Showing posts with label lifestyle. Show all posts
Showing posts with label lifestyle. Show all posts

आणखी एक संदीप...

Posted by Abhijit at 2:47 AM

Thursday, August 21, 2008

दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?

काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला फास लावून घेतला. आयटी क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्या या दोन घटना. संदीपच्या घटनेनंतर ब्लॉग, कम्युनिटीज आणि अर्थातच मीडियामध्ये चर्चा सुरू झाली होती. साऱ्या चर्चेचा सूर होता कशासाठी? उत्तम नोकरी असणाऱ्या, उत्तम पगार असणाऱ्या आणि अर्थातच पुढे चांगलं करिअर असणाऱ्या तरुणांनी आत्महत्या का करावी?

संदीपनं कारण दिलं होतं कामाचा ताण. सरोजकुमारच्या आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नाही. तरीही या दोन घटनांमध्ये एक सूत्र दिसून येतं, ते म्हणजे "हेच उत्तर...' अशी त्यांची झालेली धारणा. या दोघांचे प्रश्‍न इतके टोकाचे असतील का? खरं सांगायचं तर आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. मुळात प्रश्‍न किती मोठा आणि किती छोटा, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं.

संदीपच्या घटनेनंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊन स्वत:कडेच पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण फक्त धावत सुटलो आहोत. कुठे धावायचं, कुठपर्यंत धावायचं आणि किती धावायचं, हे माहितीच नाही! कधीतरी दम लागतो, कधीतरी कंटाळा येतो, मन सांगत राहतं; पण मी माझं मन, मेंदू आणि शरीर या साऱ्यांनाच फक्त पिटाळतो आहे. माझी लाइफस्टाईल पूर्ण बदलून गेली आहे. मी उठतो, आवरतो आणि ऑफिसला धावतो. तिथं काम करतो. मधे कधीतरी कॅंटीनकडे किंवा बाहेर चक्कर टाकतो. कोणाशी तरी काहीतरी बोलतो. पुन्हा एकदा डेस्कवर बांधून घेतो. संध्याकाळी (खरं तर रात्री) कधीतरी कंटाळा येतो. मग मी घरी जाण्यासाठी उठतो. घरी पोचतो. ऑफिसमध्ये काहीतरी खाल्लं असेल तर तसाच झोपतो, किंवा काहीतरी पोटात ढकलून झोपतो. अर्थात घरी पोचून आडवं होण्याच्या मध्ये जो वेळ असतो ना, तो टीव्ही, लॅपटॉप किंवा सेलवर घालवतो...

स्वत:कडे तटस्थतेनं पाहिलं तेव्हा जे दिसलं, ते हे होतं. मग लक्षात आलं, अरे, बऱ्याच दिवसांत आपण एखादं छानसं गाणं ऐकलेलं नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणत होतं, सारेगमपच्या लिटिल चॅम्प्समध्ये शमिका भिडेनं छान गाणं म्हटलं. "मी गाताना गीत तुला लडिवाळा...' अंगावर काटा आला... मग मी कसं ऐकलं नाही ते? मला का नाही जाणवलं असं काही? तर तेव्हा मी सेलवर मेसेज पाठवत होतो. मेसेज पाठवता पाठवता जे कानावर आलं, तेवढंच ऐकलं मी!

पूर्वी आपण मनाचा खूप विचार करायचो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल आणि अर्थातच स्वत:च्या मनाला पटेल की नाही. आजकाल आपण हा विचार विसरलोत का? का मन नावाची शरीरात कुठेही दाखविता न येणारी गोष्ट आपण विसरून गेलोत? किती दिवसांपूर्वी आपण शांतपणे बसून शेवटचं गाणं ऐकलंय? पूर्वीच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्यालाही अनेक महिने उलटून गेलेत. एखादी छान कथा वाचली नाही, की नाटकही पाहिलं नाही... खरंच, ऑफिस आणि घर... उरलेल्या वेळेत ऑनलाईन, एवढंच आयुष्य आहे का आपलं?

असं का झालंय?

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या गीतानं याविषयी प्रतिक्रिया पाठवली आहे. ती म्हणते, "अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाइन्स, घरच्या जबाबदाऱ्या, हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. सॉफ्टवेअरमध्ये मिळणारा पगार पाहून प्रत्येकाला इथं येण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे; पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आहे. एखादा संदीप क्षणात सगळं संपवतो, तर त्याच्यासारखे अनेक जण रोज थोडं थोडं मरत असतात.

प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून... सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्‍य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले रस्ते, डेडलाइन, ईएमआयचे चेक... असं का झालंय?'

प्रिय संदीप,

Posted by Abhijit at 10:40 PM

Thursday, August 7, 2008

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?

काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...

मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्‍वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...

अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...

तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.

बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्‍चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...

आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्‍नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्‍वास आहे.

आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्‍न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्‍नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...

तुझा
अभिजित

माझी तिखट गोड खाद्ययात्रा...

Posted by Abhijit at 11:08 PM

Sunday, June 8, 2008

आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्‍वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांचाही शोध घेतला गेला. ब्लॉगच्या निमित्तानं या साऱ्याला उजाळा देण्याची संधी मिळते आहे.

खाण्याची आवड असली, तरी स्वयंपाकाबाबत कायमचा कंटाळा! म्हणजे बॅचलर असतानाही "चहा' या विषयापुढे धाव गेली नाही. कधीकधी मेसचा कंटाळा आला, तर मित्रांनी मिळून केलेले भाताचे विविध प्रकार! (लावलेली वाट...) आणि शोधलेले शॉर्टकट. सहज आठवलं. मी बेळगावला असताना नारळाची बर्फी करायचं ठरवलं! कृती अगदी सोपी वाटली. नारळ खोवायचा, साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यात खोवलेला नारळ घालायचा, ते मिश्रण आटवायचं आणि ताटात पसरून थंड करायचं! आहे काय त्यात? (त्यावेळी लग्नं झालं होतं. त्यामुळे एवढी आयुधं घरात होती; पण बायको पुण्याला आल्यानं आम्ही बॅचलरच होतो.) मी तयारीला लागलो. नारळ खोवण्याची माझी स्टाईल पाहून एक मित्र मदतीला धावला. मग आम्ही दोघांनी मिळून तीन नारळ खोवले. अर्धा किलो साखर गॅसवर ठेवली. जळाल्याचा वास आल्यानंतर त्यात पाणीही घालायचं असतं हे समजलं. (च्यायला ***, नीट वाचायला काय होतं तुला? इति मित्र) एकदाचा पाक झाला. त्यात नारळ घातला. आम्ही पिक्‍चर बघत पसरलो. होता होता तीन एक तास झाले. मिश्रण काही घट्ट होईना. आता गॅस संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली. अखेरीस चार तासांनंतर ते मिश्रण गॅसवरून उतरविण्यात आले. ताटात घालून थंड करण्यासाठी ठेवण्यात आले. (मरूदे... बघू गार झाल्यावर!) दोन दिवसांनंतरही ते तसंच थबथबीत होतं! या अनुभवावरून लक्षात आलं असेलंच, की आमचा करण्यापेक्षा खाण्यावर भर.

काल याच विषयावर विचार करता करता लक्षात आलं. (मी विचार करतो...!) ही खाद्ययात्रा शाळेपासूनच सुरू झाली. मी आधी नवीन मराठी (पहिली ते चौथी), नंतर रमणबाग. त्यातील नवीन मराठी सोडून देऊ. रमणबागेच्या बाहेर सूर्यकांत कुल्फी, उन्हाळ्यात काकडी, शाळेच्या बाहेर कॉर्नरला असलेल्या बेकरीतला क्रिमरोल आणि चौकात समोर असलेल्या दवे स्वीटमार्टमधले सामोसे (सध्या तिथे बेकरी नाही. कुल्फी आणि समोसे मिळतात. त्यांची चव अजूनही तशीच आहे.) अशी खाद्ययात्रा सुरू झाली. तिचा प्रवास आता "स्टार्टर' (पक्षी : चकणा. यातही खूप सुंदर प्रकार आहेत, आठवताहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) पर्यंत येऊन ठेपलाय.

याच प्रवासाच्या सुग्रास आठवणींमध्ये मी रमणार आहे, तेही तुम्हाला बरोबर घेऊन. (काय दिवस आलेत.... असं वाटलं ना?) ही फक्त खाद्य यात्रा नाही. त्याबरोबर तिथल्या आठवणी, वातावरण यांचाही वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न. मधेमधे काही पदार्थांच्या समजलेल्या रेसिपिज. (बर्फीसारख्या नाहीत!) आता इथेच थांबतो. बाकीचं पुन्हा केव्हा तरी...

फक्त थोडा वेळ...

Posted by Abhijit at 11:24 PM

Thursday, June 5, 2008

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले."
"पण का?''
"'सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
"भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्‍न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्‍चितच फरक पडू शकतो. परमेश्‍वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''

या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्‍चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, "त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.

''व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.

आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्‍य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.

बिन पैशाचा दिवस

Posted by Abhijit at 10:45 PM

Wednesday, June 4, 2008

ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्‍न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्‍न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.

दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्‍चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्‍न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.

घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...

कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...

पेट्रोल वाढले... आता काय?

Posted by Abhijit at 3:11 AM

पेट्रोल वाढले, तर काय... याविषयीची एक भन्नाट क्‍लिप मला एकाने परवा मेल केली. ती इथे टाकतोय... आता आपल्यालाही हाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे...

मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय...

Posted by Abhijit at 11:53 PM

Tuesday, June 3, 2008

काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्‍यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?

दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम म्हणून इंटरनेट आणि मोबाईलकडे पाहायला हवं. टीव्ही हा एक स्वतंत्र विषय आहे. जाता जाता सांगतो. आजकाल, म्हणजे साधारणपणे महिन्याभरापासून मी संध्याकाळी टीव्ही पाहणं बंद केलंय. सकाळी एखादा तास पाहतो. तेही बातम्या आणि डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिकवर काही कार्यक्रम असेल तर तो. माझ्या आयुष्यात तरी काही फरक पडलेला नाही. आणि पडलाच असेल, तर तो चांगला. ऑफिसमधून घरी गेलं, की लेकीला घेऊन फिरायला जातो. आम्ही प्रचंड दंगा करतो. अंधार पडला, की गच्चीवर जाऊन खेळतो. नऊच्या सुमारास मी वाचत बसतो. संध्याकाळी सात ते दहा या तीन तासांचा इतका चांगला उपयोग टीव्ही पाहताना कधीच झाला नव्हता.असो, हा मुद्दा वेगळा आहे. तर मी बोलत होतो मोबाईल आणि इंटरनेटबाबत. या दोन्ही गोष्टी आपल्या खूप काही देणाऱ्या आहेत. आताही मला व्यक्त होण्यासाठी मी इंटरनेटचाच आधार घेतोय. पण सीमारेषा आखायलाच हवी ना! मला स्वत:वरूनच एक जाणवलं. आपण बऱ्याचदा वाहावत जातो. एक झालं की दुसरं असं करत जातो. मला काय करायचं आहे, हे एकदा डोक्‍यात स्पष्ट असलं, की सारेच मुद्दे संपतात...