सतरा वर्षे झाली. साधारण हाच महिना किंवा थोडं अलिकडे पलिकडे... दहावी अ चा सेंडॉफ (आम्ही असंच म्हणायचो!) झाला. पुढे परीक्षा... त्यानंतर रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो, तो शेवटचा. त्यानंतर एखादा कार्यक्रम आणि सवाई याशिवाय शाळेत गेलोच नाही. कधीकधी त्या रस्त्यावरून जाताना "माझी शाळा...' एवढा एक उल्लेख! एवढ्या पटकन नातं तुटतं? पाचवी ते दहावी अशी पाच वर्ष काढली त्या शाळेत. त्या काळात शाळा हेच सर्वस्व होतं... दिवसाची सुरवात शाळेपासून व्हायची आणि शेवटही! तेव्हाचं, त्या वयात जेवढं काही विश्व होतं, त्यातील बहुतेक भाग शाळेनंच तर व्यापला होता...
तर ज्या शाळेनं विश्व व्यापलं होतं, तिची ही कथा, तर तेव्हाच्या जानी दोस्तांची काय कथा? शाळा संपल्यावर कॉलेजात साऱ्यांच्या वाटा बदलल्या आणि बदलूनच गेल्या... रोज कोंडाळं करून डबा खाणारे, आपल्या डब्यातलं दुसऱ्याला देणारे दोस्त गायबच झाले! कुठे गेले कोणास ठाऊक... अधेमधे कधीतरी एखादा भेटायचा तेवढंच... तेव्हा, तू काय करतोस? सध्या कुठे आहेस? जुनं कोणी भेटतं का? या तीन प्रश्नांच्या पुढे काही गाडी जायची नाही... एका खाणीतले काही दगड काही काळ एकत्र होते... नंतर वेगवेगळ्या बांधकामांवर गेले...!!
आज हे सारं अचानक बडबडायचं कारण म्हणजे परवा, शनिवारी आम्ही रमणबागेतले 14 मित्र भेटलो. सगळं क्रेडिट ऑर्कुटचं... च्यायला कोण कुठला ऑर्कुट, कुठल्या गूगल नावाच्या कंपनीत कामाला लागला. त्यानं हे नवं विश्व तयार केलं. आणि पुण्यातल्या एका शाळेतले 14 मित्र एकत्र आणायला कारणीभूत ठरला!!!
सतरा वर्षांपूर्वी लांब गेलेले मित्र एकत्र आले... जमले ते एकमेकांकडे डोळे बारीक करून पाहात... तू थिटे ना? तू ढोबळे ना? अरे जोश्या तसाच आहेस की अजून... अरे हा वाघचौरे... दुसरा कुठंय (हे वाघचौरे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकाच वर्गात!) ते जाऊ दे, तू अजय की विजय ते सांग आधी... अरे माम्या आला... ढेऱ्या केवढा बदललास... विसाळ... देशपांडेंची बातमी ऐकली आणि तुझी आठवण आली... (हा विसाळ शाळेत असताना "वऱ्हाड निघालंय लंडनला...' करून दाखवायचा) ओळख परेड संपली आणि सुरू झाली धमाल... ते चार-पाच तास कसे गेले समजलंच नाही... आता पुन्हा एकदा एकत्र भेटायचं ठरलंय... त्याआधी उरलेल्या वर्गाला एकत्र आणायचं आहे... पाहू पुढच्या वेळी किती जमतात ते...
मुद्दा या पार्टीचा नाही... सगळे भेटले याचा आनंद आहेच; पण मधली वर्षं गेली कुठे हा महत्त्वाचा मुद्दा आहे... अशा कितीतरी गोष्टी आपल्या हातातून निसटून जात असतात. जरा विचार केला, तर लक्षात येतं... अरे एकेकाळी खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतरानं हरवूनच गेल्या की... काहीवेळा वयामुळे फरक पडतो, काहीवेळा अनुभवामुळे... पण गंमत म्हणून... त्या काळाची आठवण म्हणून तरी त्या शोधायला काय हरकत आहे...
विषय शाळेवरून सुरू झाला असला, तरी तो बराच मोठाय नाही! खरंच कधीतरी स्वत:साठी वेळ काढावा आणि गेल्या काही वर्षांत आपण काय काय मागेच ठेवलंय, काय काय विसरून गेलंय आणि काय काय हरवलंय याचा हिशेब मांडायला हरकत नाही... अगदी व्यावहारिक विचार केला, तरी तो फायद्याचा ठरेल हे नक्की!
रमणबाग 1992 : 10 वी अ...
Posted by Abhijit at 1:02 AM
Monday, March 9, 2009
Remembering the Holocaust…
Posted by Abhijit at 3:45 AM
Wednesday, January 28, 2009
या आधीच प्रसिद्ध झालेल्या माझ्या "एका वंशसंहाराची स्मृती' या लेखाचे माझा मित्र गणेश कुलकर्णी याने इंग्लिशमध्ये भाषांतर केले. तोदेखील येथे प्रसिद्ध करतो आहे.
Writing about this subject is not without reason. All these things come to mind because, this Tuesday, on 27th January, world will be commemorating United Nations’ Holocaust Memorial Day.
A lot may think, why to celebrate these kind of days? The thing that had happened is now past; what is the point in bringing the memories up year after year? Basically, what purpose is this going to serve by remembering the mistakes which somebody else committed in past? Need we do all this at all? The answer to all this is a big ‘Yes’.
Why do we revel sweet memories? Why yesterday’s success remains fresh in heart even today? This happens because such things bring happiness to our lives, they teach us something. By the same scale, we should also take bitter memories seriously.
These memories teach us
How beastly a human being can become is shown by the holocausts that happened during WWII. It is possible that a human being roots for termination of a whole race, acts on the desire, and in that state of mania kills millions of people even without excepting children and elderly people – this truth comes afore only due to these memories. Even small mistakes – like those made by Britain, France, Russia etc. – meant death for thousands of innocent people. How the extreme hatred in heart of a man with absolute power can cause mayhem was also seen during this war.
The episodes of genocide have happened before WWII and even after it. Though the targets, medium, and leaders were different each time, nothing in human history can equal Holocaust that happened during the great war.
A study in human behaviour
Remembering all this is not brooding over past. This actually is a research – a study in human nature. How extreme can the goodness and evilness in our minds can become is the subject of this study. Human being is actually the most dangerous and most caring animal at the same time.
‘Hate’ is exclusive to humans. Other animals do fight, they also gauge the opponents. Sometimes the issue for them is of prey and sometimes it is of winning the ‘female’. But the fight ends when one of them wins. That is not the case with us humans. We can nurture the vengeance and hatred for generations. The hate goes on increasing as the time passes. Hitler is a glaring example of this extreme hatred.
On the other side, human being also has a sense of caring and morality that no other animal has. At times human can risk his own life to save others. There are a lot of such examples even in the war. Irena Sendler and Oskar Schindler have proved this good side of a human being to whole world. When there is darkness all over and not a single ray of hope, people like these come forward. The light they bring, howsoever dim, is priceless in such conditions. It gives assurance to people running away from darkness; It gives them hope about the new dawn just hours away.
Why should we study history?
Many people study most bloody episodes of history for different reasons. I look at all this as a way of becoming wiser. I feel that our attitude towards history is a faulty one. We either deify the historical events, squabble over the facts, or choose to be completely ignorant of the history. Nobody cares looking at it from angle of human feelings and emotions. We do not learn from history and keep on repeating same mistakes again and again.
The historical figures tell us not to act in a certain way, and also give us strength and hope to fight injustice and cruelty. Extreme hatred and cruelty are not improbable, and in the same fashion, strength of standing tall against injustice is also not hard to find. This rule in history has been proved again and again. As the perpetrators do not care about the effects of their hatred, the people who stand against it also do not fear of the consequences of their resistance.
The revolutionaries in India who fought against oppressive British rule were not afraid of death. They died with a smile on their lips for justice and motherland. Many sages from ancient India had the strength to pronounce death and decay for the most unjust and cruel kings of their times. All these are of the same league. These are the people who have made our lives livable, have provided us strength. The strength of standing against injustice comes to some in their childhoods and to some, like the prince Prahlad, it comes from within.
Past - for Future
It is heartening to learn that there will always be some Oskar Schindlers and Irena Sendlers, whenever there will be some Hitler in future. We are currently agitated by the financial turmoil and its effects. World recession is very eminent now. However, when we think about what people have suffered during the WWII and the holocaust, and how they survived all the travails, we understand that what we are experiencing is nothing compared to what they have gone through.
Past is past and we need to look ahead. But the way to future is shaped by the past. When we read about holocaust, we stop being afraid of bad things happening around us, we get assured that good will finally win over evil. We get inspiration and strength to swim through battles in our daily lives. And this is the outcome of knowing about good stories from past.
Abhijit Thite
Labels: Holocaust, Holocaust Memorial Day, Jew
एका वंशसंहाराची स्मृती
Posted by Abhijit at 9:43 PM
Friday, January 23, 2009
दुसरं महायुद्ध हे अनेक गोष्टींमुळे लक्षात राहतं; पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो ज्यूंच्या वंशसंहाराचा! या साऱ्या कालखंडाचा उल्लेख करायचा झाला, तर तो "न भूतो न भविष्यती' असाच करावा लागेल. सुमारे साठ लाख माणसांची या कालखंडात हत्या झाली. ती हत्या त्या माणसांची, त्या एका वंशाची नव्हती, तर माणुसकीचीच होती. त्या कथा वाचताना आजही अंगावर काटा उभा राहतो.
मा गच्या दोन आणि आजची एक अशा तीनही पिढ्यांना साद घालणारा विषय कोणता, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दुसरं महायुद्ध हे असेल. "युद्धस्य कथा रम्यः' याच न्यायानं हा विषय साद घालतो का? निश्चितच नाही. तसं असतं, तर आजपर्यंत झालेल्या युद्धांवरही भरपूर पुस्तकं लिहिली गेली असती आणि वाचली गेली असती. तसं घडताना दिसत नाही. मानवी भावभावना, हा यातील कळीचा मुद्दा आहे. दुसरं महायुद्ध, त्यातील पराक्रम, चुका, त्यात दिसलेलं क्रौर्य, चमकून गेलेलं धैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यू समाजाचा झालेला वंशसंहार या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
हा विषय आत्ताच लिहिण्यामागं एक कारण आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 27 जानेवारीला "होलोकास्ट' (वंशसंहार) स्मृतिदिन पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिवस पाळला जातो.
काही वेळा मनात विचार येतो, की हे असे दिवस का पाळायचे? झाली घटना होऊन गेली. पुनःपुन्हा त्याची आठवण काढून काय साध्य होणार आहे? मुळात काही जणांच्या चुका, घडून गेलेल्या गोष्टी परत का उगाळायच्या? हे सारं केलंच पाहिजे का?
यावर उत्तर आहे, केलंच पाहिजे! आपण चांगल्या स्मृती का जपतो? एखाद्या यशाची आठवण मनामध्ये कायम ताजी का असते? तर या गोष्टी आपल्याला आनंद देतात, काहीतरी शिकवतात म्हणून. त्याच न्यायानं अशा कटू स्मृतीही जपल्या पाहिजेत. माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, किती क्रूर होऊ शकतो, हे या वंशसंहाराच्या आठवणींतून समजतं. एखादा वंश संपवून टाकायची इच्छा माणूस मनात धरू शकतो. त्यानुसार वागू शकतो. त्या वेडाच्या भरात लाखो लोकांचं शिरकाण करू शकतो, लहान मुलं-वृद्ध यांच्याकडे पाहूनही त्याला पाझर फुटत नाही, हे सत्य त्यामुळे तर समाजासमोर येतं.
या आठवणी आपल्यासाठीच
वंशसंहार दिनाचाच विचार करायचा, तर आपल्यातील क्रूरता आपल्यालाच दिसावी आणि त्यातून आपल्यात बदल व्हावा, हेच त्याचं साध्य आहे. वंशसंहाराचे प्रयत्न त्यापूर्वीही झाले होते आणि नंतरही होत राहिले. त्याची माध्यमं वेगळी होती, नेते वेगळे होते; परंतु ज्यूंच्या वंशसंहाराएवढा भीषण प्रकार आजपर्यंत कधीही झालेला नाही. माणसाची सारीच्या सारी रूपं या कालखंडात पाहायला मिळतात. लहानशा चुकीमुळेही मोठी घटना घडू शकते, मोठं नुकसान होऊ शकतं हेही याच कालखंडात दिसून येतं. ब्रिटन, फ्रान्स, पोलंड आणि रशिया यांनी केलेल्या लहान-लहान चुका लाखोंच्या जिवावर बेतल्या. हाती बेलगाम सत्ता असणाऱ्यांच्या मनातील द्वेष, टोकाचा द्वेष किती मोठा संहार घडवू शकतो, हेही यातूनच दिसलं.
मानवी स्वभावाचा अभ्यास
या आठवणी म्हणजे दु:ख उगाळणं नाही. हा अभ्यास आहे. मानवी स्वभावाला जाणून घेण्याचा अभ्यास. आपल्यातील सुष्टता आणि दुष्टता या दोन्ही अगदी विरुद्ध भावना किती टोकाच्या असू शकतात, याचा अभ्यास. जगातील सगळ्यात धोकादायक आणि सहृदय प्राणी मानवच आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या मनात द्वेष ही भावना नसते. त्यांच्यात काही कारणांमुळे भांडणं होतात, झटापटी होतात, शक्तिपरीक्षण होतं. काही वेळा मुद्दा भक्ष्य मिळविण्याचा असतो, तर काही वेळा मादी; पण एकाचा जय झाला, की विषय संपतो, वैर संपतं. माणूस मात्र डूख धरून राहतो. तो त्याला राग आला म्हणून अनेकांच्या जिवावर उठू शकतो. तो पिढ्यान् पिढ्या राग बाळगू शकतो. माणसांबरोबर वैर संपत नाही, उलट ते वाढतंच राहतं. हिटलर अशा क्रौर्याचंच तर उदाहरण आहे.
हाच माणूस तेवढाच सहृदयही आहे. तो स्वतःच्या जिवाचा विचार न करता इतरांसाठी काम करू शकतो. दुसऱ्या कोणासाठी तरी तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्याही प्राणांची बाजी लावू शकतो. अशी उदाहरणंही याच इतिहासात सापडतात. इरेना सेंडलर, ऑस्कर शिंडलर यांनी ते सिद्धही करून दाखवलं. चारही बाजूनं अंधार दाटून आला, सूर्यही मावळला, सामान्यांच्या काळजाचा ठाव चुकला. आता काहीच होणं नाही, असं वाटायला लागलं, की काही जण स्वतःहून पुढे येतात. त्यांचा प्रकाश मंद असतो, मिणमिणता असतो; पण तेव्हा खूप मोलाचा असतो. अंधाराला घाबरून पुन्हा अंधारातच लपून बसलेल्यांना तो धीर देतो, शाश्वस्त करतो, की काळजी करू नका. ही रात्र सरू द्या, उद्या सूर्य उगवणारच आहे. तोपर्यंत आम्ही आहोत.
भविष्यकाळासाठी...
इतिहासातला सगळ्यात रक्तरंजित भाग अनेक जण वाचतात, अभ्यासतात. त्यांची त्यांची कारणं वेगळी असतील. त्यातील आपलं कोणतं, हे आपण ठरवायचं. मी स्वतः त्याकडे शहाणपण शिकणं, या दृष्टीनं पाहतो. मला वाटतं, की आपण इतिहासाकडे फार वेगळ्या दृष्टीनं पाहतो. एकतर तो डोक्यावर घेतो, त्यातील घटनांच्या खरेखोटेपणावरून वाद घालत बसतो किंवा तो पायदळी तुडवतो. त्यातील घटनांचा मानवी भावभावनांच्या दृष्टीनं कोणीच विचार करत नाही. तेव्हा झालेल्या चुका आपण समजावून घेत नाही. तसं झालं असतं, तर आपण पुनःपुन्हा तशाच चुका करत बसलो नसतो. यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याला कसं वागू नका हे सांगतात; तसंच जगण्याचं बळही देतात. अन्यायाविरुद्ध आपणही लढा देऊ शकू, असा आत्मविश्वास निर्माण करत असतात. एखादा वंशच संपवून टाकण्याएवढी तीव्र नकारात्मक भावना, द्वेष जसा निर्माण होऊ शकतो; तसंच त्याविरोधात उभं राहण्याची शक्तीही निर्माण होत असते. आजपर्यंत हा नियम वेळोवेळी सिद्ध झाला आहे. द्वेषाला, त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना जसं कोणाचंही सोयरसुतक नसतं; तसंच अन्यायाच्या विरोधात ठाकणाऱ्यांनाही नसतं. हा अन्याय दूर केला पाहिजे, एवढीच त्यांची तीव्र मनीषा असते, त्यांची जीवनेच्छा असते. इंग्रजांविरोधात उभे राहणारे, हसत हसत फाशी जाणारे क्रांतिकारक असोत, की हाल हाल होऊन मरणाची खात्री असतानाही तुझा अंत होणार आहे, असं रावणाला, कंसाला आणि पुराणातील अनेक राजांना उच्चरवानं सांगणारे ऋषिमुनी, सामान्य नागरिक असोत, या साऱ्यांची जातकुळी एकच. या साऱ्यांमुळेच आपलं जीवन सुरळीत चाललं आहे. ही मंडळी आपल्याला जगण्याचं बळ पुरवत असतात. यातील काहींना बाळकडू मिळालेलं असतं आणि प्रल्हादासारख्याला आंतरिक स्फुरण!
भूतकाळ भविष्यकाळासाठी...
भविष्यात पुन्हा असा काही प्रसंग उद्भवला, एखादा हिटलर निर्माण झाला, तर त्याला तोंड देण्यासाठी अशी माणसंही असणार आहेत, हा विचार दिलासा देणारा आहे. आज जागतिक मंदीसारखा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे. फक्त हाच नाही, तर इतरही अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहत असतात. अशा वेळी या गोष्टी आठवल्या, की आपली अडचण छोटीशी वाटायला लागते. या मंडळींनी एवढ्या मोठ्या संकटातून मार्ग काढला, मग आपल्यापुढचं संकट काहीच नाही, हे जाणवतं आणि रस्ता सापडत जातो. या गोष्टी यासाठीही महत्त्वाच्या आहेत.
गेला तो भूतकाळ आहे. आपण विचार करायचा तो भविष्याचा; पण भविष्याचा रस्ता भूतकाळातूनच जातो, हे विसरायचं नसतं. होलोकास्टच्या घटना या दृष्टीनं वाचल्या, की आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घटनांची भीती वाटेनाशी होते. चांगुलपणा साऱ्या वाईटपणाला पुरून उरतो, हे सत्य मनात लख्खकन प्रकाशून जातं. त्यातूनच रोजच्या धकाधकीत मुसंडी मारण्याचं बळ मिळतं आणि हेच त्या कथांचं फलित असतं.
27 जानेवारीच का?
होलोकास्टच्या त्या सहा वर्षांमध्ये नाझी सैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छळ छावण्या उभारल्या होत्या. बाहेरून पाहिल्यास साधा तुरुंग भासणाऱ्या या छळ छावण्यांमध्येच ज्यूंना ठार केलं जात होतं. आपण ऐकलेली "गॅस चेंबर्स' याच छावण्यांमध्येच होती. पोलंड या देशातील आउत्सविझ ही छळ छावणी त्यातील सर्वांत मोठी होती. तेथे 20 मे 1940 रोजी सुरू झालेला संहार पाच वर्षं सुरू होता. या काळात सुमारे 30 लाख लोकांची हत्या करण्यात आली. रशियाच्या सैन्यानं 27 जानेवारी 1945 रोजी या छळ छावणीवर कब्जा केला आणि शिल्लक राहिलेल्यांची मुक्तता केली. म्हणूनच वंशसंहाराच्या स्मृतीसाठी हा दिवस निवडण्यात आला.
Labels: lekh
अजून उजाडत नाही...
Posted by Abhijit at 11:00 PM
Friday, January 2, 2009
बेळगावमध्ये नुकताच एक घोटाळा उघडकीला आला. एका कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला. हा घोटाळा हजार ते पंधराशे कोटी रुपयांचा असावा असा अंदाज आहे. नेहमीप्रमाणे "स्कीम'चे योजनाकार पळून गेले आहेत आणि गुंतवणूकदार बंद ऑफिस आणि पोलिसांकडे फेऱ्या मारताहेत. अशा प्रकारची फसवणूक नवी नाही; पण यावेळी वेगळेपणा आहे, तो तंत्रज्ञानाची ओळख नसणाऱ्यांवर पाडलेल्या "वेबसाइट आणि मेसेज'च्या "इंप्रेशन'चा.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र आला होता कोल्हापूरहून. त्याच्याबरोबर आणखी काही जण होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं मस्त गप्पा झाल्या. बोलता बोलता त्यानं मला विचारलं, "तुला भरपूर पैसे कमवावे असं वाटत नाही का?' मी म्हटलं, "का नाही... भरपूर पैसे कोणाला नको आहेत?' मग त्यानं मला एक स्कीम सांगायला सुरवात केली. त्याच्याबरोबरचा एकजण पुढे आला आणि तो एका कागदावर वेगवेगळे आलेख काढत मला समजावून सांगू लागला. त्याची सुरवात एकदम "इम्प्रेसिव्ह' होती.
"मी आजकाल किती कमावतो माहिती आहे?'
"....'
"दहा लाख रुपये?'
"वर्षाला?' (समोरच्याला आनंद मिळावा म्हणून असा बावळट प्रश्न विचारायचाच असतो...)
"नाही महिन्याला...'
"हे पहा ही कंपनी कन्स्ट्रक्शन आणि पायाभूत सुविधांमध्ये पैसे गुंतवते. त्यामुळे रिटर्न्स भरपूर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये डॉलर्समध्येच पैसे गुंतवावे लागतात. किमान गुंतवणूक 500 डॉलर्सची. पैसे घेताना कंपनी एका डॉलरला पन्नास रुपये आणि देताना पंचेचाळीस रुपये, असा दर देते. याचा अर्थ आता तुला पंचवीस हजार रुपये गुंतवावे लागतील.'
"पैसे कसे द्यायचे, चेकनं?' माझी आपली मध्यमवर्गीय शंका...
"नाही नाही... जो काही व्यवहार आहे, तो रोखीनंच होतो. याची पावती वगैरे मिळत नाही. "हाय रिस्क, हाय गेन्स' हे तुला माहितीच असेल...'
"पण हे हाय गेन्स म्हणजे किती?' ...आपला संशयखोर स्वभाव काही बदलत नाही.
"20 टक्के!'
"वर्षाला?' पुन्हा एकदा भोळसट प्रश्न...
"महिन्याला...' उत्तर देणाऱ्याच्या चेहऱ्यावर आता त्रासिक भाव...
"महिना वीस टक्के मिळतात... म्हणजे साधारण आठ महिन्यांत तुझे गुंतवलेले पैसे वसूल! पुढे फक्त फायदाच फायदा! त्यानंतर तू आणखी काही मेंबर्स मिळवले, की प्रत्येक मेंबरच्या हप्त्यामागे तुझे पाच टक्के! आता घाल गणित...!'
"म्हणजे हा एमएलएमचाच प्रकार आहे...'
"बरोबर; पण खूप जास्त पैसे देणारा...'
"तरीपण रिस्क आहेच... आणि कंपनीला एवढे पैसे देणं कसं काय परवडतं?'
"ही कंपनी ज्या देशात आहे ना, तिथं कोणतेही टॅक्सेसच नाहीत. (इतक्या चांगल्या देशाचं नाव मी विसरलो, हा करंटेपणाच!) आणि मगाशी सांगितलं तशी गुंतवणूक पायाभूत आणि बांधकाम क्षेत्रात आहे... तू पुण्याला राहतोस आणि तुला बांधकाम क्षेत्रातला फायदा माहीत नाही...? (थूऽऽऽ तुझ्या... हे अध्याहृत. हे सारं चालू होतं, तेव्हा अमेरिकेतील बांधकाम व्यवसायाचा फुगा फुटला होता... मंदीनं हातपाय पसरायला सुरवात केली होती...)
आता माझा मित्र सरसावला... "उगाच शंका घेऊ नकोस. पावती नाही म्हणून काय झालं, त्यांची वेबसाइट आहे.(?) तू मेंबर होतोस तेव्हा तुझा पॅनकार्ड नंबर, एखादी फोटो आयडेंटिटी द्यावी लागते. त्यावरून ते पूर्ण चौकशी करून (?) मगच तुला मेंबर करतात... तुझा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेतात. मेंबर झालास की तुला मोबाईलवर मेसेज येऊ लागतात. सगळ्यात आधी तुला तुझा युझर नेम आणि पासवर्ड येतो. तू वेबसाइटवर जाऊन लॉगइन व्हायचं. तिथं तुला तुझी गुंतवणूक आणि दिलेले रिटर्न्स दिसतात. तुला तुझ्या पैशांचा फूल ट्रॅक ठेवता येतो... हे सारं कोणालाही करता येतं का? कंपनी व्यवस्थित आहे, म्हणूनच वेबसाइट तयार करता आली ना! आणि कंपनी अगदी वेळेवर, पाच म्हणजे डॉट पाच तारखेला पैसे पाठवते. आम्ही आत्ताच मुंबईहून येतोय... तिथं दिवसभरात पंचवीस लाख वाटले...'
मी बापड्यानं सगळं ऐकून घेतलं. या मंडळींना निरोप दिला. जाता जाता त्यांनी नवी कोरी इनोव्हा दाखवली...
"बघ चार महिन्यात घेतली कॅशवर... विचार कर...'
मीदेखील विचार केला. माझी बाईक काढली आणि चालू लागलो!
ही "स्कीम' म्हणजे "स्कॅम' होता, हे उघड दिसत होतं. पैसे गुंतविण्याचा प्रश्नच नव्हता. काही दिवसांनी त्यानं फोन केला. काय ठरलं असं विचारलं. मी नाही म्हणणार, हे त्यानं गृहीतच धरलं होतं... मग पुन्हा एकदा पुण्यावर, माझ्या भेकडपणावर चर्चा झाली आणि फोन बंद झाला....
अगदी अलीकडे, म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी त्याचा पुन्हा फोन आला..., "अरे वाईट बातमी आहे... मी जी कंपनी सांगत होतो ना... ती बुडाली रे... म्हणजे ती मंडळी पळाली...'
"अरे बापरे... तुझे किती गेले?'
"माझे नव्हते फारसे... पण माझे भाऊबंद, शेजारीपाजारी, मित्रमंडळी... असे भरपूर गेले. पार वाट लागली आहे...'
दोन-तीन वर्षांपासून बेळगाव शहर, जिल्हा तसंच कोल्हापूर जिल्हा, आजरा, गडहिंग्लज, चंदगड आदी भागात ही स्कीम जोरदार फोफावली होती. परवडत नव्हतं, त्यांनी कर्ज काढून पैसे भरले होते. हळूहळू या स्कीमनं कोकण पट्टा, गोवा आणि पुढे सातारा, पुणं, मुंबई असे हातपाय पसरले...
पैसे जमा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्कीमच्या प्रमुखांनी पोबारा केला. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील 14-15 जणांची बेळगावात धरपकड झाली... आता खटला उभा राहील... ज्यांचे पैसे अडकलेत, ते फेऱ्या मारत राहतील आणि दुसरीकडे अशीच एखादी "स्कीम' शिजू लागेल...
तशा या बातम्या नव्या नाहीत. बांगड्या पॉलिश करून देतो, नोटा दुप्पट करून देतो, लॉटरी लागली आहे, ट्रान्सस्क्रिप्शनची कामं आहेत पासून ते अशा स्कीमपर्यंत अनेक योजना अशी बुद्धिमान (?) मंडळी शोधत असतात. त्यामध्ये लाखो लोकांची फसवणूक होत असते. तरीदेखील नव्या योजनेत मंडळी पैसे गुंतवतातच!
एकूण काय, तर आपला जास्त पैशांचा लोभ काही कमी होत नाही. ही मंडळी आपलेच पैसे फिरवत राहतात, एवढे पैसे मिळाले असते, तर बॅंका कशाला राहिल्या असत्या, गरीब-श्रीमंत असा भेदभावच संपला असता, सगळीकडे संपन्नता-श्रीमंती दिसली असती... हे सारं काही ठाऊक असतं; पण... उजाडत नाही, हेच खरं...
लढाई जिंकली... पुढे?
Posted by Abhijit at 10:05 PM
Sunday, November 30, 2008
ही लढाई म्हणजे आधी शरीर पोखरत असलेल्या रोगानं वर काढलेलं डोकं होतं. त्यानं डोकं वर काढल्यानंतर आय.सी.यू.मध्ये तीन दिवस औषधोपचार झाले आणि वर आलेलं डोकं छाटून टाकण्यात आलं. याचा अर्थ रोगी बरा झालेला नाही. मुळात हा रोग का झाला आणि यापुढे किती दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. आता रोग दिसत नाही, म्हणून जल्लोष करण्यात अर्थ नाही. घरी आलेल्या रोग्याची नीट काळजी घेणं सगळ्यात आवश्यक असतं.
अभिजित थिटे
शनिवारी आपण लढाई जिंकली. आधीचे तीन दिवस टांगणीला लागलेला जीव सुखावला. ताज हॉटेलमधला शेवटचा अतिरेकी मारला गेला आणि आपण साऱ्यांनीच सुस्कारा सोडला. शनिवार सकाळपासून तणावलेलं वातावरण निवळलं. आपण सारेच मोकळे झालो... सिनेमाला जायला, गप्पा मारायला, मुक्तपणे फिरायला आणि अर्थातच राज्यकर्त्यांवर टीका करायला.
शनिवारी कशाला, शुक्रवारी रात्री टीव्हीवर नरिमन हाउस, ओबेरॉय हॉटेलची जी दृष्यं दाखवली जात होती, त्यावरून आपण तेव्हापासूनच जल्लोषी झाल्याचं दिसत होतंच की!
मुक्तपणे साजऱ्या करायच्या सुटीचे वेध शुक्रवारी लागले. शनिवारी सकाळी टीव्हीला चिकटलेले सगळे शेवटचा अतिरेकी मारला गेल्याच्या बातमीने मोकळे झाले आणि सुरू झाला जल्लोष...
हो जल्लोषच... अगदी रस्त्यावर उतरून गाणं-बजावणं नसेल; पण मनावरचा ताण हलका झालाच ना... आपण नेहमीच्या कार्यक्रमांना, विकएंडचे कार्यक्रम आखायला मोकळे झालो ना...
या दोन दिवसात, म्हणजे शनिवार आणि रविवारमध्ये या प्रकरणात दोषी कोण ही चर्चा अगदी जोमानं सुरू झाली. शिवराज पाटील, आर.आर. आबा, विलासराव, मनमोहनसिंग अगदी सगळ्या राज्यकर्त्यांवर आगपाखड करून झाली. कोणी हाच धागा भाजप सरकार ते थेट नेहरू आणि गांधीजींपर्यंतही नेला. यात सारेजण एक महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा गुन्हेगार विसरून गेले. विसरून गेले म्हणण्यापेक्षा हा गुन्हेगार आहे, हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. तो गुन्हेगार आहे, आपण सारे...
खोटं वाटतंय? पटत नाहीये? या घटनेची जबाबदारी आपल्यावरच कशी? लिहिणाऱ्याला वेड लागलंय... अशा काहीशा भावना उमटतील मनामध्ये; पण नीट विचार केला, आपणच केलेल्या विधानांची संगती लावली, तर सहजपणे लक्षात येईल, की हे खरं आहे. आपण एक एक मुद्दा विचारात घेऊ...
पहिला अगदी महत्त्वाचा मुद्दा राज्यकर्त्यांचा. आपले राज्यकर्ते नेभळट आहेत. ते कडक कारवाई करत नाहीत. त्यांना त्यांची "व्होट बॅंक' सुरक्षित ठेवायची आहे. मुद्दे चुकीचे आहेत का? तसं म्हणता येणार नाही; पण आपले राज्यकर्ते असे कसे, याचा आपण कधी विचार केला आहे का?
पटकन कोणावर तरी कारवाई करावी. चुकीचं वागणाऱ्याला अटकाव करावा, गुन्हेगाराला शासन करावं, एवढं स्वातंत्र्य आपणच दिलंय का त्यांना?
आपण येताजाता किती नियम तोडतो, याचा आपणच विचार केलाय का कधी? आपण केलेली बेकायदा बांधकामं आपल्या डोळ्यावर आलीत कधी? ती तोडायला येणाऱ्यांवर दगडफेक आपणच करत असतो ना? आपण जेव्हा घर घेतो, तेव्हा आपला बिल्डर मनपामध्ये इमारतीचा नकाशा "पास' करून घेण्यासाठी पाठवतो. त्यामध्ये इमारतीतील सगळ्या सदनिकांचे नकाशे असतात. कोणती खोली कुठे असेल, भिंती कोठे आहेत, प्रत्येक खोली किती चौरस फुटांची आहे, बाल्कनी आहे का, टेरेस आहे का, या सर्वांची नोंद त्या नकाशावर असते. याचाच अर्थ त्यानंतर आपण घरात जे काही बदल करू, ते मनपाच्या परवानगीने केले पाहिजेत, त्याची नोंद मनपामध्ये असली पाहिजे.
आपण आपल्या घरात अंतर्गत सजावट केली, बाल्कनी आत घेतली, खिडकी मोठी केली... किंवा इतर काही छोटे मोठे बदल नक्की केले असतील. या प्रत्येक बदलासाठी किती जणांनी मनपाची परवानगी घेतली? किती जणांनी नकाशे सादर केले? ही चूक नाहीये का? हा गुन्हा नाहीये का? परवा त्या अतिरेक्यांना ताज हॉटेलची खडान्खडा माहिती होती. आपल्या लष्कराला ती नव्हती. त्यांनी हॉटेलचा नकाशा मागितला, तर तो मनपामध्ये नव्हता. समजा असता, तर आतील सारी परिस्थिती नकाशामध्ये दाखविल्यासारखीच असती? आपण अशी खात्री देऊ शकतो?
आपल्या रस्त्यांवर कोट्यवधी गाड्या फिरतात. त्या चालविणारे तुमच्याआमच्यासारखे कोट्यवधी नागरिक आहेत. किती जणांकडे गाड्या चालविण्याचे परवाने, गाड्यांची, गाडी रस्त्यावर आणण्यासाठी आवश्यक असणारी आवश्यक कागदपत्रे आहेत? मी इथं प्रमाणाविषयी बोलतोय. तुमच्या-माझ्याकडे लायसन्स आहे, इथं मुद्दा प्रमाणाचा आहे. पोलिसांना विचारलं, तर ते प्रमाण सांगतात. गाडी चालविण्याचे नियम आपण पाळतो? पोलिस असल्यानंतर सिग्नल व्यवस्थित का पाळले जातात? पोलिस नसताना सिग्नल चुकविण्यावर का भर असतो? गोष्टी अगदी साध्या आहेत. गाड्या किंवा इमारत, घर या गोष्टी उदाहरणासाठी घेतल्या आहेत. आपण सारे व्यवस्थित नियम पाळणारे असू, तर नियम तोडणारा सहजपणे लक्षात येईल ना?
व्होटबॅंकेचा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चिला गेला. पण मुद्दा असा आहे, की या व्होट बॅंका तयार का होतात? जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या अस्मितांवर मते का मागितली जातात आणि तशी मागितल्यानंतर तो उमेदवार निवडून का येतो? मतदान किंवा आपली लोकशाही ही अस्मितांवर चालते का? आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असते का? आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये या विषयावर एक परिषदही झाली. बहुसंख्य खेड्यांमध्ये आजही संडास नाहीत. या प्रश्नावर एकही निवडणूक का लढली गेली नाही? शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्ते, गाड्यांची संख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रश्नांमुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मग हा महत्त्वाचा मुद्दा सोडून एखाद्या अस्मितेला हात का घातला जातो? आपण मत मागायला येणाऱ्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना जाब का विचारत नाही? त्यांना एखाद्या निवडणुकीत धडा का शिकवत नाही?
याचं कारण आपण मुळी मतदानालाच जात नाही. विचारी समाज मतदानापासून दूर राहणार असेल, तर या गोष्टी घडणारच. आपल्या देशाच्या सुदैवानं आणि मतदानाची आकडेवारी पाहता हा विचारी समाज बहुसंख्य आहेत. (त्यामुळे मतदानाची आकडेवारी नेहमी कमी असते...) या बहुसंख्यांनी असे प्रश्न विचारायला सुरवात केली आणि त्यानुसार मत द्यायला सुरवात केली, की राजकीय नेतृत्वाला विचार करावाच लागेल ना...
असे मुद्दे भरपूर आहेत. ताजमधील अतिरेक्यांपैकी दोघेजण तिथेच इंटर्नशिप करत होते म्हणे. याचाच अर्थ आधी ते कोणत्यातरी कॉलेजमध्ये शिकत होते. शिकताना कुठेतरी घर भाड्याने घेऊन राहात होते.
कॉलेजात ऍडमिशन कशा प्रकारे मिळू शकते, हे आपल्याला नवं नाही. घर भाड्याने घेतल्यानंतर आपण किती चौकशी करतो, हे आपल्यालाच चांगलं माहीत आहे. आपण सुरक्षितता पाहतो की भाडं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
एक चांगलं उदाहरण देतो. मी काही वर्षं गोव्यात होतो. तिथे ज्यांच्याकडे भाड्यानं राहात होतो, त्यांनी माझ्याकडून सुरवातीलाच एक फॉर्म भरून घेतला. तो फॉर्म पोलिसांनी दिला होता. त्यात माझी संपूर्ण माहिती, मी मुळचा कुठला ही माहिती, मूळच्या घराचा पत्ता, फोन, माझ्या मूळच्या घरात, म्हणजे पुण्यात आणखी कोण कोण राहतात, ते कुठे काम करतात, तिथले क्रमांक कोणते वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी नोंदून घेतल्या. नंतर मला पोलिस चौकीमध्ये जाऊन पोलिसांसमोर सह्या कराव्या लागल्या. पोलिसांनी मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये फोन करून, त्यांच्या पद्धतीनं चौकशी करून मी लिहून दिलेल्या गोष्टी खऱ्या असल्याची खात्री करून घेतली... हे असं इतर शहरांमध्ये का घडत नाही? मला गोव्याची पद्धत आवडली. मी तसं पोलिसांना सांगितलं, गोवा सोडताना त्यांना तसं पत्रही पाठवलं... आपण किमान एवढी चौकशी केली, पोलिसांना सहकार्य केलं, तर बरेच प्रश्न सुटतील, असं वाटत नाही का?
राहता राहिला मुद्दा सुरक्षिततेचा. हे अतिरेकी एकदम कसे घुसले हा... तर यात गुप्तहेर यंत्रणांचं अपयश आहे, हे मान्यच करायला हवं. तरीदेखील एक बोट आपल्याकडे वळतंच. साधं उदाहरण घेऊ. आपल्या इमारतीत किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कडक पावलं उचलली. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्यांची तपासणी करणं, नोंदी करणं सुरू केलं तर? माझ्या इमारतीत, घरात जाताना सिक्युरिटीनं माझी पिशवी, सॅक तपासायला सुरवात केली, तर मला चालेल? त्यात मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असेल तर?
जे तुम्हाला-मला चालत नाही, ते आपल्या आमदार-खासदारांना, मोठ्या अधिकाऱ्यांना चालेल?
मुद्दा फिरून फिरून तिथंच येतो. आपण अमेरिका, इंग्लंड, इस्राईलचं उदाहरण वारंवार देतो. तिथं कशी कडक सिक्युरिटी आहे, याचे गोडवे गातो. फक्त हे गात असताना तिथल्या नागरिकांविषयी विचार करायला विसरतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनं हे युद्ध आहे, असं घोषित केलं. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी प्रशासनाला प्रचंड सहकार्य केलं. तिथला मीडियाही जबाबदारीनं वागला. तिथल्या हल्ल्यांची, त्यानंतर होणाऱ्या कारवाईची दृष्यं टीव्ही सिरिअलसारखी दाखविली गेली नाहीत. जे दाखविणं आवश्यक आहे तेवढंच, आणि जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारवाईच्या दृष्टीनं घातक आहे, ते दाखविणं कटाक्षानं टाळलं गेलं. मागे गोळीबार होत असताना तिथले नागरिक "मज्जा' बघण्यासाठी गर्दी करत नाहीत. टीव्हीच्या कॅमेरासमोर घुटमळून हात हलवत नाहीत...
आपण तिथल्या स्वच्छतेचं कौतुक करतो, तेव्हा ती स्वच्छता सामान्य नागरिकच राखत असतात, हे का विसरतो?
मुद्दा हाच आहे. आपण नागरिक शास्त्र शिकतो, आचरणात आणत नाही. त्यामुळेच घटना घडून गेली, की राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. निवडणून न येणारी, निवडणुकीत पडणारी मंडळी देशाची महत्त्वाची मंत्रिपदं भूषवू शकतात. एकही निवडणूक सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य अथवा वाहतूक या प्रश्नावर लढविली जात नाही. स्वस्त तांदूळ, गहू, टीव्ही अशा भूलथापांना आपण बळी पडतो....
थोडक्यात आत्ता रोगानं वर काढलेलं डोकं छाटलं गेलंय. खरी काळजी रुग्ण घरी आल्यानंतर घ्यायची असते. ती आपण घ्यायला हवी. सुजाण नागरिक हे फक्त नागरिक शास्त्रातील पुस्तकात नसतात. ते प्रत्यक्षातही असावे लागतात. आपण आत्तातरी नसे नाही, म्हणून आपली लोकशाही साठ वर्षांची झाली, तरही "मॅच्युअर' होऊ शकलेली नाही. मुंबईची घटना हा आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या दुर्लक्षाचा परिपाक आहे. आतातरी आपण विचार करूया, पावलं उचलूया... आपल्या पुढच्या पिढीसाठीतरी हे करायलाच हवं...
काय चाललंय काय हे?
Posted by Abhijit at 9:56 PM
Wednesday, November 26, 2008
काल रात्रीपासून डोळ्याला डोळा नाही. मुंबईत जे काही सुरू आहे, त्याला युद्धच म्हटलं पाहिजे... कशासाठी हे सारं? काय साध्य होणार आहे यातून? अतिरेक्यांनी काही जणांना डांबून ठेवलंय. कदाचित ते काही मागण्या पुढे करतील. त्या पूर्ण केल्या जातील किंवा आता विचार न करता अतिरेक्यांना मारण्यात येईल... पुढे?
पुढे काय, हेच समजत नाहीये... टीव्हीवर काही फोटो दाखवत होते. कोवळी पोरं आहेत ती सगळी... पोलिस अधिकारी अशोक कामटेंचा चेहरा तर सारखा समोर येतोय... आणि एटीएसचे करकरे...
का? कशासाठी हे सारं?
ही पोरं तरी स्वत:च्या जीवावर उदार होऊन हे काय करताहेत? बरं कुठेही घुसून निष्पापांवर गोळ्या झाडून त्यांना तरी काय मिळणार आहे? मुक्ती? हा वेडाचार नाही का?
आधी कोणाच्यातरी आई, वडिल, बहिण, भाऊ, नवरा, बायको, आजी, आजोबा... असं कोणालातरी मारून मुक्ती मिळेल?
कोणाचा लढा आहे हा आणि कोणासाठी?
आपल्याला वाटणारा, जाणवणारा वेडाचार या पोरांच्या अंगी कसा काय भिनलाय? त्यांच्या अंगी हे भिनवणारे कोण आहेत? मुंबईतला हा प्रश्न सुटेल अजून काही तासांनी; पण या फक्त फांद्या आहेत... मुळांचं काय?
ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाकडे "दुरीतांचे तिमीर जावो, तया सत्कर्मी रती वाढो...' असं पसायदान मागितलं... काय झालं त्याचं? दोन्ही बाजूनी फक्त माणसं मरत चालली आहेत... मनं मात्र तशीच दुष्ट, क्रूर आणि निगरगट्ट राहिली आहेत...
बरं ज्याच्या नावाखाली... ज्या परमेश्वराच्या नावाखाली हे जे काही सुरू आहे, त्याला त्याची तरी मान्यता असेल का?
काल रात्रीपासून नुसते प्रश्नच घोघावताहेत डोक्यात... मुंबईत हकनाक बळी पडलेले ऐंशी नागरिक, ओळखीचे, माहिती झालेले आणि लढता लढता शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि ती कोवळी पोरं... सगळेच डोक्यात फिरताहेत...
मीच काय, आपण सारेच सुन्न झालोय...
प्रश्न फक्त सीमेवरचा किंवा काही शहरातला नाही... हा प्रश्न तुमच्या-आमच्या मनांचा असेल का? आतातरी कठोर पावलं उचलायला हवीत, असं सगळ्यांनाच वाटतंय... पण तेवढंच पुरेसं आहे?
"1947 अर्थ' सिनेमात एक गाणं आहे...
ईश्वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्यूँ है? दर्द है क्यूँ?
तेरा दिल तो इतना बडा है
इन्सॉं का दिल तंग है क्यूँ?
कदम कदम पर सरहद क्यूँ है?
सारी जमी जो तेरी है
सूरज के इतरे करती है
फिर क्यूँ इतनी अंधेरी है?
इस दुनिया के दामन पर
इन्सा के लहू का रंग है क्यूँ?
गुँज रही है कितनी चिखें
प्यार के माथे खून सुने
टूट रहें है कितने सपने
इनके टुकडे कौन चुने
दिलके दरवाजों पर ताले
तालों पर ये जंग है क्यूँ?
ईश्वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्यूँ है? दर्द है क्यूँ?
माझं येऊ घातलेलं नवं पुस्तक...
Posted by Abhijit at 10:02 PM
Thursday, November 20, 2008

दुसरं महायुद्ध. हिटलरनं ज्यूंचं शिरकाण मांडलं होतं. पोलंडच्या राजधानीत, वॉर्सामधल्या घेटोत सुमारे चार लाख ज्यू कोंडले होते. टप्प्याटप्प्यानं त्यांना छळ छावण्यांत पाठवून ठार मारण्यात येत होतं. घेटोतल्या छळामुळे आणि टंचाईमुळे एका महिन्यात सरासरी 5 ते 6 हजार माणसं मरत होती. लहान मुलांचे, अनाथ मुलांचे हाल तर विचारू नये असे होते. ज्यूंबाबत कणव वाटणाऱ्याला, त्यांना मदत करणाऱ्याला नाझी अतिशय क्रूर शिक्षा देत होते. मदत करणारं कुटुंबच्या कुटुंबच छळाला बळी पडत होतं. सारीकडे अंधार दाटून आला असताना इरेना सेंडलर नावाची एक तरुणी पुढे सरसावली. वॉर्साच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या या तरुणीनं घेटोमध्ये शिरकाव करून घेतला आणि सुरू झालं एक महानाट्य! छळ, क्रूरता विरुद्ध सहृदयता असा हा सामना होता...
Labels: book
