काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?
दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम म्हणून इंटरनेट आणि मोबाईलकडे पाहायला हवं. टीव्ही हा एक स्वतंत्र विषय आहे. जाता जाता सांगतो. आजकाल, म्हणजे साधारणपणे महिन्याभरापासून मी संध्याकाळी टीव्ही पाहणं बंद केलंय. सकाळी एखादा तास पाहतो. तेही बातम्या आणि डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिकवर काही कार्यक्रम असेल तर तो. माझ्या आयुष्यात तरी काही फरक पडलेला नाही. आणि पडलाच असेल, तर तो चांगला. ऑफिसमधून घरी गेलं, की लेकीला घेऊन फिरायला जातो. आम्ही प्रचंड दंगा करतो. अंधार पडला, की गच्चीवर जाऊन खेळतो. नऊच्या सुमारास मी वाचत बसतो. संध्याकाळी सात ते दहा या तीन तासांचा इतका चांगला उपयोग टीव्ही पाहताना कधीच झाला नव्हता.असो, हा मुद्दा वेगळा आहे. तर मी बोलत होतो मोबाईल आणि इंटरनेटबाबत. या दोन्ही गोष्टी आपल्या खूप काही देणाऱ्या आहेत. आताही मला व्यक्त होण्यासाठी मी इंटरनेटचाच आधार घेतोय. पण सीमारेषा आखायलाच हवी ना! मला स्वत:वरूनच एक जाणवलं. आपण बऱ्याचदा वाहावत जातो. एक झालं की दुसरं असं करत जातो. मला काय करायचं आहे, हे एकदा डोक्यात स्पष्ट असलं, की सारेच मुद्दे संपतात...
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय...
Posted by Abhijit at 11:53 PM
Tuesday, June 3, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment