थोडं समजून घ्यायला हवं ना?

Posted by Abhijit at 10:16 PM

Monday, June 2, 2008

माणसं समजून घेत नाहीत, याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. आपण काहीतरी चांगल्यासाठी करायला जावं, आणि तेच त्यांच्या दृष्टीनं वाईट ठरावं, यासारखं दु:ख नाही. एका हेतूनं करावं आणि तोच वाईट ठरावा.... माणसं समजून का घेत नाहीत? काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. त्या समजून घ्यायच्या असतात, हेसुद्धा समजावून सांगावं लागावं? खरंच डोकं बधीर होऊन जातं.

आपल्या चुका होत नाहीत, असंही नाही. चुका तर होतातच. अर्थात त्यापेक्षा मोठी चूक होऊ नये, याची आपण काळजी घेतच असतो ना... एखादी गोष्ट आत्ता सोपी वाटते. हवीहवीशी वाटते; पण तेव्हाचा तो मोह भविष्यासाठी घातक ठरू शकणारा असतो, हे आपण पाहतो. तो टाळण्याचा प्रयत्न करतो, हे चूक असतं का?मला वाटतं भविष्याच्या विचाराऐवजी क्षणिक मोहाचा पगडा खूपच मोठा असतो. आजच्या काळात हा विचार किती चालेल ते महित नाही. आजचा दिवस जगून घ्या... हेही तेवढंच खरं आहे. पण जगून घ्या, म्हणजे काय करा, इथं खरा मुद्दा येतो. गेला क्षण गेला, येणारा क्षण माझा, ही संकल्पनाही उत्तम. पण येणाऱ्या क्षणात कसं वागायचं, हे आपण ठरवू शकतो ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेलेला क्षण येणाऱ्या क्षणावर आपली छाप उमटवूनच जात असतो, त्याचं काय? आपल्याकडे ना थोडी गडबड झालीये. एकतर अगदी पारंपरिक किंवा अति आधुनिक. अर्थात अजूनही अति आधुनिक नाही, पण त्याकडे धावायचा प्रयत्न सुरू आहे. तर मुद्दा हाच आहे. पारंपरिक आणि अति आधुनिक याच्या मधला मार्ग काय? दोन्हीतलं चांगलं घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही का? तसं झालं, तर कितीतरी प्रश्‍न सुटतील...

0 comments: