काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?
काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...
मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...
अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...
तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.
बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...
आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्वास आहे.
आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...
तुझा
अभिजित
प्रिय संदीप,
Posted by Abhijit at 10:40 PM
Thursday, August 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
अभीजीत.
खूप सुंदर लेख लिहला आहेस. मनाला भावला.
सुधीर
Hi fakana....
kahi divasa purvi asach ek mail aala hota...aaj parat tuzya lekhamule aathvan zali....
dum lageparyant aapan thavato aani mag aankahi ek sandeep ....!!!
mitra mee pan tuzya sarakyach seema tharvilelya aahe....pan mag kadhi kadhi kharach bheeti vatate ki aapan swa:tala restrict karun ghetoy manun.....
@ sudhir,
thnx... mala tya divshi je kahi vatala, te utaravla. mala vatta, khup jananchya ashach bhavana astil.
@mess up...
asa mhanu nakos. aapan swatala restrict karun nahi ghet. aapla 'quota' olkhun asto. kam tar karaychach asta. facta te kashasathi, he aapan visarto, asa mala vatta. aapan kamatah itake vahun jato, ki aaplya sathi paisa, ki paisha sathi aapan, he samjat nahi... khup sara paisa aani duravlele kutumba, khalavleli tabyet... ki masta paisa, masta family aani masta health... he aapan tharvayla hava na...
Post a Comment