आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांचाही शोध घेतला गेला. ब्लॉगच्या निमित्तानं या साऱ्याला उजाळा देण्याची संधी मिळते आहे.
खाण्याची आवड असली, तरी स्वयंपाकाबाबत कायमचा कंटाळा! म्हणजे बॅचलर असतानाही "चहा' या विषयापुढे धाव गेली नाही. कधीकधी मेसचा कंटाळा आला, तर मित्रांनी मिळून केलेले भाताचे विविध प्रकार! (लावलेली वाट...) आणि शोधलेले शॉर्टकट. सहज आठवलं. मी बेळगावला असताना नारळाची बर्फी करायचं ठरवलं! कृती अगदी सोपी वाटली. नारळ खोवायचा, साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यात खोवलेला नारळ घालायचा, ते मिश्रण आटवायचं आणि ताटात पसरून थंड करायचं! आहे काय त्यात? (त्यावेळी लग्नं झालं होतं. त्यामुळे एवढी आयुधं घरात होती; पण बायको पुण्याला आल्यानं आम्ही बॅचलरच होतो.) मी तयारीला लागलो. नारळ खोवण्याची माझी स्टाईल पाहून एक मित्र मदतीला धावला. मग आम्ही दोघांनी मिळून तीन नारळ खोवले. अर्धा किलो साखर गॅसवर ठेवली. जळाल्याचा वास आल्यानंतर त्यात पाणीही घालायचं असतं हे समजलं. (च्यायला ***, नीट वाचायला काय होतं तुला? इति मित्र) एकदाचा पाक झाला. त्यात नारळ घातला. आम्ही पिक्चर बघत पसरलो. होता होता तीन एक तास झाले. मिश्रण काही घट्ट होईना. आता गॅस संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली. अखेरीस चार तासांनंतर ते मिश्रण गॅसवरून उतरविण्यात आले. ताटात घालून थंड करण्यासाठी ठेवण्यात आले. (मरूदे... बघू गार झाल्यावर!) दोन दिवसांनंतरही ते तसंच थबथबीत होतं! या अनुभवावरून लक्षात आलं असेलंच, की आमचा करण्यापेक्षा खाण्यावर भर.
काल याच विषयावर विचार करता करता लक्षात आलं. (मी विचार करतो...!) ही खाद्ययात्रा शाळेपासूनच सुरू झाली. मी आधी नवीन मराठी (पहिली ते चौथी), नंतर रमणबाग. त्यातील नवीन मराठी सोडून देऊ. रमणबागेच्या बाहेर सूर्यकांत कुल्फी, उन्हाळ्यात काकडी, शाळेच्या बाहेर कॉर्नरला असलेल्या बेकरीतला क्रिमरोल आणि चौकात समोर असलेल्या दवे स्वीटमार्टमधले सामोसे (सध्या तिथे बेकरी नाही. कुल्फी आणि समोसे मिळतात. त्यांची चव अजूनही तशीच आहे.) अशी खाद्ययात्रा सुरू झाली. तिचा प्रवास आता "स्टार्टर' (पक्षी : चकणा. यातही खूप सुंदर प्रकार आहेत, आठवताहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) पर्यंत येऊन ठेपलाय.
याच प्रवासाच्या सुग्रास आठवणींमध्ये मी रमणार आहे, तेही तुम्हाला बरोबर घेऊन. (काय दिवस आलेत.... असं वाटलं ना?) ही फक्त खाद्य यात्रा नाही. त्याबरोबर तिथल्या आठवणी, वातावरण यांचाही वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न. मधेमधे काही पदार्थांच्या समजलेल्या रेसिपिज. (बर्फीसारख्या नाहीत!) आता इथेच थांबतो. बाकीचं पुन्हा केव्हा तरी...
1 comments:
Good blog! Keep up!!
Post a Comment