सॉरी हृषिराज

Posted by Abhijit at 3:48 AM

Thursday, March 12, 2009

सतरा वर्षे उलटून गेली या गोष्टीला... मी नववीत किंवा दहावीत असेन. शाळेतला माझा एक जिगरी दोस्त होता. हृषिराज त्याचं नाव. राहायचाही माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये... शाळा एक, क्‍लास एक, रोजचा अभ्यास एकत्र... जाम धमाल करायचो आम्ही... शाळेत प्रत्येक मधल्या सुटीमध्ये मारामारी करणं, त्या सुटीएवढंच महत्त्वाचं होतं आमच्यासाठी...
एक दिवस काय झालं समजलं नाही. कोणत्यातरी गोष्टीवरून आमची भांडणं झाली. भांडणाचं कारण आता काही आठवत नाही; पण त्या भांडणानंतर आम्ही एकमेकांशी बोलणं सोडलं... रोज एकत्र असणारे आम्ही आता एकमेकांकडे बघेनासे झालो. आता समोरासमोरच राहात असल्यामुळे एकमेकांना दिसायचो; पण बघितलं-न बघितल्यासारखं करून निघून जायचो.
पुढे शाळा संपली. कॉलेज सुरू झालं... मग सगळंच बदलून गेलं. एकमेकांची आठवणही पुसट होत गेली... परवा परवा अचानकच हृषिराज ऑर्कुटवर दिसला. एकदम साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. न राहवून त्याला एक स्क्रॅप टाकला आणि फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली... अपेक्षेप्रमाणं त्यानं ती मान्य केली आणि माझ्या स्क्रॅपला उत्तरही पाठवलं... "अभिजित तुला पाहून आनंद झाला. जवळजवळ सतरा वर्षे झाली असतील, आपण भेटलेल्याला. आपल्या भांडणाबद्दल सॉरी... इतक्‍या वर्षांनी का होईना; पण सॉरी म्हणता आलं, हेच खूप बरं वाटतंय. माझ्या मित्रांपैकी फक्त तूच एकटा तुटला होतास, म्हणून खूप वाईट वाटायचं...'
सॉरी... तो सॉरी आत खोल कुठेतरी घाव करून गेला... त्या वेळचं ते मला आता न आठवणारं भांडण... एखाद्याच्या उरी एवढं सलत असेल... असतंच म्हणा... ज्याचे त्याचे घाव ज्याला त्याला ठाऊक... माझा त्याच शाळेतला एक मित्र आहे उपेंद्र म्हणून. त्याच्या जी टॉकचा स्टेटस मेसेज खूप छान आहे, "मैत्री आणि वैर दोन्ही बाजूने जपले, तर वाढतच जाते...'
आमची मैत्री छान होती. आम्ही भांडणही छान वाढवलं. अगदी सतरा वर्षांपर्यंत! खरंतर ते भांडण तिथेच संपायलाही हरकत नव्हती. कदाचित तेव्हा भावना तीव्र असतील; पण नंतर? ते काही जमलं नाही... अर्थात इतकी वर्षं भांडण वाढवत होतो किंवा तो राग मनात होता, असं नाही; पण भेट घडत नव्हती, एकमेकांचा पत्ता लागत नव्हता, जो तो आपापल्या नोकरी-व्यवसायात, घर-संसारात अडकला होता, हेच खरं...
आज तर भेट झाली ना? भेट झाली आणि दोन्ही बाजूनं हात पुढे आले, हे महत्त्वाचं. शेवटी आपली कमाई असते तरी कोणती? हीच की! मी काय किंवा हृषिराज काय... कुठेतरी अबोला संपला, पुन्हा बोलणं झालं हे महत्त्वाचं. आता ओघानं बोलणं वाढत जाईल, पुढे बोलणं थांबून संवाद सुरू होईल, हेही तेवढंच खरं...
हे असंच व्हायला पाहिजे नाही... परवा हृषिराजच्या निमित्तानं मी हेच तपासून पाहात होतो. असा किती ठिकाणी पूल तुटलाय ते... प्रत्येक वेळी भांडण व्हावं लागतं किंवा काहीतरी घडावं लागतं असं नाही, तर कधीकधी उलटती वर्षं, बदलणारे दिवसही कारणीभूत ठरतात.
काही दिवसांपूर्वीच आम्ही रमणबागेतले, 1992 मध्ये बाहेर पडलेले, तब्बल सतरा वर्षांपूर्वी वेगवेगळ्या वाटांनी गेलेले विद्यार्थी एकत्र भेटलो. सगळ्यांनी मिळून जाम धमाल केली... आम्ही सारे सतरा वर्षे कुठं होतो? एकेकाळी एकत्र डबा खाणारे, दिवसातले आठ तास एकत्र असणारे मित्र अचानक दूर कसे गेलो? मधली सतरा वर्षं कुठे हरवली?
वाट हरवली नाही, ती धूसर झाली. कॉलेजच्या निमित्तानं वाटा बदलल्या, पुढे करिअर, लग्न या साऱ्या गदारोळात ती लपली एवढंच... कॉलेजच्या मित्रांचं असं होत नाही. त्यांची संगत कॉलेज संपल्यानंतर सुटत नाही. ते बऱ्याचदा एकत्र राहतात...
असो, तर मी तुटलेल्या पुलांबद्दल बोलत होतो... नोकरीनिमित्त झालेल्या भ्रमंतीत काही ठिकाणी सूर जुळले, काही ठिकाणी मैत्री जमली, ऋणानुबंध जमले... काही टिकले, काही ठिकाणी विस्मृतीत गेले... आता ते धागेही पुन्हा जोडायला हवेत...
हे सारं आवर्जून नाही केलं तर कधीच होणार नाही... हृषिराजशी मी याआधीही बोलू शकत होतोच ना? तो कुठे आहे, काय करतो, हे शोधणं आजच्या एवढं सोपं नसलं, तरी अशक्‍यही नव्हतं... पण लक्षात आलं नाही... आता मात्र असं करून चालणार नाही... मला वाटतं आपल्या प्रत्येकाचेच कुठेतरी हरवलेले सूर असतात... काही प्रसंग असतील, तर काही माणसं! तर ती शोधायला हवीत. नाती पुन्हा जोडायला हवीत. धागे पुन्हा जुळायला हवेत.
उशीर झालाय; पण काहीच न होण्यापेक्षा उशीर परवडला... तरीदेखील चूक झाली ती झालीच...
सॉरी हृषिराज...

7 comments:

Kaustubh said...

Wonderful thoughts and expression of your emotions...Ekdam chan vachle vatun... Mala tumhi doghe bolat naslyache changle athavate!!! One thing I would like to tell you for sure, after you guys had a fight and when we (Amol Karve & Me) asked Hrishi what happened, He never complained about you, I remember very well, he just said "Jaude tyla kalel kadhi tari, to khup changla ahe" Ani tya nantar to jasta kahich bolala nahi...

Mala azun athavate, tumchi maitree jasata Youvashakti mule zali, Tynai mala tumhi doghe Youvashakati madhe ekatra trek la gelyache sangitale hote... Gone are those days really... Xitij khup dur gelyasarkha vatate... Punha mage walun baghaychi iccha pan khup aste!!!

Narendra prabhu said...

ते धागेही पुन्हा जोडायला हवेत... हे महत्वाचं. आपला ब्लॉग वाचून बरं वाटलं. याच विचाराने मी आत्ताच माझ्या कोकणातल्या मित्रांना भेटून आलो अठरा वर्षां नंतर.  काहीच न होण्यापेक्षा उशीर परवडला हेच खरं.

Unknown said...

kaay mast lihile aahe chhan , kharach re he jamayala have , aapalya bhavana shabdat nitas pane mandane he kharach kaushalyache kaam aahe ,

यशोधरा said...

छान लिहिलंय, आवडलं.

Yawning Dog said...

mastach post

Nikhil Bedare said...

Great thoughts...simply wonderful :)

Unknown said...

abhi dada....sundar..keval sundar...