भावलेलं, आवडलेलं आणि इतरांनाही ऐकवावंसं वाटलेलं इतके दिवस मनातच राहात होतं. शक्य तेवढ्या मित्रांपर्यंत पोचवत होतो. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवं, म्हणून हा प्रयत्न… बडबड…
बडबड सुरू केली खरी… पण सुरवात कुठून करावी, या विचारात होतो… अचानक ट्यूब पेटली. स्वत:चं काहीतरी टाकण्यापेक्षा पु.लं.च्या कथाकथनानं सुरवात केली तर… म्हणून हा पहिला पॉडकास्ट पुलंचा… म्हैस या कथेचा… मला ही कथा प्रचंड आवडते. मी ती कितीदा ऐकली असेल, याला सुमारच नाही. काही गोष्टी कालानुरूप कंटाळवाण्या किंवा रिलेटेड वाटत नाहीत. या कथेचं तसं नाही… मी स्वत: फारसा कोकणात गेलेलो नाही किंवा तिथं एसटीनं प्रवासही केलेला नाही. तरीदेखील ही कथा आपली वाटते, भुरळ घालते…
अधेमधे माझ्या या नव्या उद्योगाला भेट द्यायलाही विसरू नका...
बडबड…
Posted by Abhijit at 3:45 AM
Saturday, March 21, 2009
Labels: audio, Kathakathan, Mhais, PL Deshpande, Pula, Story telling
इफ यू कम टुडे
Posted by Abhijit at 3:25 AM
Friday, March 20, 2009
खरं तर ही पोस्ट मी ढापली आहे... सकाळी मराठी ब्लॉग्जवर सर्च मारत होतो, तेव्हा बाष्कळ बडबडकारांनी टाकलेली पोस्ट नजरेस आली. त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांमध्ये या व्हिडिओ क्लिपची लिंक होती. ती पाहिली आणि काही सुचलंच नाही... भन्नाट, तुफान, कुत्र्यासारखं असं बरंच काहीतरी झालं... काय झालं ते असं शब्दात सांगता येत नाही... त्यामुळे हा मार्ग काढला. जे आपल्याला वाटतंय ते इतरांनाही वाटलंच पाहिजे... अशी प्रामाणिक म्हणा किंवा इतर कोणती म्हणा इच्छा निर्माण झाल्यामुळे ती व्हिडिओ क्लिप इथे टाकतो आहे...
पाहा... आनंदी व्हा... खूष व्हा...
Labels: time pass
सॉरी हृषिराज
Posted by Abhijit at 3:48 AM
Thursday, March 12, 2009
सतरा वर्षे उलटून गेली या गोष्टीला... मी नववीत किंवा दहावीत असेन. शाळेतला माझा एक जिगरी दोस्त होता. हृषिराज त्याचं नाव. राहायचाही माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये... शाळा एक, क्लास एक, रोजचा अभ्यास एकत्र... जाम धमाल करायचो आम्ही... शाळेत प्रत्येक मधल्या सुटीमध्ये मारामारी करणं, त्या सुटीएवढंच महत्त्वाचं होतं आमच्यासाठी...
एक दिवस काय झालं समजलं नाही. कोणत्यातरी गोष्टीवरून आमची भांडणं झाली. भांडणाचं कारण आता काही आठवत नाही; पण त्या भांडणानंतर आम्ही एकमेकांशी बोलणं सोडलं... रोज एकत्र असणारे आम्ही आता एकमेकांकडे बघेनासे झालो. आता समोरासमोरच राहात असल्यामुळे एकमेकांना दिसायचो; पण बघितलं-न बघितल्यासारखं करून निघून जायचो.
पुढे शाळा संपली. कॉलेज सुरू झालं... मग सगळंच बदलून गेलं. एकमेकांची आठवणही पुसट होत गेली... परवा परवा अचानकच हृषिराज ऑर्कुटवर दिसला. एकदम साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. न राहवून त्याला एक स्क्रॅप टाकला आणि फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली... अपेक्षेप्रमाणं त्यानं ती मान्य केली आणि माझ्या स्क्रॅपला उत्तरही पाठवलं... "अभिजित तुला पाहून आनंद झाला. जवळजवळ सतरा वर्षे झाली असतील, आपण भेटलेल्याला. आपल्या भांडणाबद्दल सॉरी... इतक्या वर्षांनी का होईना; पण सॉरी म्हणता आलं, हेच खूप बरं वाटतंय. माझ्या मित्रांपैकी फक्त तूच एकटा तुटला होतास, म्हणून खूप वाईट वाटायचं...'
सॉरी... तो सॉरी आत खोल कुठेतरी घाव करून गेला... त्या वेळचं ते मला आता न आठवणारं भांडण... एखाद्याच्या उरी एवढं सलत असेल... असतंच म्हणा... ज्याचे त्याचे घाव ज्याला त्याला ठाऊक... माझा त्याच शाळेतला एक मित्र आहे उपेंद्र म्हणून. त्याच्या जी टॉकचा स्टेटस मेसेज खूप छान आहे, "मैत्री आणि वैर दोन्ही बाजूने जपले, तर वाढतच जाते...'
आमची मैत्री छान होती. आम्ही भांडणही छान वाढवलं. अगदी सतरा वर्षांपर्यंत! खरंतर ते भांडण तिथेच संपायलाही हरकत नव्हती. कदाचित तेव्हा भावना तीव्र असतील; पण नंतर? ते काही जमलं नाही... अर्थात इतकी वर्षं भांडण वाढवत होतो किंवा तो राग मनात होता, असं नाही; पण भेट घडत नव्हती, एकमेकांचा पत्ता लागत नव्हता, जो तो आपापल्या नोकरी-व्यवसायात, घर-संसारात अडकला होता, हेच खरं...
आज तर भेट झाली ना? भेट झाली आणि दोन्ही बाजूनं हात पुढे आले, हे महत्त्वाचं. शेवटी आपली कमाई असते तरी कोणती? हीच की! मी काय किंवा हृषिराज काय... कुठेतरी अबोला संपला, पुन्हा बोलणं झालं हे महत्त्वाचं. आता ओघानं बोलणं वाढत जाईल, पुढे बोलणं थांबून संवाद सुरू होईल, हेही तेवढंच खरं...
हे असंच व्हायला पाहिजे नाही... परवा हृषिराजच्या निमित्तानं मी हेच तपासून पाहात होतो. असा किती ठिकाणी पूल तुटलाय ते... प्रत्येक वेळी भांडण व्हावं लागतं किंवा काहीतरी घडावं लागतं असं नाही, तर कधीकधी उलटती वर्षं, बदलणारे दिवसही कारणीभूत ठरतात.
काही दिवसांपूर्वीच आम्ही रमणबागेतले, 1992 मध्ये बाहेर पडलेले, तब्बल सतरा वर्षांपूर्वी वेगवेगळ्या वाटांनी गेलेले विद्यार्थी एकत्र भेटलो. सगळ्यांनी मिळून जाम धमाल केली... आम्ही सारे सतरा वर्षे कुठं होतो? एकेकाळी एकत्र डबा खाणारे, दिवसातले आठ तास एकत्र असणारे मित्र अचानक दूर कसे गेलो? मधली सतरा वर्षं कुठे हरवली?
वाट हरवली नाही, ती धूसर झाली. कॉलेजच्या निमित्तानं वाटा बदलल्या, पुढे करिअर, लग्न या साऱ्या गदारोळात ती लपली एवढंच... कॉलेजच्या मित्रांचं असं होत नाही. त्यांची संगत कॉलेज संपल्यानंतर सुटत नाही. ते बऱ्याचदा एकत्र राहतात...
असो, तर मी तुटलेल्या पुलांबद्दल बोलत होतो... नोकरीनिमित्त झालेल्या भ्रमंतीत काही ठिकाणी सूर जुळले, काही ठिकाणी मैत्री जमली, ऋणानुबंध जमले... काही टिकले, काही ठिकाणी विस्मृतीत गेले... आता ते धागेही पुन्हा जोडायला हवेत...
हे सारं आवर्जून नाही केलं तर कधीच होणार नाही... हृषिराजशी मी याआधीही बोलू शकत होतोच ना? तो कुठे आहे, काय करतो, हे शोधणं आजच्या एवढं सोपं नसलं, तरी अशक्यही नव्हतं... पण लक्षात आलं नाही... आता मात्र असं करून चालणार नाही... मला वाटतं आपल्या प्रत्येकाचेच कुठेतरी हरवलेले सूर असतात... काही प्रसंग असतील, तर काही माणसं! तर ती शोधायला हवीत. नाती पुन्हा जोडायला हवीत. धागे पुन्हा जुळायला हवेत.
उशीर झालाय; पण काहीच न होण्यापेक्षा उशीर परवडला... तरीदेखील चूक झाली ती झालीच...
सॉरी हृषिराज...
Labels: friends, lekh, school friends
रमणबाग 1992 : 10 वी अ...
Posted by Abhijit at 1:02 AM
Monday, March 9, 2009
सतरा वर्षे झाली. साधारण हाच महिना किंवा थोडं अलिकडे पलिकडे... दहावी अ चा सेंडॉफ (आम्ही असंच म्हणायचो!) झाला. पुढे परीक्षा... त्यानंतर रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो, तो शेवटचा. त्यानंतर एखादा कार्यक्रम आणि सवाई याशिवाय शाळेत गेलोच नाही. कधीकधी त्या रस्त्यावरून जाताना "माझी शाळा...' एवढा एक उल्लेख! एवढ्या पटकन नातं तुटतं? पाचवी ते दहावी अशी पाच वर्ष काढली त्या शाळेत. त्या काळात शाळा हेच सर्वस्व होतं... दिवसाची सुरवात शाळेपासून व्हायची आणि शेवटही! तेव्हाचं, त्या वयात जेवढं काही विश्व होतं, त्यातील बहुतेक भाग शाळेनंच तर व्यापला होता...
तर ज्या शाळेनं विश्व व्यापलं होतं, तिची ही कथा, तर तेव्हाच्या जानी दोस्तांची काय कथा? शाळा संपल्यावर कॉलेजात साऱ्यांच्या वाटा बदलल्या आणि बदलूनच गेल्या... रोज कोंडाळं करून डबा खाणारे, आपल्या डब्यातलं दुसऱ्याला देणारे दोस्त गायबच झाले! कुठे गेले कोणास ठाऊक... अधेमधे कधीतरी एखादा भेटायचा तेवढंच... तेव्हा, तू काय करतोस? सध्या कुठे आहेस? जुनं कोणी भेटतं का? या तीन प्रश्नांच्या पुढे काही गाडी जायची नाही... एका खाणीतले काही दगड काही काळ एकत्र होते... नंतर वेगवेगळ्या बांधकामांवर गेले...!!
आज हे सारं अचानक बडबडायचं कारण म्हणजे परवा, शनिवारी आम्ही रमणबागेतले 14 मित्र भेटलो. सगळं क्रेडिट ऑर्कुटचं... च्यायला कोण कुठला ऑर्कुट, कुठल्या गूगल नावाच्या कंपनीत कामाला लागला. त्यानं हे नवं विश्व तयार केलं. आणि पुण्यातल्या एका शाळेतले 14 मित्र एकत्र आणायला कारणीभूत ठरला!!!
सतरा वर्षांपूर्वी लांब गेलेले मित्र एकत्र आले... जमले ते एकमेकांकडे डोळे बारीक करून पाहात... तू थिटे ना? तू ढोबळे ना? अरे जोश्या तसाच आहेस की अजून... अरे हा वाघचौरे... दुसरा कुठंय (हे वाघचौरे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकाच वर्गात!) ते जाऊ दे, तू अजय की विजय ते सांग आधी... अरे माम्या आला... ढेऱ्या केवढा बदललास... विसाळ... देशपांडेंची बातमी ऐकली आणि तुझी आठवण आली... (हा विसाळ शाळेत असताना "वऱ्हाड निघालंय लंडनला...' करून दाखवायचा) ओळख परेड संपली आणि सुरू झाली धमाल... ते चार-पाच तास कसे गेले समजलंच नाही... आता पुन्हा एकदा एकत्र भेटायचं ठरलंय... त्याआधी उरलेल्या वर्गाला एकत्र आणायचं आहे... पाहू पुढच्या वेळी किती जमतात ते...
मुद्दा या पार्टीचा नाही... सगळे भेटले याचा आनंद आहेच; पण मधली वर्षं गेली कुठे हा महत्त्वाचा मुद्दा आहे... अशा कितीतरी गोष्टी आपल्या हातातून निसटून जात असतात. जरा विचार केला, तर लक्षात येतं... अरे एकेकाळी खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतरानं हरवूनच गेल्या की... काहीवेळा वयामुळे फरक पडतो, काहीवेळा अनुभवामुळे... पण गंमत म्हणून... त्या काळाची आठवण म्हणून तरी त्या शोधायला काय हरकत आहे...
विषय शाळेवरून सुरू झाला असला, तरी तो बराच मोठाय नाही! खरंच कधीतरी स्वत:साठी वेळ काढावा आणि गेल्या काही वर्षांत आपण काय काय मागेच ठेवलंय, काय काय विसरून गेलंय आणि काय काय हरवलंय याचा हिशेब मांडायला हरकत नाही... अगदी व्यावहारिक विचार केला, तरी तो फायद्याचा ठरेल हे नक्की!