काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशोबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील, पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू माझ्याशी... काय झालंय मलाच समजत नाही...
ऐकून मीच हादरलो. मी तर अजिबात भांडकुदळ नाही. मला रागही खूप कमी येतो, असं मी समजत होतो. कालच्या चर्चेनं थोडासा अंतर्मुख की काय म्हणतात, तो झालो. मग लक्षात आलं, आजकाल खरोखरच खटके जरा जास्तच उडायला लागले आहेत. तिला कळत नाही, आता हे बोलायलाच हवं का, तिला कुठे काय बोलावं हेच समजत नाही, असं काहीसं वाटत असतं मला. आणि दरवेळी खटका उडाल्यानंतर ती तेव्हा तशी का वागली, हे उशीरानं लक्षात येतं आणि स्वत:चीच चूक जाणवत राहते...तोंड उघडायच्या आधी या गोष्टी का जाणवत नाहीत, हेच समजत नाही. दुसरी बाजू का दिसत नाही? आधी आपण तोंड चालवून मोकळं व्हायचं... नंतर चूक लक्षात येते. तेव्हाही लगेच सॉरी वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीच आपल्याकडे... कधी सुधारणार आहे मी... अक्षरश: हताश झालो मी. आता मात्र सुधारायचं ठरवलंय... आधी ऑफिसमधले, बाहेरचे ताण-तणाव, ओढाताण असे सगळे पर्याय आणि कारणं स्वत:लाच देऊन झालीत. पण ती सारी स्वत:च्याच मनाची समजूत आहे, हे लक्षात आलंय. आपलं वागणं चुकतंय, आपणच सुधारायला हवं, हेच खरं...
0 comments:
Post a Comment