रमणबाग 1992 : 10 वी अ...

Posted by Abhijit at 1:02 AM

Monday, March 9, 2009

सतरा वर्षे झाली. साधारण हाच महिना किंवा थोडं अलिकडे पलिकडे... दहावी अ चा सेंडॉफ (आम्ही असंच म्हणायचो!) झाला. पुढे परीक्षा... त्यानंतर रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो, तो शेवटचा. त्यानंतर एखादा कार्यक्रम आणि सवाई याशिवाय शाळेत गेलोच नाही. कधीकधी त्या रस्त्यावरून जाताना "माझी शाळा...' एवढा एक उल्लेख! एवढ्या पटकन नातं तुटतं? पाचवी ते दहावी अशी पाच वर्ष काढली त्या शाळेत. त्या काळात शाळा हेच सर्वस्व होतं... दिवसाची सुरवात शाळेपासून व्हायची आणि शेवटही! तेव्हाचं, त्या वयात जेवढं काही विश्‍व होतं, त्यातील बहुतेक भाग शाळेनंच तर व्यापला होता...
तर ज्या शाळेनं विश्‍व व्यापलं होतं, तिची ही कथा, तर तेव्हाच्या जानी दोस्तांची काय कथा? शाळा संपल्यावर कॉलेजात साऱ्यांच्या वाटा बदलल्या आणि बदलूनच गेल्या... रोज कोंडाळं करून डबा खाणारे, आपल्या डब्यातलं दुसऱ्याला देणारे दोस्त गायबच झाले! कुठे गेले कोणास ठाऊक... अधेमधे कधीतरी एखादा भेटायचा तेवढंच... तेव्हा, तू काय करतोस? सध्या कुठे आहेस? जुनं कोणी भेटतं का? या तीन प्रश्‍नांच्या पुढे काही गाडी जायची नाही... एका खाणीतले काही दगड काही काळ एकत्र होते... नंतर वेगवेगळ्या बांधकामांवर गेले...!!
आज हे सारं अचानक बडबडायचं कारण म्हणजे परवा, शनिवारी आम्ही रमणबागेतले 14 मित्र भेटलो. सगळं क्रेडिट ऑर्कुटचं... च्यायला कोण कुठला ऑर्कुट, कुठल्या गूगल नावाच्या कंपनीत कामाला लागला. त्यानं हे नवं विश्‍व तयार केलं. आणि पुण्यातल्या एका शाळेतले 14 मित्र एकत्र आणायला कारणीभूत ठरला!!!
सतरा वर्षांपूर्वी लांब गेलेले मित्र एकत्र आले... जमले ते एकमेकांकडे डोळे बारीक करून पाहात... तू थिटे ना? तू ढोबळे ना? अरे जोश्‍या तसाच आहेस की अजून... अरे हा वाघचौरे... दुसरा कुठंय (हे वाघचौरे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकाच वर्गात!) ते जाऊ दे, तू अजय की विजय ते सांग आधी... अरे माम्या आला... ढेऱ्या केवढा बदललास... विसाळ... देशपांडेंची बातमी ऐकली आणि तुझी आठवण आली... (हा विसाळ शाळेत असताना "वऱ्हाड निघालंय लंडनला...' करून दाखवायचा) ओळख परेड संपली आणि सुरू झाली धमाल... ते चार-पाच तास कसे गेले समजलंच नाही... आता पुन्हा एकदा एकत्र भेटायचं ठरलंय... त्याआधी उरलेल्या वर्गाला एकत्र आणायचं आहे... पाहू पुढच्या वेळी किती जमतात ते...
मुद्दा या पार्टीचा नाही... सगळे भेटले याचा आनंद आहेच; पण मधली वर्षं गेली कुठे हा महत्त्वाचा मुद्दा आहे... अशा कितीतरी गोष्टी आपल्या हातातून निसटून जात असतात. जरा विचार केला, तर लक्षात येतं... अरे एकेकाळी खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतरानं हरवूनच गेल्या की... काहीवेळा वयामुळे फरक पडतो, काहीवेळा अनुभवामुळे... पण गंमत म्हणून... त्या काळाची आठवण म्हणून तरी त्या शोधायला काय हरकत आहे...
विषय शाळेवरून सुरू झाला असला, तरी तो बराच मोठाय नाही! खरंच कधीतरी स्वत:साठी वेळ काढावा आणि गेल्या काही वर्षांत आपण काय काय मागेच ठेवलंय, काय काय विसरून गेलंय आणि काय काय हरवलंय याचा हिशेब मांडायला हरकत नाही... अगदी व्यावहारिक विचार केला, तरी तो फायद्याचा ठरेल हे नक्की!

4 comments:

Unknown said...

Too Good .....
ekdum sagalya junya athavani jagya zalya :)

Kaustubh said...

Well done Abhijit!!! Enjoyed reading as much remembering those old days!!!

I do agree with you that we didn't ask each other more then those three questions- how,what and where and certainly, It makes me look back into the past in search of the reason....

Well, the first thought that came in to my mind and to be fare with everyone, during those 17 years our priorities were, of course like every other student, to be successful in our career!!! and that mattered most for all of us leaving behind our school friends and making new one in our collages/universities and work!

There are plenty other reasons I can find but lets not at this point get into that :p

I am glad that 14 of you met on the last weekend and I am sure most of them will come on line in search of the lost ;P I am delighted and looking fwd to see you all sometime :) But this time we have more then 3 questions to ask I guess :p

Abhi said...

prashalam!!!!

savadhaan!!!

mi 1998 chya batch cha!!!

mast vatale lekh vachun

lai bhai!!!

-Abhijeet

anup said...

Abhijeet..
Tuzi post waachun khoop anand zaala.. aani dukkha pan..
Mi pan Ramanbagetlach ek vidyarthi
Mi pan 10 A madhyech hoto. passout year 1998. Khoop khoop athvani jagya zaala..
masta re..