दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?
काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला फास लावून घेतला. आयटी क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्या या दोन घटना. संदीपच्या घटनेनंतर ब्लॉग, कम्युनिटीज आणि अर्थातच मीडियामध्ये चर्चा सुरू झाली होती. साऱ्या चर्चेचा सूर होता कशासाठी? उत्तम नोकरी असणाऱ्या, उत्तम पगार असणाऱ्या आणि अर्थातच पुढे चांगलं करिअर असणाऱ्या तरुणांनी आत्महत्या का करावी?
संदीपनं कारण दिलं होतं कामाचा ताण. सरोजकुमारच्या आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नाही. तरीही या दोन घटनांमध्ये एक सूत्र दिसून येतं, ते म्हणजे "हेच उत्तर...' अशी त्यांची झालेली धारणा. या दोघांचे प्रश्न इतके टोकाचे असतील का? खरं सांगायचं तर आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. मुळात प्रश्न किती मोठा आणि किती छोटा, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं.
संदीपच्या घटनेनंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊन स्वत:कडेच पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण फक्त धावत सुटलो आहोत. कुठे धावायचं, कुठपर्यंत धावायचं आणि किती धावायचं, हे माहितीच नाही! कधीतरी दम लागतो, कधीतरी कंटाळा येतो, मन सांगत राहतं; पण मी माझं मन, मेंदू आणि शरीर या साऱ्यांनाच फक्त पिटाळतो आहे. माझी लाइफस्टाईल पूर्ण बदलून गेली आहे. मी उठतो, आवरतो आणि ऑफिसला धावतो. तिथं काम करतो. मधे कधीतरी कॅंटीनकडे किंवा बाहेर चक्कर टाकतो. कोणाशी तरी काहीतरी बोलतो. पुन्हा एकदा डेस्कवर बांधून घेतो. संध्याकाळी (खरं तर रात्री) कधीतरी कंटाळा येतो. मग मी घरी जाण्यासाठी उठतो. घरी पोचतो. ऑफिसमध्ये काहीतरी खाल्लं असेल तर तसाच झोपतो, किंवा काहीतरी पोटात ढकलून झोपतो. अर्थात घरी पोचून आडवं होण्याच्या मध्ये जो वेळ असतो ना, तो टीव्ही, लॅपटॉप किंवा सेलवर घालवतो...
स्वत:कडे तटस्थतेनं पाहिलं तेव्हा जे दिसलं, ते हे होतं. मग लक्षात आलं, अरे, बऱ्याच दिवसांत आपण एखादं छानसं गाणं ऐकलेलं नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणत होतं, सारेगमपच्या लिटिल चॅम्प्समध्ये शमिका भिडेनं छान गाणं म्हटलं. "मी गाताना गीत तुला लडिवाळा...' अंगावर काटा आला... मग मी कसं ऐकलं नाही ते? मला का नाही जाणवलं असं काही? तर तेव्हा मी सेलवर मेसेज पाठवत होतो. मेसेज पाठवता पाठवता जे कानावर आलं, तेवढंच ऐकलं मी!
पूर्वी आपण मनाचा खूप विचार करायचो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल आणि अर्थातच स्वत:च्या मनाला पटेल की नाही. आजकाल आपण हा विचार विसरलोत का? का मन नावाची शरीरात कुठेही दाखविता न येणारी गोष्ट आपण विसरून गेलोत? किती दिवसांपूर्वी आपण शांतपणे बसून शेवटचं गाणं ऐकलंय? पूर्वीच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्यालाही अनेक महिने उलटून गेलेत. एखादी छान कथा वाचली नाही, की नाटकही पाहिलं नाही... खरंच, ऑफिस आणि घर... उरलेल्या वेळेत ऑनलाईन, एवढंच आयुष्य आहे का आपलं?
असं का झालंय?
एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या गीतानं याविषयी प्रतिक्रिया पाठवली आहे. ती म्हणते, "अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाइन्स, घरच्या जबाबदाऱ्या, हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. सॉफ्टवेअरमध्ये मिळणारा पगार पाहून प्रत्येकाला इथं येण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे; पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आहे. एखादा संदीप क्षणात सगळं संपवतो, तर त्याच्यासारखे अनेक जण रोज थोडं थोडं मरत असतात.
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून... सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले रस्ते, डेडलाइन, ईएमआयचे चेक... असं का झालंय?'
आणखी एक संदीप...
Posted by Abhijit at 2:47 AM
Thursday, August 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment