लढाई जिंकली... पुढे?

Posted by Abhijit at 10:05 PM

Sunday, November 30, 2008

ही लढाई म्हणजे आधी शरीर पोखरत असलेल्या रोगानं वर काढलेलं डोकं होतं. त्यानं डोकं वर काढल्यानंतर आय.सी.यू.मध्ये तीन दिवस औषधोपचार झाले आणि वर आलेलं डोकं छाटून टाकण्यात आलं. याचा अर्थ रोगी बरा झालेला नाही. मुळात हा रोग का झाला आणि यापुढे किती दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. आता रोग दिसत नाही, म्हणून जल्लोष करण्यात अर्थ नाही. घरी आलेल्या रोग्याची नीट काळजी घेणं सगळ्यात आवश्‍यक असतं.

अभिजित थिटे

शनिवारी आपण लढाई जिंकली. आधीचे तीन दिवस टांगणीला लागलेला जीव सुखावला. ताज हॉटेलमधला शेवटचा अतिरेकी मारला गेला आणि आपण साऱ्यांनीच सुस्कारा सोडला. शनिवार सकाळपासून तणावलेलं वातावरण निवळलं. आपण सारेच मोकळे झालो... सिनेमाला जायला, गप्पा मारायला, मुक्तपणे फिरायला आणि अर्थातच राज्यकर्त्यांवर टीका करायला.
शनिवारी कशाला, शुक्रवारी रात्री टीव्हीवर नरिमन हाउस, ओबेरॉय हॉटेलची जी दृष्यं दाखवली जात होती, त्यावरून आपण तेव्हापासूनच जल्लोषी झाल्याचं दिसत होतंच की!
मुक्‍तपणे साजऱ्या करायच्या सुटीचे वेध शुक्रवारी लागले. शनिवारी सकाळी टीव्हीला चिकटलेले सगळे शेवटचा अतिरेकी मारला गेल्याच्या बातमीने मोकळे झाले आणि सुरू झाला जल्लोष...
हो जल्लोषच... अगदी रस्त्यावर उतरून गाणं-बजावणं नसेल; पण मनावरचा ताण हलका झालाच ना... आपण नेहमीच्या कार्यक्रमांना, विकएंडचे कार्यक्रम आखायला मोकळे झालो ना...
या दोन दिवसात, म्हणजे शनिवार आणि रविवारमध्ये या प्रकरणात दोषी कोण ही चर्चा अगदी जोमानं सुरू झाली. शिवराज पाटील, आर.आर. आबा, विलासराव, मनमोहनसिंग अगदी सगळ्या राज्यकर्त्यांवर आगपाखड करून झाली. कोणी हाच धागा भाजप सरकार ते थेट नेहरू आणि गांधीजींपर्यंतही नेला. यात सारेजण एक महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा गुन्हेगार विसरून गेले. विसरून गेले म्हणण्यापेक्षा हा गुन्हेगार आहे, हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. तो गुन्हेगार आहे, आपण सारे...
खोटं वाटतंय? पटत नाहीये? या घटनेची जबाबदारी आपल्यावरच कशी? लिहिणाऱ्याला वेड लागलंय... अशा काहीशा भावना उमटतील मनामध्ये; पण नीट विचार केला, आपणच केलेल्या विधानांची संगती लावली, तर सहजपणे लक्षात येईल, की हे खरं आहे. आपण एक एक मुद्दा विचारात घेऊ...
पहिला अगदी महत्त्वाचा मुद्दा राज्यकर्त्यांचा. आपले राज्यकर्ते नेभळट आहेत. ते कडक कारवाई करत नाहीत. त्यांना त्यांची "व्होट बॅंक' सुरक्षित ठेवायची आहे. मुद्दे चुकीचे आहेत का? तसं म्हणता येणार नाही; पण आपले राज्यकर्ते असे कसे, याचा आपण कधी विचार केला आहे का?
पटकन कोणावर तरी कारवाई करावी. चुकीचं वागणाऱ्याला अटकाव करावा, गुन्हेगाराला शासन करावं, एवढं स्वातंत्र्य आपणच दिलंय का त्यांना?
आपण येताजाता किती नियम तोडतो, याचा आपणच विचार केलाय का कधी? आपण केलेली बेकायदा बांधकामं आपल्या डोळ्यावर आलीत कधी? ती तोडायला येणाऱ्यांवर दगडफेक आपणच करत असतो ना? आपण जेव्हा घर घेतो, तेव्हा आपला बिल्डर मनपामध्ये इमारतीचा नकाशा "पास' करून घेण्यासाठी पाठवतो. त्यामध्ये इमारतीतील सगळ्या सदनिकांचे नकाशे असतात. कोणती खोली कुठे असेल, भिंती कोठे आहेत, प्रत्येक खोली किती चौरस फुटांची आहे, बाल्कनी आहे का, टेरेस आहे का, या सर्वांची नोंद त्या नकाशावर असते. याचाच अर्थ त्यानंतर आपण घरात जे काही बदल करू, ते मनपाच्या परवानगीने केले पाहिजेत, त्याची नोंद मनपामध्ये असली पाहिजे.
आपण आपल्या घरात अंतर्गत सजावट केली, बाल्कनी आत घेतली, खिडकी मोठी केली... किंवा इतर काही छोटे मोठे बदल नक्की केले असतील. या प्रत्येक बदलासाठी किती जणांनी मनपाची परवानगी घेतली? किती जणांनी नकाशे सादर केले? ही चूक नाहीये का? हा गुन्हा नाहीये का? परवा त्या अतिरेक्‍यांना ताज हॉटेलची खडान्‌खडा माहिती होती. आपल्या लष्कराला ती नव्हती. त्यांनी हॉटेलचा नकाशा मागितला, तर तो मनपामध्ये नव्हता. समजा असता, तर आतील सारी परिस्थिती नकाशामध्ये दाखविल्यासारखीच असती? आपण अशी खात्री देऊ शकतो?
आपल्या रस्त्यांवर कोट्यवधी गाड्या फिरतात. त्या चालविणारे तुमच्याआमच्यासारखे कोट्यवधी नागरिक आहेत. किती जणांकडे गाड्या चालविण्याचे परवाने, गाड्यांची, गाडी रस्त्यावर आणण्यासाठी आवश्‍यक असणारी आवश्‍यक कागदपत्रे आहेत? मी इथं प्रमाणाविषयी बोलतोय. तुमच्या-माझ्याकडे लायसन्स आहे, इथं मुद्दा प्रमाणाचा आहे. पोलिसांना विचारलं, तर ते प्रमाण सांगतात. गाडी चालविण्याचे नियम आपण पाळतो? पोलिस असल्यानंतर सिग्नल व्यवस्थित का पाळले जातात? पोलिस नसताना सिग्नल चुकविण्यावर का भर असतो? गोष्टी अगदी साध्या आहेत. गाड्या किंवा इमारत, घर या गोष्टी उदाहरणासाठी घेतल्या आहेत. आपण सारे व्यवस्थित नियम पाळणारे असू, तर नियम तोडणारा सहजपणे लक्षात येईल ना?
व्होटबॅंकेचा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चिला गेला. पण मुद्दा असा आहे, की या व्होट बॅंका तयार का होतात? जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या अस्मितांवर मते का मागितली जातात आणि तशी मागितल्यानंतर तो उमेदवार निवडून का येतो? मतदान किंवा आपली लोकशाही ही अस्मितांवर चालते का? आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असते का? आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्‍न आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये या विषयावर एक परिषदही झाली. बहुसंख्य खेड्यांमध्ये आजही संडास नाहीत. या प्रश्‍नावर एकही निवडणूक का लढली गेली नाही? शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्ते, गाड्यांची संख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रश्‍नांमुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मग हा महत्त्वाचा मुद्दा सोडून एखाद्या अस्मितेला हात का घातला जातो? आपण मत मागायला येणाऱ्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना जाब का विचारत नाही? त्यांना एखाद्या निवडणुकीत धडा का शिकवत नाही?
याचं कारण आपण मुळी मतदानालाच जात नाही. विचारी समाज मतदानापासून दूर राहणार असेल, तर या गोष्टी घडणारच. आपल्या देशाच्या सुदैवानं आणि मतदानाची आकडेवारी पाहता हा विचारी समाज बहुसंख्य आहेत. (त्यामुळे मतदानाची आकडेवारी नेहमी कमी असते...) या बहुसंख्यांनी असे प्रश्‍न विचारायला सुरवात केली आणि त्यानुसार मत द्यायला सुरवात केली, की राजकीय नेतृत्वाला विचार करावाच लागेल ना...
असे मुद्दे भरपूर आहेत. ताजमधील अतिरेक्‍यांपैकी दोघेजण तिथेच इंटर्नशिप करत होते म्हणे. याचाच अर्थ आधी ते कोणत्यातरी कॉलेजमध्ये शिकत होते. शिकताना कुठेतरी घर भाड्याने घेऊन राहात होते.
कॉलेजात ऍडमिशन कशा प्रकारे मिळू शकते, हे आपल्याला नवं नाही. घर भाड्याने घेतल्यानंतर आपण किती चौकशी करतो, हे आपल्यालाच चांगलं माहीत आहे. आपण सुरक्षितता पाहतो की भाडं, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
एक चांगलं उदाहरण देतो. मी काही वर्षं गोव्यात होतो. तिथे ज्यांच्याकडे भाड्यानं राहात होतो, त्यांनी माझ्याकडून सुरवातीलाच एक फॉर्म भरून घेतला. तो फॉर्म पोलिसांनी दिला होता. त्यात माझी संपूर्ण माहिती, मी मुळचा कुठला ही माहिती, मूळच्या घराचा पत्ता, फोन, माझ्या मूळच्या घरात, म्हणजे पुण्यात आणखी कोण कोण राहतात, ते कुठे काम करतात, तिथले क्रमांक कोणते वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी नोंदून घेतल्या. नंतर मला पोलिस चौकीमध्ये जाऊन पोलिसांसमोर सह्या कराव्या लागल्या. पोलिसांनी मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये फोन करून, त्यांच्या पद्धतीनं चौकशी करून मी लिहून दिलेल्या गोष्टी खऱ्या असल्याची खात्री करून घेतली... हे असं इतर शहरांमध्ये का घडत नाही? मला गोव्याची पद्धत आवडली. मी तसं पोलिसांना सांगितलं, गोवा सोडताना त्यांना तसं पत्रही पाठवलं... आपण किमान एवढी चौकशी केली, पोलिसांना सहकार्य केलं, तर बरेच प्रश्‍न सुटतील, असं वाटत नाही का?
राहता राहिला मुद्दा सुरक्षिततेचा. हे अतिरेकी एकदम कसे घुसले हा... तर यात गुप्तहेर यंत्रणांचं अपयश आहे, हे मान्यच करायला हवं. तरीदेखील एक बोट आपल्याकडे वळतंच. साधं उदाहरण घेऊ. आपल्या इमारतीत किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कडक पावलं उचलली. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्यांची तपासणी करणं, नोंदी करणं सुरू केलं तर? माझ्या इमारतीत, घरात जाताना सिक्‍युरिटीनं माझी पिशवी, सॅक तपासायला सुरवात केली, तर मला चालेल? त्यात मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असेल तर?
जे तुम्हाला-मला चालत नाही, ते आपल्या आमदार-खासदारांना, मोठ्या अधिकाऱ्यांना चालेल?
मुद्दा फिरून फिरून तिथंच येतो. आपण अमेरिका, इंग्लंड, इस्राईलचं उदाहरण वारंवार देतो. तिथं कशी कडक सिक्‍युरिटी आहे, याचे गोडवे गातो. फक्त हे गात असताना तिथल्या नागरिकांविषयी विचार करायला विसरतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनं हे युद्ध आहे, असं घोषित केलं. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी प्रशासनाला प्रचंड सहकार्य केलं. तिथला मीडियाही जबाबदारीनं वागला. तिथल्या हल्ल्यांची, त्यानंतर होणाऱ्या कारवाईची दृष्यं टीव्ही सिरिअलसारखी दाखविली गेली नाहीत. जे दाखविणं आवश्‍यक आहे तेवढंच, आणि जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारवाईच्या दृष्टीनं घातक आहे, ते दाखविणं कटाक्षानं टाळलं गेलं. मागे गोळीबार होत असताना तिथले नागरिक "मज्जा' बघण्यासाठी गर्दी करत नाहीत. टीव्हीच्या कॅमेरासमोर घुटमळून हात हलवत नाहीत...
आपण तिथल्या स्वच्छतेचं कौतुक करतो, तेव्हा ती स्वच्छता सामान्य नागरिकच राखत असतात, हे का विसरतो?
मुद्दा हाच आहे. आपण नागरिक शास्त्र शिकतो, आचरणात आणत नाही. त्यामुळेच घटना घडून गेली, की राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. निवडणून न येणारी, निवडणुकीत पडणारी मंडळी देशाची महत्त्वाची मंत्रिपदं भूषवू शकतात. एकही निवडणूक सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य अथवा वाहतूक या प्रश्‍नावर लढविली जात नाही. स्वस्त तांदूळ, गहू, टीव्ही अशा भूलथापांना आपण बळी पडतो....
थोडक्‍यात आत्ता रोगानं वर काढलेलं डोकं छाटलं गेलंय. खरी काळजी रुग्ण घरी आल्यानंतर घ्यायची असते. ती आपण घ्यायला हवी. सुजाण नागरिक हे फक्त नागरिक शास्त्रातील पुस्तकात नसतात. ते प्रत्यक्षातही असावे लागतात. आपण आत्तातरी नसे नाही, म्हणून आपली लोकशाही साठ वर्षांची झाली, तरही "मॅच्युअर' होऊ शकलेली नाही. मुंबईची घटना हा आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या दुर्लक्षाचा परिपाक आहे. आतातरी आपण विचार करूया, पावलं उचलूया... आपल्या पुढच्या पिढीसाठीतरी हे करायलाच हवं...

काय चाललंय काय हे?

Posted by Abhijit at 9:56 PM

Wednesday, November 26, 2008

काल रात्रीपासून डोळ्याला डोळा नाही. मुंबईत जे काही सुरू आहे, त्याला युद्धच म्हटलं पाहिजे... कशासाठी हे सारं? काय साध्य होणार आहे यातून? अतिरेक्‍यांनी काही जणांना डांबून ठेवलंय. कदाचित ते काही मागण्या पुढे करतील. त्या पूर्ण केल्या जातील किंवा आता विचार न करता अतिरेक्‍यांना मारण्यात येईल... पुढे?
पुढे काय, हेच समजत नाहीये... टीव्हीवर काही फोटो दाखवत होते. कोवळी पोरं आहेत ती सगळी... पोलिस अधिकारी अशोक कामटेंचा चेहरा तर सारखा समोर येतोय... आणि एटीएसचे करकरे...
का? कशासाठी हे सारं?
ही पोरं तरी स्वत:च्या जीवावर उदार होऊन हे काय करताहेत? बरं कुठेही घुसून निष्पापांवर गोळ्या झाडून त्यांना तरी काय मिळणार आहे? मुक्ती? हा वेडाचार नाही का?
आधी कोणाच्यातरी आई, वडिल, बहिण, भाऊ, नवरा, बायको, आजी, आजोबा... असं कोणालातरी मारून मुक्ती मिळेल?
कोणाचा लढा आहे हा आणि कोणासाठी?
आपल्याला वाटणारा, जाणवणारा वेडाचार या पोरांच्या अंगी कसा काय भिनलाय? त्यांच्या अंगी हे भिनवणारे कोण आहेत? मुंबईतला हा प्रश्‍न सुटेल अजून काही तासांनी; पण या फक्त फांद्या आहेत... मुळांचं काय?
ज्ञानेश्‍वर माऊलींनी विश्‍वात्मक देवाकडे "दुरीतांचे तिमीर जावो, तया सत्कर्मी रती वाढो...' असं पसायदान मागितलं... काय झालं त्याचं? दोन्ही बाजूनी फक्त माणसं मरत चालली आहेत... मनं मात्र तशीच दुष्ट, क्रूर आणि निगरगट्ट राहिली आहेत...
बरं ज्याच्या नावाखाली... ज्या परमेश्‍वराच्या नावाखाली हे जे काही सुरू आहे, त्याला त्याची तरी मान्यता असेल का?
काल रात्रीपासून नुसते प्रश्‍नच घोघावताहेत डोक्‍यात... मुंबईत हकनाक बळी पडलेले ऐंशी नागरिक, ओळखीचे, माहिती झालेले आणि लढता लढता शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि ती कोवळी पोरं... सगळेच डोक्‍यात फिरताहेत...
मीच काय, आपण सारेच सुन्न झालोय...
प्रश्‍न फक्त सीमेवरचा किंवा काही शहरातला नाही... हा प्रश्‍न तुमच्या-आमच्या मनांचा असेल का? आतातरी कठोर पावलं उचलायला हवीत, असं सगळ्यांनाच वाटतंय... पण तेवढंच पुरेसं आहे?
"1947 अर्थ' सिनेमात एक गाणं आहे...

ईश्‍वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्‍यूँ है? दर्द है क्‍यूँ?
तेरा दिल तो इतना बडा है
इन्सॉं का दिल तंग है क्‍यूँ?

कदम कदम पर सरहद क्‍यूँ है?
सारी जमी जो तेरी है
सूरज के इतरे करती है
फिर क्‍यूँ इतनी अंधेरी है?
इस दुनिया के दामन पर
इन्सा के लहू का रंग है क्‍यूँ?

गुँज रही है कितनी चिखें
प्यार के माथे खून सुने
टूट रहें है कितने सपने
इनके टुकडे कौन चुने
दिलके दरवाजों पर ताले
तालों पर ये जंग है क्‍यूँ?

ईश्‍वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्‍यूँ है? दर्द है क्‍यूँ?

माझं येऊ घातलेलं नवं पुस्तक...

Posted by Abhijit at 10:02 PM

Thursday, November 20, 2008


दुसरं महायुद्ध. हिटलरनं ज्यूंचं शिरकाण मांडलं होतं. पोलंडच्या राजधानीत, वॉर्सामधल्या घेटोत सुमारे चार लाख ज्यू कोंडले होते. टप्प्याटप्प्यानं त्यांना छळ छावण्यांत पाठवून ठार मारण्यात येत होतं. घेटोतल्या छळामुळे आणि टंचाईमुळे एका महिन्यात सरासरी 5 ते 6 हजार माणसं मरत होती. लहान मुलांचे, अनाथ मुलांचे हाल तर विचारू नये असे होते. ज्यूंबाबत कणव वाटणाऱ्याला, त्यांना मदत करणाऱ्याला नाझी अतिशय क्रूर शिक्षा देत होते. मदत करणारं कुटुंबच्या कुटुंबच छळाला बळी पडत होतं. सारीकडे अंधार दाटून आला असताना इरेना सेंडलर नावाची एक तरुणी पुढे सरसावली. वॉर्साच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या या तरुणीनं घेटोमध्ये शिरकाव करून घेतला आणि सुरू झालं एक महानाट्य! छळ, क्रूरता विरुद्ध सहृदयता असा हा सामना होता...

तेजशलाका

Posted by Abhijit at 4:45 AM

Friday, October 31, 2008

इरेना सेंडलर यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात. आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर.

इरेना सेंडलर. पोलंडमधील वॉर्सापासून साधारण पंधरा मैलांवरील ओटवाक गावात 15 फेब्रुवारी 1910 रोजी जन्म. वडील डॉक्‍टर. इरेना सात वर्षांची असताना एका साथीच्या रोगात त्यांचं निधन. दुसरं महायुद्ध. नाझींचा नंगानाच अनुभवलेल्या इरेना यांचं वॉर्सामध्ये 12 मे 2008 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झालं. काय विशेष आहे या माहितीत? कोण या इरेना? 97 वर्षं जगल्या हे महत्त्वाचं, की त्यांनी दुसरं महायुद्ध अनुभवलं, हे महत्त्वाचं? ऑस्कर शिंडलर आठवतोय? शिंडलर्स लिस्ट सिनेमा पाहिलाय? त्यावरचं पुस्तक वाचलंय? सिनेमा पाहिलेला नसला, पुस्तक वाचलेलं नसलं, तरी ज्यूंच्या वंशविच्छेदाविरोधात उभ्या राहिलेल्या, एक हजार ज्यूंचा जीव वाचविणाऱ्या शिंडलरला कधीतरी मनोमन सलाम केलेलाच असेल. नाझींच्या क्रूरतेमुळे अंगावर काटा उभा राहिला असेल. ज्यूंसाठी जीवही कळवळला असेल. इरेना सेंडलर आणि ऑस्कर शिंडलर यांच्यात आडनावाच्या उच्चारातील काहीशा साधर्म्याशिवाय काय साम्य आहे?

मोठं आणि महत्त्वाचं साम्य आहे. शिंडलर यांच्याप्रमाणे इरेना यांनीही त्याच काळात थोड्याथोडक्‍या नाही, तर 2,500 ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून सोडवलं. हा आकडा चुकीचा वाटेल कदाचित. सुरवातीला कोणाचीही हीच प्रतिक्रिया होते. इरेना यांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतील इतिहास विषयाच्या चार विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिकेचीही हीच प्रतिक्रिया होती. 250 मुलं असावीत, असा त्यांचा अंदाज होता; पण इरेना हे व्यक्तिमत्त्व अशा साऱ्या अंदाजांना छेद देऊन, अनेक क्रिया-प्रतिक्रिया, अंदाज यांना मागे सारत इतकं उंच उभं राहतं, की भारावलेले आपण नतमस्तक होणंही क्षणभर विसरून जातो. इरेना एवढ्या मोठ्या होत्या, तर त्यांची माहिती कशी नाही? त्यांचं नावही कधी कानावर पडलेलं नाही. असं कसं?

इथेच इरेना आपल्या समजुतींना पहिला छेद देतात. तशी इस्राईलच्या याद वाशेम या संस्थेनं "राइट्‌स अमंग द नेशन्स' (सर्व देशांतील सर्वोत्तम) हा सर्वोच्च सन्मान देऊन 1965 मध्येच कृतज्ञता व्यक्त केली होती. पोलंड देशाचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या "व्हाइट ईगल'नंही त्या 2003 मध्येच सन्मानित झाल्या होत्या. त्याच वर्षी शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकासाठी पोलंड सरकारनं त्यांचं नामांकन केलं होतं. एवढं झालं, तरी त्यांची बाहेरच्या जगाला अजूनही फारशी माहिती नाही. पाश्‍चात्त्य राष्ट्रांना त्यांची थोडीफार ओळख 1999 नंतर होत गेली. अमेरिकेतील पिट्‌सबर्ग, कनास येथील एका शाळेतील काही मुलींना "इतिहास दिवसा'साठी एक नाटुकलं सादर करायचं होतं. कोणती व्यक्तिरेखा निवडू या, काय करू या, अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या शिक्षिका नॉम कॉनार्ड यांच्या हाती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी लागली. ती बातमी होती इरेना सेंडलर यांच्याविषयी. "द अदर शिंडलर्स' या नावानं ही बातमी होती. त्यात इरेना यांच्यावर एक परिच्छेद होता. त्यामध्ये त्यांनी वॉर्सा घेटोमधून 2,500 मुलांना वाचविलं, असा उल्लेख होता. या मंडळींनी आणखी संशोधन करायचं ठरवलं. एक तर ती बातमी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे पोलंडमध्ये माहितीविषयी चाचपणी सुरू झाली. त्यांचं थडगं कुठे आहे, अशीही विचारणा करून झाली. मिळालेली माहिती उत्साह वाढविणारी आणि तेवढीच आश्‍चर्यकारक होती. इरेना सेंडलर अजूनही हयात आहेत. त्या पोलंडमध्येच, अगदी वॉर्सामध्येच राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2,500 हा आकडा अगदी बरोबर आहे. या मुलींचा आनंद गगनात मावेना. त्यांनी इरेना यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांच्याकडून माहिती मिळवली. अर्थात मिळालेली माहिती खूप कमी असली, तरी 10 मिनिटांच्या नाटिकेसाठी पुरेशी होती. स्वतःविषयी, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी बोलायला इरेना स्वतःच नाखूष होत्या, ही धक्कादायकच बाब होती.

आपण केलेल्या या मोठ्या कामाची माहिती इरेना यांनी कधीच कोणालाही सांगितली नाही. "राइट्‌स अमंग द नेशन्स' आणि व्हाइट ईगल असे मानाचे पुरस्कार मिळूनही त्या जगासाठी अनोळखी होत्या, याचं कारण हेच आहे. पण ही ओळख झाली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानं जगाला विनाश, क्रूरता, वंशविच्छेद, विध्वंस यासारख्या मानवी मनाच्या काळ्या बाजू दाखविल्या. माणूस किती पातळीपर्यंत हीन होऊ शकतो, तो किती क्रूर असू शकतो, याची उदाहरणं दिली. पण त्याच महायुद्धानं ऑस्कर शिंडलर, इरेना सेंडलर, फ्रान्समध्ये असणाऱ्या बुद्धिमंत आणि कलाकार ज्यूंना वाचविणारी मेरी जेन गोल्ड ही अमेरिकन महिला, हंगेरीतील जॉर्जिओ पेर्लास्का अशी माणसंही दिली. नाझींच्या ताब्यात जाऊनही आपल्या देशातील ज्यूंना छळछावणीत पाठवू न देणारं, त्यांना संरक्षण देण्यासाठी धडपडणारं, अगदीच अवघड परिस्थिती निर्माण झाल्यावर साऱ्या ज्यूंना पळून जाण्यास मदत करणारं आणि युद्ध संपल्यावर त्यांचं आनंदानं स्वागत करणारं डेन्मार्कसारखं राष्ट्रही याच युद्धात जगानं पाहिलं. होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद हा मानवी इतिहासातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्‍य. महायुद्ध संपून आज सत्तर वर्षं होत आली, तरी या जखमा काही भरत नाहीत. भरणं शक्‍यही नाही. ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकीही असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो, तो हाच असतो.

घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्यांत काही स्त्रियाही होत्या, लहान लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणाऱ्यांतही काही स्त्रिया होत्या, आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडविणारी, मायेची पखरण करणारी इरेना नावाची एक आईही होती. मारणाऱ्यापेक्षा वाचविणारा नेहमीच श्रेष्ठ असतो, हे वाक्‍य आपण साऱ्यांनीच कधी ना कधी, कुठे ना कुठे वाचलेलं, ऐकलेलं असतं. त्याची यथार्थता इरेना यांच्या कहाणीत दिसते. इरेना यांचा विचार करायचा तो यासाठीही.

"अणुरेणुया थोकडा, तुका आभाळाएवढा,' संत तुकाराम महाराजांचं हे वचन या साऱ्या कालावधीत ठसठशीतपणे सामोरं येतं. मानवी मनाच्या या दोन अवस्था या कालावधीचा विचार करताना प्रकर्षानं जाणवतात. स्वतःच्या मुलाबाळांची, घरातील वडीलधाऱ्यांची अगदी मनापासून काळजी घेणारा एक माणूस दुसऱ्याबाबत कल्पनातीत क्रूर होऊ शकतो, हे इथंच तर दिसतं. आपल्या बाळाला साधा ठसका लागला, तर धावाधाव करणारा एक डॉक्‍टरी पेशाचा माणूस केवळ ज्यू आहेत, या कारणासाठी लहान लहान मुलांवर विविध प्रयोग करतो, त्यांचा "गिनिपिग' म्हणून वापर करतो, तोही कोणत्याही प्रकारची भूलही न देता, या क्रूरतेला काय म्हणावं? घरातील ज्येष्ठांचा आदरसत्कार करणारा एखादा अधिकारी केवळ धर्म ज्यू आहे म्हणून एखाद्या आजोबांची दाढी हिसडून काढतो. वेदनेनं कळवळले, या "गुन्ह्या'ची शिक्षा म्हणून बेदम मारहाण करतो. मजा म्हणून संगिनीच्या धाकानं एका आजीबाईंना भर रस्त्यात नाचायला लावलं जातं. आपल्या बाळाला फुलासारखं जपणारा एक सैनिक एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतो, उंच उडवतो आणि दुसरा सैनिक त्या उडवलेल्या बाळावर गोळी झाडतो आणि या नेमबाजीचं बाकीचे कौतुक करतात, या साऱ्याची संगती लावायची तरी कशी? अणूपेक्षा लहान, कोतं आणि क्रूर मन वेगळं काय असणार?

हे सारं पाहून दुसरी एक स्त्री कळवळते. तिचं कळवळणं घरापुरतंच मर्यादित राहत नाही. काहीतरी केलं पाहिजे, कोणीतरी पुढं झालं पाहिजे, अशी फक्त दिवाणखान्यापुरती चर्चा राहत नाही. ती स्वतः पुढं होते. वॉर्सामधील ज्यूंसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या एका संघटनेसाठी काम करू लागते. लहान लहान मुलांना त्या घेटोतून बाहेर काढण्याचं, त्यांचा जीव वाचविण्याचं स्वप्न पाहते; ते प्रत्यक्षातही आणते. काम करताना पकडली जाते. प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सोसते. आपण बोललो तर आतापर्यंत वाचविलेली मुलं आणि त्यांना आश्रय देणाऱ्या शेकडो, हजारो पोलिश कुटुंबांवर नाझी अत्याचारांचा नांगर फिरेल, याची तिला जाणीव असते. हजारोंचा जीव, का एक जीव... तिच्यासमोर अगदी साधा, सरळ प्रश्‍न असतो. ती त्या एका जिवाची निवड करते. तो जीव तिचा स्वतःचा असतो, तरीही! इतका छळ सोसूनही ती तोंड उघडत नाही, हे पाहून संतापलेले नाझी तिला मृत्युदंड फर्मावतात. बातमी समजल्यावर ती गुप्त संघटना तातडीनं हालचाली करते आणि गोळ्या घालण्याआधी काही मिनिटं तिची सुटका होते. तिला मृत्युदंड देण्यात आला, अशी बातमी सगळीकडे पसरते. त्या संघटनेला ती सापडते ती एका निर्जन स्थळी, तीही बेशुद्ध आणि हातापायांची हाडं तुटलेलया अवस्थेत. संघटना काळजी घेते. ती बरी होते आणि युद्ध संपेपर्यंत लपून राहून काम करतच राहते. "आकाशाएवढा...' हे याहून वेगळं असतं? त्या तरुण मुलीचं नाव होतं इरेना सेंडलर.

पण तिची कहाणी, तिचं काम इथंच थांबत नाही. युद्ध संपल्यानंतर स्वतःकडची यादी बाहेर काढून त्या वाचविलेल्या ज्यू बाळांना त्यांची ओळख मिळवून देण्याचं काम ती त्या संघटनेमार्फत करत राहते. अडीच हजार मुलांपैकी चारशे मुलांचा शोध लागत नाही, म्हणून हळहळत राहते. तिचं पोलंडच्या संसदेत कौतुक झालं, मानसन्मान मिळाले, तरी "मी काहीच विशेष केलं नाही,' या मतावर ती ठाम राहते. "आम ्ही तीस जण हे काम करत होतो. कौतुक साऱ्यांचंच आहे. आमच्या एका सहकाऱ्यानं मृत्युदंड स्वीकारला आहे. मी हयात आहे, म्हणून हा मान मला मिळतो,' असं तिला प्रामाणिकपणे वाटत राहतं. पोलंडच्या पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना ती म्हणते, "आपण सारेच या भूतलावर काही ना काही कारणासाठी जन्माला येतो. मी जे केलं असं सांगण्यात येतंय, कदाचित माझ्या जन्माला येण्यामागे तेच कारण असेल...' इरेना यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. तेथून पुढे वयाच्या सत्याण्णवाव्या वर्षापर्यंतचं त्यांचं साधं, निर्व्याज आणि निगर्वी जीवन पाहून कोणती उपमा देणार? त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात.

आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर. सामान्यांना धीर देतात ही माणसं. अन्यथा लाखो ज्यूंचं शिरकाण करणारा हिटलर, मुसोलिनी, आताचा ओसामा बिन लादेन ते आपल्या गावात, शहरात खून पाडणारा एखादा पिसाट खुनी, गावगुंड यांच्या गर्दीत आपण सारे हरवून गेलो असतो. कदाचित त्यांचे गुलाम बनून राहिलो असतो. प्रसंगी आपणही प्रतिकार करू शकू, असं आपल्याही अंतर्मनात कुठेतरी वाटत असतं, त्याचं कारण इरेना यांच्यासारखी माणसं असतात. माणसातले पशू अशाच माणसांना घाबरून असतात. सामान्यांची असामान्य शक्ती त्यांना ठाऊक असते. आपल्याला मात्र नसते, हेच तर दुर्दैव.

(माझ्याच आगामी पुस्तकातून)

पह्यलं नमन....

Posted by Abhijit at 11:02 PM

Sunday, September 7, 2008

वेदांपासून संतसाहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र "पह्यलं नमन' गणपतीला केलं जातं. आजही आपण सारेच गणेशवंदनाने कार्यारंभ करतो. ही प्रथा का पडली असावी? त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा? उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, ज्ञानोपासना, दूरदृष्टी, निर्णयक्षमता, लहानात लहान घटकाला सामावून घेण्याची, तसेच ज्येष्ठांचा आदर राखण्याची, त्यांचा सल्ला ऐकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा-उत्साह यांसारख्या गुणांचा त्यांनी विचार केला असेल का? या गोष्टींचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागतो का? कार्यारंभ उत्तम होणे म्हणजे पुढच्या यशाची शाश्‍वती असते का? चला... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू या!

कुठल्याही कार्याची सुरवात गणेशाच्या पूजनाने करण्याची प्रथा आहे. इतर धर्मीयांमध्ये गणेशाचे पूजन नाही; परंतु त्या त्या परंपरेनुसार प्रार्थना म्हणून कार्यारंभ केला जातो. सहज विचार केला तर या प्रथा परंपरांची कारणमीमांसा करता येते. कोणत्याही कार्याचा आरंभ शुभ घटनेने व्हावा, हीच यामागची इच्छा असते. नाटक किंवा वगाच्या सुरवातीलाच "पहिलं नमन इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळीला...' करतात. म्हणजे स्थानिक देवदेवता, प्रतिष्ठित नागरिक आणि अर्थातच जनताजनार्दन! हे असं पहिलं नमन केलं की काम करणं सुकर होतं, त्यामध्ये यश मिळण्याची शक्‍यता अर्थातच अतिशय जास्त असते.

हा विचार आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवला आणि तशी प्रथा निर्माण केली. त्यांनी दाखविलेला हा रस्ता आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. "वेल बिगिनिंग इज हाफ डन' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ तोच. चांगली सुरवात म्हणजे निम्मं काम झाल्याची पावतीच असते! आता कंपनीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादं काम सुरू करताना गणेशपूजन किंवा प्रार्थना करणं शक्‍य नाही. आपल्या पूर्वसुरींना ते अपेक्षितही नाही. कार्याचा आरंभ गणेशपूजनानं करणं, या प्रथेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्यांनी गणेशाचीच निवड का केली असावी, इतर कोणतीही देवता का निवडली नसावी, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा; तर योग्य तो मार्ग दिसेल. यासाठी पुराण कथा थोड्या बाजूला ठेवाव्या लागतील.

गणेशाचं चरित्र पाहिलं की त्याचे गुण समोर येतात. एक तर ही देवता बुद्धीची आहे. बुद्धीबरोबरच नेतृत्व, संघटना बांधण्याचं सामर्थ्य, तीक्ष्ण आणि दूरदृष्टी, प्रसंगी मानापमान बाजूला ठेवण्याची क्षमता, प्रचंड उत्साह-ऊर्जा, उंदरासारख्या लहानातल्या लहान घटकाला सामावून आणि सांभाळून घेणं, खटासी खट आणि नटखटासी नटखट राहणं, ज्येष्ठांचा आदर करणं, त्याचबरोबर प्रसंग पाहून त्वरित निर्णय घेणं, आदी गुण आपल्याला गणपतीमध्ये दिसतात. कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी या गुणांची नितांत आवश्‍यकता असते.

उदाहरणच घ्यायचं तर कंपनीच्या एखाद्या "प्रोजेक्‍ट'चं घेता येईल. समजा एखाद्या कंपनीनं विशिष्ट वस्तू बनविण्याचं कंत्राट घेतलं आहे. हे कंत्राट वेळेवर आणि उत्तम दर्जाचं द्यायचं आहे. अशा वेळी कंपनी काय करते? आपल्याच कर्मचाऱ्यांपैकी काही जणांची या कामासाठी निवड करते. आता हा कार्यारंभ उत्तम होण्यासाठी तेथे गणेशाचं म्हणजे गणपतीच्या गुणांचं अधिष्ठान असणं आवश्‍यक आहे. हे कसं शक्‍य होईल? तर संघाच्या निवडीपासून सुरवात केली पाहिजे. या संघातील सदस्यांना त्या कामाची पूर्ण माहिती, ज्ञान असणं गरजेचं आहे. फक्त माहिती असणं उपयोगाचं नाही तर ज्ञान असणं आवश्‍यक आहे. या सदस्यांमध्ये एकोपा पाहिजे, ते काम सांगितल्या वेळेत आणि दर्जानुसार पूर्ण करण्याची त्यांची मनोमन इच्छा हवी. (हॅ... काहीतरी करतात, आम्हाला विचारायला काय होतं? शक्‍य आहे का? उगाचच तोंडघशी पडणार आता... असा विचार करणारे नकोत. एक खराब आंबा टोपलीतले इतर आंबे नासवतो!) या संघाचं नेतृत्व अशाच एका कुशल कर्मचाऱ्याकडे किंवा संचालकाकडे द्यायला हवं. हा नेता सगळ्यांना सांभाळून घेणारा, प्रसंगी मानापमान दूर ठेवणारा हवा. त्याने अनुभवी लोकांच्या मताला मान दिला पाहिजे, त्याचबरोबर तो लहानातल्या लहान घटकाच्या सूचनाही लक्षपूर्वक ऐकणारा आणि त्याला मान देणारा हवा. या सर्व सूचना ऐकून त्याने गरजेप्रमाणे आवश्‍यक ते निर्णय पटापट घेतले पाहिजेत. त्याच वेळी असा निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्याने ओळखले पाहिजेत. काही निर्णय त्या वेळी तोटा करणारे वाटतात; परंतु पुढच्या काळात मात्र त्यांचा फायदाच होत असतो. नेता हा खटासी खट आणि नटखटासी नटखट असला पाहिजे. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेता स्वत: उत्साहाचं-ऊर्जेचं आगर हवा. त्याच्यामुळे त्याच्या गटातील सदस्यांना स्फूर्ती मिळते. तेही पडेल ते काम उत्साहाने करण्यास सरसावतात.

आता ते काम करण्यासाठी असा संघ तयार झाला, की निम्मं काम झाल्यासारखंच असतं. नंतर उरते ती कामाची औपचारिकता. त्यांना यश मिळालं की इतरही कर्मचारी अशा प्रकारे काम करण्यास पुढे येतात. ही मंडळी काम करत असताना एक वेगळाच उत्साह-ऊर्जा निर्माण झालेली असते. ती ऊर्जा इतर कर्मचाऱ्यांनाही जाणवत असते. या मंडळींची चर्चा, त्यांचा झपाटा पाहून इतर कर्मचाऱ्यांतही तो "माहोल' निर्माण होतो. मग त्या कामाशी संबंध असो वा नसो- प्रत्येकालाच ही "असाईनमेंट' पूर्ण झालीच पाहिजे, असं वाटू लागतं. आता इतके शुभेच्छुक आणि शुभेच्छा पाठीशी असल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे, नाही का?म्हणूनच महत्त्व आहे ते पहिल्या नमनाला, अशा अर्थाने गणेशाच्या पूजनाला. कर्मकांडात न गुंतता त्या त्या व्यक्तिविशेषाचा विचार करून मार्ग शोधला की उत्तर नक्की सापडतं. गणेशाचे हे गुण अंगी बाणवले की ती व्यक्ती उत्तम प्रशासक तर होतेच, परंतु त्या संघटनेच्या गळ्यातील ताईतही होते.

या गोष्टी सर्वांनाच लागू आहेत. केवळ कंपनीच्या कामकाजातच नाही, तर घरापासून इतर कोणत्याही कामापर्यंत "टीम लीडर'पासून "टीम मेंबर'पर्यंत सर्वच असा विचार करू शकतात. नव्हे, त्यांनी तो करावा. सध्याच्या राजकीय रणधुमाळीत तर कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत सर्वांनीच अशा तऱ्हेने विचार केल्यास आजचं राजकारणाचं चित्रच पालटून जाईल! येत्या गणेश जयंतीला अशा विचारांचं तोरण चढवलं तर ते गणपतीलाही निश्‍चित आवडेल.

तुला पाहिले मी...

Posted by Abhijit at 2:08 AM

Monday, August 25, 2008

तुला पाहिले मी
नदीच्या किनारी...
तुझे केस पाठीवरी मोकळे...

मस्त कविता आणि तिला तेवढाच मस्त साज... सुरेश वाडकरांचा आवाज... सगळं कसं छान जुळून आलंय...आणखी काय बोलणार यावर..."ऐकून तर पहा...' वर जा, क्‍लिक करा आणि अनुभवा...

आणखी एक संदीप...

Posted by Abhijit at 2:47 AM

Thursday, August 21, 2008

दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?

काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला फास लावून घेतला. आयटी क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्या या दोन घटना. संदीपच्या घटनेनंतर ब्लॉग, कम्युनिटीज आणि अर्थातच मीडियामध्ये चर्चा सुरू झाली होती. साऱ्या चर्चेचा सूर होता कशासाठी? उत्तम नोकरी असणाऱ्या, उत्तम पगार असणाऱ्या आणि अर्थातच पुढे चांगलं करिअर असणाऱ्या तरुणांनी आत्महत्या का करावी?

संदीपनं कारण दिलं होतं कामाचा ताण. सरोजकुमारच्या आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नाही. तरीही या दोन घटनांमध्ये एक सूत्र दिसून येतं, ते म्हणजे "हेच उत्तर...' अशी त्यांची झालेली धारणा. या दोघांचे प्रश्‍न इतके टोकाचे असतील का? खरं सांगायचं तर आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. मुळात प्रश्‍न किती मोठा आणि किती छोटा, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं.

संदीपच्या घटनेनंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊन स्वत:कडेच पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण फक्त धावत सुटलो आहोत. कुठे धावायचं, कुठपर्यंत धावायचं आणि किती धावायचं, हे माहितीच नाही! कधीतरी दम लागतो, कधीतरी कंटाळा येतो, मन सांगत राहतं; पण मी माझं मन, मेंदू आणि शरीर या साऱ्यांनाच फक्त पिटाळतो आहे. माझी लाइफस्टाईल पूर्ण बदलून गेली आहे. मी उठतो, आवरतो आणि ऑफिसला धावतो. तिथं काम करतो. मधे कधीतरी कॅंटीनकडे किंवा बाहेर चक्कर टाकतो. कोणाशी तरी काहीतरी बोलतो. पुन्हा एकदा डेस्कवर बांधून घेतो. संध्याकाळी (खरं तर रात्री) कधीतरी कंटाळा येतो. मग मी घरी जाण्यासाठी उठतो. घरी पोचतो. ऑफिसमध्ये काहीतरी खाल्लं असेल तर तसाच झोपतो, किंवा काहीतरी पोटात ढकलून झोपतो. अर्थात घरी पोचून आडवं होण्याच्या मध्ये जो वेळ असतो ना, तो टीव्ही, लॅपटॉप किंवा सेलवर घालवतो...

स्वत:कडे तटस्थतेनं पाहिलं तेव्हा जे दिसलं, ते हे होतं. मग लक्षात आलं, अरे, बऱ्याच दिवसांत आपण एखादं छानसं गाणं ऐकलेलं नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणत होतं, सारेगमपच्या लिटिल चॅम्प्समध्ये शमिका भिडेनं छान गाणं म्हटलं. "मी गाताना गीत तुला लडिवाळा...' अंगावर काटा आला... मग मी कसं ऐकलं नाही ते? मला का नाही जाणवलं असं काही? तर तेव्हा मी सेलवर मेसेज पाठवत होतो. मेसेज पाठवता पाठवता जे कानावर आलं, तेवढंच ऐकलं मी!

पूर्वी आपण मनाचा खूप विचार करायचो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल आणि अर्थातच स्वत:च्या मनाला पटेल की नाही. आजकाल आपण हा विचार विसरलोत का? का मन नावाची शरीरात कुठेही दाखविता न येणारी गोष्ट आपण विसरून गेलोत? किती दिवसांपूर्वी आपण शांतपणे बसून शेवटचं गाणं ऐकलंय? पूर्वीच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्यालाही अनेक महिने उलटून गेलेत. एखादी छान कथा वाचली नाही, की नाटकही पाहिलं नाही... खरंच, ऑफिस आणि घर... उरलेल्या वेळेत ऑनलाईन, एवढंच आयुष्य आहे का आपलं?

असं का झालंय?

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या गीतानं याविषयी प्रतिक्रिया पाठवली आहे. ती म्हणते, "अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाइन्स, घरच्या जबाबदाऱ्या, हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. सॉफ्टवेअरमध्ये मिळणारा पगार पाहून प्रत्येकाला इथं येण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे; पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आहे. एखादा संदीप क्षणात सगळं संपवतो, तर त्याच्यासारखे अनेक जण रोज थोडं थोडं मरत असतात.

प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून... सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्‍य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले रस्ते, डेडलाइन, ईएमआयचे चेक... असं का झालंय?'