दुसरं महायुद्ध हे अनेक गोष्टींमुळे लक्षात राहतं; पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो ज्यूंच्या वंशसंहाराचा! या साऱ्या कालखंडाचा उल्लेख करायचा झाला, तर तो "न भूतो न भविष्यती' असाच करावा लागेल. सुमारे साठ लाख माणसांची या कालखंडात हत्या झाली. ती हत्या त्या माणसांची, त्या एका वंशाची नव्हती, तर माणुसकीचीच होती. त्या कथा वाचताना आजही अंगावर काटा उभा राहतो.
मा गच्या दोन आणि आजची एक अशा तीनही पिढ्यांना साद घालणारा विषय कोणता, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दुसरं महायुद्ध हे असेल. "युद्धस्य कथा रम्यः' याच न्यायानं हा विषय साद घालतो का? निश्चितच नाही. तसं असतं, तर आजपर्यंत झालेल्या युद्धांवरही भरपूर पुस्तकं लिहिली गेली असती आणि वाचली गेली असती. तसं घडताना दिसत नाही. मानवी भावभावना, हा यातील कळीचा मुद्दा आहे. दुसरं महायुद्ध, त्यातील पराक्रम, चुका, त्यात दिसलेलं क्रौर्य, चमकून गेलेलं धैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यू समाजाचा झालेला वंशसंहार या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
हा विषय आत्ताच लिहिण्यामागं एक कारण आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 27 जानेवारीला "होलोकास्ट' (वंशसंहार) स्मृतिदिन पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिवस पाळला जातो.
काही वेळा मनात विचार येतो, की हे असे दिवस का पाळायचे? झाली घटना होऊन गेली. पुनःपुन्हा त्याची आठवण काढून काय साध्य होणार आहे? मुळात काही जणांच्या चुका, घडून गेलेल्या गोष्टी परत का उगाळायच्या? हे सारं केलंच पाहिजे का?
यावर उत्तर आहे, केलंच पाहिजे! आपण चांगल्या स्मृती का जपतो? एखाद्या यशाची आठवण मनामध्ये कायम ताजी का असते? तर या गोष्टी आपल्याला आनंद देतात, काहीतरी शिकवतात म्हणून. त्याच न्यायानं अशा कटू स्मृतीही जपल्या पाहिजेत. माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, किती क्रूर होऊ शकतो, हे या वंशसंहाराच्या आठवणींतून समजतं. एखादा वंश संपवून टाकायची इच्छा माणूस मनात धरू शकतो. त्यानुसार वागू शकतो. त्या वेडाच्या भरात लाखो लोकांचं शिरकाण करू शकतो, लहान मुलं-वृद्ध यांच्याकडे पाहूनही त्याला पाझर फुटत नाही, हे सत्य त्यामुळे तर समाजासमोर येतं.
या आठवणी आपल्यासाठीच
वंशसंहार दिनाचाच विचार करायचा, तर आपल्यातील क्रूरता आपल्यालाच दिसावी आणि त्यातून आपल्यात बदल व्हावा, हेच त्याचं साध्य आहे. वंशसंहाराचे प्रयत्न त्यापूर्वीही झाले होते आणि नंतरही होत राहिले. त्याची माध्यमं वेगळी होती, नेते वेगळे होते; परंतु ज्यूंच्या वंशसंहाराएवढा भीषण प्रकार आजपर्यंत कधीही झालेला नाही. माणसाची सारीच्या सारी रूपं या कालखंडात पाहायला मिळतात. लहानशा चुकीमुळेही मोठी घटना घडू शकते, मोठं नुकसान होऊ शकतं हेही याच कालखंडात दिसून येतं. ब्रिटन, फ्रान्स, पोलंड आणि रशिया यांनी केलेल्या लहान-लहान चुका लाखोंच्या जिवावर बेतल्या. हाती बेलगाम सत्ता असणाऱ्यांच्या मनातील द्वेष, टोकाचा द्वेष किती मोठा संहार घडवू शकतो, हेही यातूनच दिसलं.
मानवी स्वभावाचा अभ्यास
या आठवणी म्हणजे दु:ख उगाळणं नाही. हा अभ्यास आहे. मानवी स्वभावाला जाणून घेण्याचा अभ्यास. आपल्यातील सुष्टता आणि दुष्टता या दोन्ही अगदी विरुद्ध भावना किती टोकाच्या असू शकतात, याचा अभ्यास. जगातील सगळ्यात धोकादायक आणि सहृदय प्राणी मानवच आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या मनात द्वेष ही भावना नसते. त्यांच्यात काही कारणांमुळे भांडणं होतात, झटापटी होतात, शक्तिपरीक्षण होतं. काही वेळा मुद्दा भक्ष्य मिळविण्याचा असतो, तर काही वेळा मादी; पण एकाचा जय झाला, की विषय संपतो, वैर संपतं. माणूस मात्र डूख धरून राहतो. तो त्याला राग आला म्हणून अनेकांच्या जिवावर उठू शकतो. तो पिढ्यान् पिढ्या राग बाळगू शकतो. माणसांबरोबर वैर संपत नाही, उलट ते वाढतंच राहतं. हिटलर अशा क्रौर्याचंच तर उदाहरण आहे.
हाच माणूस तेवढाच सहृदयही आहे. तो स्वतःच्या जिवाचा विचार न करता इतरांसाठी काम करू शकतो. दुसऱ्या कोणासाठी तरी तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्याही प्राणांची बाजी लावू शकतो. अशी उदाहरणंही याच इतिहासात सापडतात. इरेना सेंडलर, ऑस्कर शिंडलर यांनी ते सिद्धही करून दाखवलं. चारही बाजूनं अंधार दाटून आला, सूर्यही मावळला, सामान्यांच्या काळजाचा ठाव चुकला. आता काहीच होणं नाही, असं वाटायला लागलं, की काही जण स्वतःहून पुढे येतात. त्यांचा प्रकाश मंद असतो, मिणमिणता असतो; पण तेव्हा खूप मोलाचा असतो. अंधाराला घाबरून पुन्हा अंधारातच लपून बसलेल्यांना तो धीर देतो, शाश्वस्त करतो, की काळजी करू नका. ही रात्र सरू द्या, उद्या सूर्य उगवणारच आहे. तोपर्यंत आम्ही आहोत.
भविष्यकाळासाठी...
इतिहासातला सगळ्यात रक्तरंजित भाग अनेक जण वाचतात, अभ्यासतात. त्यांची त्यांची कारणं वेगळी असतील. त्यातील आपलं कोणतं, हे आपण ठरवायचं. मी स्वतः त्याकडे शहाणपण शिकणं, या दृष्टीनं पाहतो. मला वाटतं, की आपण इतिहासाकडे फार वेगळ्या दृष्टीनं पाहतो. एकतर तो डोक्यावर घेतो, त्यातील घटनांच्या खरेखोटेपणावरून वाद घालत बसतो किंवा तो पायदळी तुडवतो. त्यातील घटनांचा मानवी भावभावनांच्या दृष्टीनं कोणीच विचार करत नाही. तेव्हा झालेल्या चुका आपण समजावून घेत नाही. तसं झालं असतं, तर आपण पुनःपुन्हा तशाच चुका करत बसलो नसतो. यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याला कसं वागू नका हे सांगतात; तसंच जगण्याचं बळही देतात. अन्यायाविरुद्ध आपणही लढा देऊ शकू, असा आत्मविश्वास निर्माण करत असतात. एखादा वंशच संपवून टाकण्याएवढी तीव्र नकारात्मक भावना, द्वेष जसा निर्माण होऊ शकतो; तसंच त्याविरोधात उभं राहण्याची शक्तीही निर्माण होत असते. आजपर्यंत हा नियम वेळोवेळी सिद्ध झाला आहे. द्वेषाला, त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना जसं कोणाचंही सोयरसुतक नसतं; तसंच अन्यायाच्या विरोधात ठाकणाऱ्यांनाही नसतं. हा अन्याय दूर केला पाहिजे, एवढीच त्यांची तीव्र मनीषा असते, त्यांची जीवनेच्छा असते. इंग्रजांविरोधात उभे राहणारे, हसत हसत फाशी जाणारे क्रांतिकारक असोत, की हाल हाल होऊन मरणाची खात्री असतानाही तुझा अंत होणार आहे, असं रावणाला, कंसाला आणि पुराणातील अनेक राजांना उच्चरवानं सांगणारे ऋषिमुनी, सामान्य नागरिक असोत, या साऱ्यांची जातकुळी एकच. या साऱ्यांमुळेच आपलं जीवन सुरळीत चाललं आहे. ही मंडळी आपल्याला जगण्याचं बळ पुरवत असतात. यातील काहींना बाळकडू मिळालेलं असतं आणि प्रल्हादासारख्याला आंतरिक स्फुरण!
भूतकाळ भविष्यकाळासाठी...
भविष्यात पुन्हा असा काही प्रसंग उद्भवला, एखादा हिटलर निर्माण झाला, तर त्याला तोंड देण्यासाठी अशी माणसंही असणार आहेत, हा विचार दिलासा देणारा आहे. आज जागतिक मंदीसारखा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे. फक्त हाच नाही, तर इतरही अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहत असतात. अशा वेळी या गोष्टी आठवल्या, की आपली अडचण छोटीशी वाटायला लागते. या मंडळींनी एवढ्या मोठ्या संकटातून मार्ग काढला, मग आपल्यापुढचं संकट काहीच नाही, हे जाणवतं आणि रस्ता सापडत जातो. या गोष्टी यासाठीही महत्त्वाच्या आहेत.
गेला तो भूतकाळ आहे. आपण विचार करायचा तो भविष्याचा; पण भविष्याचा रस्ता भूतकाळातूनच जातो, हे विसरायचं नसतं. होलोकास्टच्या घटना या दृष्टीनं वाचल्या, की आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घटनांची भीती वाटेनाशी होते. चांगुलपणा साऱ्या वाईटपणाला पुरून उरतो, हे सत्य मनात लख्खकन प्रकाशून जातं. त्यातूनच रोजच्या धकाधकीत मुसंडी मारण्याचं बळ मिळतं आणि हेच त्या कथांचं फलित असतं.
27 जानेवारीच का?
होलोकास्टच्या त्या सहा वर्षांमध्ये नाझी सैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छळ छावण्या उभारल्या होत्या. बाहेरून पाहिल्यास साधा तुरुंग भासणाऱ्या या छळ छावण्यांमध्येच ज्यूंना ठार केलं जात होतं. आपण ऐकलेली "गॅस चेंबर्स' याच छावण्यांमध्येच होती. पोलंड या देशातील आउत्सविझ ही छळ छावणी त्यातील सर्वांत मोठी होती. तेथे 20 मे 1940 रोजी सुरू झालेला संहार पाच वर्षं सुरू होता. या काळात सुमारे 30 लाख लोकांची हत्या करण्यात आली. रशियाच्या सैन्यानं 27 जानेवारी 1945 रोजी या छळ छावणीवर कब्जा केला आणि शिल्लक राहिलेल्यांची मुक्तता केली. म्हणूनच वंशसंहाराच्या स्मृतीसाठी हा दिवस निवडण्यात आला.
एका वंशसंहाराची स्मृती
Posted by Abhijit at 9:43 PM
Friday, January 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment