फक्त थोडा वेळ...

Posted by Abhijit at 11:24 PM

Thursday, June 5, 2008

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले."
"पण का?''
"'सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
"भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्‍न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्‍चितच फरक पडू शकतो. परमेश्‍वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''

या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्‍चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, "त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.

''व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.

आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्‍य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.

2 comments:

Anonymous said...

I like your blog. Short,Sweet and impressive.

Abhijit said...

Thnx Supriya