात. सगळ्यात आधी तुला तुझा युझर नेम आणि पासवर्ड येतो. तू वेबसाइटवर जाऊन लॉगइन व्हायचं. तिथं तुला तुझी गुंतवणूक आणि दिलेले रिटर्न्स दिसतात. तुला तुझ्या पैशांचा फूल ट्रॅक ठेवता येतो... हे सारं कोणालाही करता येतं का? कंपनी व्यवस्थित आहे, म्हणूनच वेबसाइट तयार करता आली ना! आणि कंपनी अगदी वेळेवर, पाच म्हणजे डॉट पाच तारखेला पैसे पाठवते. आम्ही आत्ताच मुंबईहून येतोय... तिथं दिवसभरात पंचवीस लाख वाटले...'
मी बापड्यानं सगळं ऐकून घेतलं. या मंडळींना निरोप दिला. जाता जाता त्यांनी नवी कोरी इनोव्हा दाखवली...
"बघ चार महिन्यात घेतली कॅशवर... विचार कर...'
मीदेखील विचार केला. माझी बाईक काढली आणि चालू लागलो!
ही "स्कीम' म्हणजे "स्कॅम' होता, हे उघड दिसत होतं. पैसे गुंतविण्याचा प्रश्नच नव्हता. काही दिवसांनी त्यानं फोन केला. काय ठरलं असं विचारलं. मी नाही म्हणणार, हे त्यानं गृहीतच धरलं होतं... मग पुन्हा एकदा पुण्यावर, माझ्या भेकडपणावर चर्चा झाली आणि फोन बंद झाला....
अगदी अलीकडे, म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी त्याचा पुन्हा फोन आला..., "अरे वाईट बातमी आहे... मी जी कंपनी सांगत होतो ना... ती बुडाली रे... म्हणजे ती मंडळी पळाली...'
"अरे बापरे... तुझे किती गेले?'
"माझे नव्हते फारसे... पण माझे भाऊबंद, शेजारीपाजारी, मित्रमंडळी... असे भरपूर गेले. पार वाट लागली आहे...'
दोन-तीन वर्षांपासून बेळगाव शहर, जिल्हा तसंच कोल्हापूर जिल्हा, आजरा, गडहिंग्लज, चंदगड आदी भागात ही स्कीम जोरदार फोफावली होती. परवडत नव्हतं, त्यांनी कर्ज काढून पैसे भरले होते. हळूहळू या स्कीमनं कोकण पट्टा, गोवा आणि पुढे सातारा, पुणं, मुंबई असे हातपाय पसरले...
पैसे जमा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्कीमच्या प्रमुखांनी पोबारा केला. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील 14-15 जणांची बेळगावात धरपकड झाली... आता खटला उभा राहील... ज्यांचे पैसे अडकलेत, ते फेऱ्या मारत राहतील आणि दुसरीकडे अशीच एखादी "स्कीम' शिजू लागेल...
तशा या बातम्या नव्या नाहीत. बांगड्या पॉलिश करून देतो, नोटा दुप्पट करून देतो, लॉटरी लागली आहे, ट्रान्सस्क्रिप्शनची कामं आहेत पासून ते अशा स्कीमपर्यंत अनेक योजना अशी बुद्धिमान (?) मंडळी शोधत असतात. त्यामध्ये लाखो लोकांची फसवणूक होत असते. तरीदेखील नव्या योजनेत मंडळी पैसे गुंतवतातच!
एकूण काय, तर आपला जास्त पैशांचा लोभ काही कमी होत नाही. ही मंडळी आपलेच पैसे फिरवत राहतात, एवढे पैसे मिळाले असते, तर बॅंका कशाला राहिल्या असत्या, गरीब-श्रीमंत असा भेदभावच संपला असता, सगळीकडे संपन्नता-श्रीमंती दिसली असती... हे सारं काही ठाऊक असतं; पण... उजाडत नाही, हेच खरं...
अजून उजाडत नाही...
Posted by Abhijit at 11:00 PM
Friday, January 2, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
मी म्हटलं तर गोवेकर, म्हटलं तर कोल्हापूरकर, म्हटलं तर पुणेकर आणि सुद्धा बराच काही आहे...
मला वाटतं तो शब्द फकाणा असा नसून फकाणं असा आहे...
आता काही गोष्टी न लिहिलेल्याच चांगल्या कारण काही वेळा त्या कशा लिहायच्या असा प्रश्न उभा राहतो...
असो हा प्रपंच पुरे... शुभेच्छा
बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो माणसं फसतात तरी कशी ? त्यांना ्कळत कसे नाही असे झटपट पैसे मिळवुन देणाऱ्या योजना या स्कॅमच असतात.
माझा एक मित्रही असाच काही ना काही योजना गळयात मारायला बघायचा , मी सरळ मैत्री तोडुन टाकली.
एकानी माझ्या नातेवाईकाला ३५,००० रु. च गंडा घातला आहे, सोन्याचे नाणॆ विकुन. हॉगकॉगची कंपनी. नाण्याचा भविष्यात लिलाव होईल तेव्हा तुम्ही् करोडोपती होणार सांगुन.
Post a Comment