ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.
दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.
घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...
कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...
बिन पैशाचा दिवस
Posted by Abhijit at 10:45 PM
Wednesday, June 4, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment