पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भावभक्तीच्या आनंदानं कोंदून गेलाय. पांडुरंगाच्या समचरणी लीन होण्यासाठी आतुर झालाय. किमान एक हजार वर्षाची परंपरा असणारी ही वारी म्हणजे एक आश्चर्यच आहे. हजारो माणसं जमतात काय आणि एका शिस्तीत देहू, आळंदी ते पंढरपूर पायी जातात काय. बरं यासाठी कोणी कोणाला आमंत्रण धाडत नाही, की मानधनही देत नाही, तरीही इतकी वर्षे हा सोहळा त्याच शिस्तिनं चालू राहतो तरी कसा, असा आचंबा सध्याच्या काळात वाटतोच.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारी ती नैतिकतेची पाठशाळाच आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचं ज्ञानस्वरूप उभं केलं, तर भोळ्या भाविकांनी त्याचं भावदर्शन अनुभवलं. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात,
ज्ञानियांचे ज्ञेन, ध्यानियांचे ध्येय।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तु।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य।
योगियांचे गौप्य, परमधाम।
ते हे समचरण उभे विटेवरी।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप।।
ज्याला ज्ञानाने जाणायचं ते म्हणजे ज्ञेय, तर ध्यानानं गाठायचं आहे ते ध्येय. असं ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, तपस्वियांचं तप, जपकांचं जाप्य, योगियांचं गौप्य जिथे विटेवर समचरण उभं आहे, त्याला प्रेमानं आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे वारी.
परब्रह्माला साठवत विवेकाच्या दिशेनं होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल म्हणजे वारी. प्रत्येक क्रियेमध्ये साधन आणि साध्य या दोन बाजू असतात. साधनेनंच साध्य गाठायचं असतं. साधन आणि साधना खडतर असते, तर साध्य हे आनंदरूप. वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य हे दोनीही आनंदरूपच. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य, तर भक्तिरूप वाटचाल हे साधन. तुकोबा म्हणतात,
होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।
काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।
अभिमान नुरे। कोंड अवघेचि पुरे।
तुका म्हजे डोळा। विठो बैसला सावळा।
वारीचा भाव असतो, प्रेमभाव. वारीत चालता चालता द्वैत कधी संपते आणि अद्वैत कधी निर्माण होते, हे वारकऱ्यालाही कळत नाही. मी, माझं असा आपपर भावच शिल्लक राहात नाही. मग चालणारा माऊली, वाढणारा माऊली, पाहणारा माऊली, टाळ वाजवणारा माऊली असं होऊन जातं. तो विशाल जनसागर माऊली होऊन जातो आणि संथपणे वाहात राहतो प्रेमभाव. वारकरी विठ्ठलाला आईच्या, माऊलीच्या रूपात पाहतात. आई आणि लेकरं एकरूप झाली, की प्रेमाचा पान्हा फुटणारच ना... या प्रेमपान्ह्यात न्हात न्हात पावलं पुढे चालत राहतात. कधी फुगडी खेळत तर कधी रिंगण घालत... एकमेकांच्या पायी लागत, एकमेकांना आधार देत हा जनसागर आंदोळत पुढे चालत राहतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी शेकडो वर्षांपूर्वी मागितलेल्या भिक्षेचं मोल समजतं,
भिक्षेची ही झोळी। नामधर्म मेळी।
प्रेमाची आगळी। सोयरीक।
प्रेम द्यावी भिक्षा। प्रेम घ्यावी भिक्षा।
प्रेम हीच भिक्षा। द्यावी मज।।
वारी ही "पिकनिक' नाही. ती चिंतनशील जाणिवेचं अंतरंग उलगडणारी लोकशाळा आहे. स्टिफन कॅव्हेनं "सेव्हन हॅबिट्स' सांगितल्या आहेत. वारीने याआधी किमान हजार वर्षे पुढील सेव्हन हॅबिट्स सांगितलेल्या आहेत 1) माणसातल्या देवत्वाला ओळखून समता अंगी बाणवेन. 2) अभ्यासाशिवाय झोपणार नाही. 3) स्वीकारलेलं काम देवपूजा मानून करीन. 4) आई-वडील, गुरू-अतिथींचा मान राखेन. 5) समाजाला विधायक प्रकल्प देईन. 6) चारित्र्याला विठ्ठल समजेन. 7) कालमान ओळखून सद्वृत्तीने वागेन.
ही वारीची सप्तपदी आहे. आत्मप्रकाशाच्या लख्ख वाटांनी चालत चालत हे सारं आपण शिकायचं, समाजाला शिकवायचं, विश्वाला आपलेपणाचं नवं सार्थ भान द्यायचं. समाज एकात्म करायचा. यातून सामाजिक - सांस्कृतिक संचित समृद्ध करायचं, यासाठी देवाला भेटायचं ही कल्पना केवढी भव्य आहे!
पालखी कशासाठी? पालखी म्हणजे जीवनमूल्यांना विनम्र भावाने दिलेला उजाळा. "मी'पणा सोडून जीवनमूल्यं खांद्यावर घेऊन समाजविकासासाठी अथक प्रयत्न करण्याला "पालखीबरोबर जाणं' म्हणतात. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचं अंतिम मूल्य. नामदेव म्हणजे सगुण भक्ती. एकनाथ म्हणजे प्रपंचाचा आदर्श. तुकाराम म्हणजे सक्रिय नामसाधनेचा श्रेष्ठ आदर्श. ही सारी जीवनमूल्यं आजही गरजेची आहेत. ही सारी आमच्यासाठी पालखीत आहेत. ती आमच्यात रुजवायची आहेत किंवा ती आपल्याला प्रतिवर्षी नूतन करून घ्यायची आहेत. त्यासाठी पालखीबरोबर जायचं. माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवायचं. कारण मस्तक हे संस्कृतीचे पुस्तक आहे आणि पादुका या संपूर्ण व्यक्तित्त्वाचा प्राण आहे. म्हणून संतांच्या पायी लागून स्वत:ला "चार्ज' करून घ्यायचं. संतांचं अस्तित्व त्यांनी दिलेल्या मूल्यांत असतं. अशी मूल्यं समाजाच्या विकासाला उपयुक्त ठरतात. यातून जो "अवेअरनेस' येतो तो महत्त्वाचा असतो. साऱ्या संतांच्या पालख्या वाखरीच्या रिंगणात येतात. त्या वेळी संतांची नाती मानवाला नैतिक शिक्षण देतात. "सोपानकाका आले', "मुक्ताई-जनाई आल्या', "गोरोबा आले', "सावंतोबा-चोखोबा आले' याला केवढा व्यापक अर्थ आहे! "आले' या एका क्रियापदात सारे आले. संतत्वाचा सारा माहोल यामध्ये भावार्थ होऊन येतो. तो प्रतिमा बनतो. या प्रतिमा सांस्कृतिक अन्वयाला साह्य करतात. माणसामाणसातली नाती घट्ट आणि बोलकी होतात. त्या त्याला जगण्याचा वर्तमान देतात.
टाळ-पखवाजांच्या घोषातला माउलींचा गजर मनाला आश्वस्त करतो. माणसाला नवं बळ देतो, पुन्हा नवं सामर्थ्य देतो. याचं कारण माउलींनी दिलेले मार्दव; त्यांची विनयशीलता, त्यांची अहिंसा ही मूल्ये आजही वारीतून मिळतात.ज्ञानेश्वर माऊली या मार्गावर रंगले आणि गाऊ लागले,
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिही लोक।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया।।
वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली. ग्रंथातील अद्वैतता कृतीत आली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघा संसार सुखाचा झाला. या वारीत देव देवपण विसरतो. भक्त भक्तपण विसरतो. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचं रिंगण फुलतं. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो. देहाची इंद्रायणी शुद्ध होते. सोन्याचा मनपिंपळ सळसळतो, भीमातीर दाटू येतो. आत्मप्रभेतला विठ्ठल आलिंगतो अन् हात सहज जुळतात नि गातात "तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।'
वारी, वारकरी
Posted by Abhijit at 2:40 AM
Saturday, June 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
Lekh awadla. Pai wari ghado, deha santadari pado ase mhantat te khare ahe.Wari he mahahrashtrache vaibhav ahe.Dyanoba te Tukoba paryant appli MARATHI, MAHARASHTRACHI SANSKRITI AHE.
Post a Comment