वेदांपासून संतसाहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र "पह्यलं नमन' गणपतीला केलं जातं. आजही आपण सारेच गणेशवंदनाने कार्यारंभ करतो. ही प्रथा का पडली असावी? त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा? उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, ज्ञानोपासना, दूरदृष्टी, निर्णयक्षमता, लहानात लहान घटकाला सामावून घेण्याची, तसेच ज्येष्ठांचा आदर राखण्याची, त्यांचा सल्ला ऐकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा-उत्साह यांसारख्या गुणांचा त्यांनी विचार केला असेल का? या गोष्टींचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागतो का? कार्यारंभ उत्तम होणे म्हणजे पुढच्या यशाची शाश्वती असते का? चला... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू या!
कुठल्याही कार्याची सुरवात गणेशाच्या पूजनाने करण्याची प्रथा आहे. इतर धर्मीयांमध्ये गणेशाचे पूजन नाही; परंतु त्या त्या परंपरेनुसार प्रार्थना म्हणून कार्यारंभ केला जातो. सहज विचार केला तर या प्रथा परंपरांची कारणमीमांसा करता येते. कोणत्याही कार्याचा आरंभ शुभ घटनेने व्हावा, हीच यामागची इच्छा असते. नाटक किंवा वगाच्या सुरवातीलाच "पहिलं नमन इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळीला...' करतात. म्हणजे स्थानिक देवदेवता, प्रतिष्ठित नागरिक आणि अर्थातच जनताजनार्दन! हे असं पहिलं नमन केलं की काम करणं सुकर होतं, त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता अर्थातच अतिशय जास्त असते.
हा विचार आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवला आणि तशी प्रथा निर्माण केली. त्यांनी दाखविलेला हा रस्ता आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. "वेल बिगिनिंग इज हाफ डन' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ तोच. चांगली सुरवात म्हणजे निम्मं काम झाल्याची पावतीच असते! आता कंपनीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादं काम सुरू करताना गणेशपूजन किंवा प्रार्थना करणं शक्य नाही. आपल्या पूर्वसुरींना ते अपेक्षितही नाही. कार्याचा आरंभ गणेशपूजनानं करणं, या प्रथेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्यांनी गणेशाचीच निवड का केली असावी, इतर कोणतीही देवता का निवडली नसावी, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा; तर योग्य तो मार्ग दिसेल. यासाठी पुराण कथा थोड्या बाजूला ठेवाव्या लागतील.
गणेशाचं चरित्र पाहिलं की त्याचे गुण समोर येतात. एक तर ही देवता बुद्धीची आहे. बुद्धीबरोबरच नेतृत्व, संघटना बांधण्याचं सामर्थ्य, तीक्ष्ण आणि दूरदृष्टी, प्रसंगी मानापमान बाजूला ठेवण्याची क्षमता, प्रचंड उत्साह-ऊर्जा, उंदरासारख्या लहानातल्या लहान घटकाला सामावून आणि सांभाळून घेणं, खटासी खट आणि नटखटासी नटखट राहणं, ज्येष्ठांचा आदर करणं, त्याचबरोबर प्रसंग पाहून त्वरित निर्णय घेणं, आदी गुण आपल्याला गणपतीमध्ये दिसतात. कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी या गुणांची नितांत आवश्यकता असते.
उदाहरणच घ्यायचं तर कंपनीच्या एखाद्या "प्रोजेक्ट'चं घेता येईल. समजा एखाद्या कंपनीनं विशिष्ट वस्तू बनविण्याचं कंत्राट घेतलं आहे. हे कंत्राट वेळेवर आणि उत्तम दर्जाचं द्यायचं आहे. अशा वेळी कंपनी काय करते? आपल्याच कर्मचाऱ्यांपैकी काही जणांची या कामासाठी निवड करते. आता हा कार्यारंभ उत्तम होण्यासाठी तेथे गणेशाचं म्हणजे गणपतीच्या गुणांचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे. हे कसं शक्य होईल? तर संघाच्या निवडीपासून सुरवात केली पाहिजे. या संघातील सदस्यांना त्या कामाची पूर्ण माहिती, ज्ञान असणं गरजेचं आहे. फक्त माहिती असणं उपयोगाचं नाही तर ज्ञान असणं आवश्यक आहे. या सदस्यांमध्ये एकोपा पाहिजे, ते काम सांगितल्या वेळेत आणि दर्जानुसार पूर्ण करण्याची त्यांची मनोमन इच्छा हवी. (हॅ... काहीतरी करतात, आम्हाला विचारायला काय होतं? शक्य आहे का? उगाचच तोंडघशी पडणार आता... असा विचार करणारे नकोत. एक खराब आंबा टोपलीतले इतर आंबे नासवतो!) या संघाचं नेतृत्व अशाच एका कुशल कर्मचाऱ्याकडे किंवा संचालकाकडे द्यायला हवं. हा नेता सगळ्यांना सांभाळून घेणारा, प्रसंगी मानापमान दूर ठेवणारा हवा. त्याने अनुभवी लोकांच्या मताला मान दिला पाहिजे, त्याचबरोबर तो लहानातल्या लहान घटकाच्या सूचनाही लक्षपूर्वक ऐकणारा आणि त्याला मान देणारा हवा. या सर्व सूचना ऐकून त्याने गरजेप्रमाणे आवश्यक ते निर्णय पटापट घेतले पाहिजेत. त्याच वेळी असा निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्याने ओळखले पाहिजेत. काही निर्णय त्या वेळी तोटा करणारे वाटतात; परंतु पुढच्या काळात मात्र त्यांचा फायदाच होत असतो. नेता हा खटासी खट आणि नटखटासी नटखट असला पाहिजे. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेता स्वत: उत्साहाचं-ऊर्जेचं आगर हवा. त्याच्यामुळे त्याच्या गटातील सदस्यांना स्फूर्ती मिळते. तेही पडेल ते काम उत्साहाने करण्यास सरसावतात.
आता ते काम करण्यासाठी असा संघ तयार झाला, की निम्मं काम झाल्यासारखंच असतं. नंतर उरते ती कामाची औपचारिकता. त्यांना यश मिळालं की इतरही कर्मचारी अशा प्रकारे काम करण्यास पुढे येतात. ही मंडळी काम करत असताना एक वेगळाच उत्साह-ऊर्जा निर्माण झालेली असते. ती ऊर्जा इतर कर्मचाऱ्यांनाही जाणवत असते. या मंडळींची चर्चा, त्यांचा झपाटा पाहून इतर कर्मचाऱ्यांतही तो "माहोल' निर्माण होतो. मग त्या कामाशी संबंध असो वा नसो- प्रत्येकालाच ही "असाईनमेंट' पूर्ण झालीच पाहिजे, असं वाटू लागतं. आता इतके शुभेच्छुक आणि शुभेच्छा पाठीशी असल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे, नाही का?म्हणूनच महत्त्व आहे ते पहिल्या नमनाला, अशा अर्थाने गणेशाच्या पूजनाला. कर्मकांडात न गुंतता त्या त्या व्यक्तिविशेषाचा विचार करून मार्ग शोधला की उत्तर नक्की सापडतं. गणेशाचे हे गुण अंगी बाणवले की ती व्यक्ती उत्तम प्रशासक तर होतेच, परंतु त्या संघटनेच्या गळ्यातील ताईतही होते.
या गोष्टी सर्वांनाच लागू आहेत. केवळ कंपनीच्या कामकाजातच नाही, तर घरापासून इतर कोणत्याही कामापर्यंत "टीम लीडर'पासून "टीम मेंबर'पर्यंत सर्वच असा विचार करू शकतात. नव्हे, त्यांनी तो करावा. सध्याच्या राजकीय रणधुमाळीत तर कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत सर्वांनीच अशा तऱ्हेने विचार केल्यास आजचं राजकारणाचं चित्रच पालटून जाईल! येत्या गणेश जयंतीला अशा विचारांचं तोरण चढवलं तर ते गणपतीलाही निश्चित आवडेल.
पह्यलं नमन....
Posted by Abhijit at 11:02 PM
Sunday, September 7, 2008
तुला पाहिले मी...
Posted by Abhijit at 2:08 AM
Monday, August 25, 2008
तुला पाहिले मी
नदीच्या किनारी...
तुझे केस पाठीवरी मोकळे...
मस्त कविता आणि तिला तेवढाच मस्त साज... सुरेश वाडकरांचा आवाज... सगळं कसं छान जुळून आलंय...आणखी काय बोलणार यावर..."ऐकून तर पहा...' वर जा, क्लिक करा आणि अनुभवा...
आणखी एक संदीप...
Posted by Abhijit at 2:47 AM
Thursday, August 21, 2008
दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?
काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला फास लावून घेतला. आयटी क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्या या दोन घटना. संदीपच्या घटनेनंतर ब्लॉग, कम्युनिटीज आणि अर्थातच मीडियामध्ये चर्चा सुरू झाली होती. साऱ्या चर्चेचा सूर होता कशासाठी? उत्तम नोकरी असणाऱ्या, उत्तम पगार असणाऱ्या आणि अर्थातच पुढे चांगलं करिअर असणाऱ्या तरुणांनी आत्महत्या का करावी?
संदीपनं कारण दिलं होतं कामाचा ताण. सरोजकुमारच्या आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नाही. तरीही या दोन घटनांमध्ये एक सूत्र दिसून येतं, ते म्हणजे "हेच उत्तर...' अशी त्यांची झालेली धारणा. या दोघांचे प्रश्न इतके टोकाचे असतील का? खरं सांगायचं तर आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. मुळात प्रश्न किती मोठा आणि किती छोटा, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं.
संदीपच्या घटनेनंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊन स्वत:कडेच पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण फक्त धावत सुटलो आहोत. कुठे धावायचं, कुठपर्यंत धावायचं आणि किती धावायचं, हे माहितीच नाही! कधीतरी दम लागतो, कधीतरी कंटाळा येतो, मन सांगत राहतं; पण मी माझं मन, मेंदू आणि शरीर या साऱ्यांनाच फक्त पिटाळतो आहे. माझी लाइफस्टाईल पूर्ण बदलून गेली आहे. मी उठतो, आवरतो आणि ऑफिसला धावतो. तिथं काम करतो. मधे कधीतरी कॅंटीनकडे किंवा बाहेर चक्कर टाकतो. कोणाशी तरी काहीतरी बोलतो. पुन्हा एकदा डेस्कवर बांधून घेतो. संध्याकाळी (खरं तर रात्री) कधीतरी कंटाळा येतो. मग मी घरी जाण्यासाठी उठतो. घरी पोचतो. ऑफिसमध्ये काहीतरी खाल्लं असेल तर तसाच झोपतो, किंवा काहीतरी पोटात ढकलून झोपतो. अर्थात घरी पोचून आडवं होण्याच्या मध्ये जो वेळ असतो ना, तो टीव्ही, लॅपटॉप किंवा सेलवर घालवतो...
स्वत:कडे तटस्थतेनं पाहिलं तेव्हा जे दिसलं, ते हे होतं. मग लक्षात आलं, अरे, बऱ्याच दिवसांत आपण एखादं छानसं गाणं ऐकलेलं नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणत होतं, सारेगमपच्या लिटिल चॅम्प्समध्ये शमिका भिडेनं छान गाणं म्हटलं. "मी गाताना गीत तुला लडिवाळा...' अंगावर काटा आला... मग मी कसं ऐकलं नाही ते? मला का नाही जाणवलं असं काही? तर तेव्हा मी सेलवर मेसेज पाठवत होतो. मेसेज पाठवता पाठवता जे कानावर आलं, तेवढंच ऐकलं मी!
पूर्वी आपण मनाचा खूप विचार करायचो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल आणि अर्थातच स्वत:च्या मनाला पटेल की नाही. आजकाल आपण हा विचार विसरलोत का? का मन नावाची शरीरात कुठेही दाखविता न येणारी गोष्ट आपण विसरून गेलोत? किती दिवसांपूर्वी आपण शांतपणे बसून शेवटचं गाणं ऐकलंय? पूर्वीच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्यालाही अनेक महिने उलटून गेलेत. एखादी छान कथा वाचली नाही, की नाटकही पाहिलं नाही... खरंच, ऑफिस आणि घर... उरलेल्या वेळेत ऑनलाईन, एवढंच आयुष्य आहे का आपलं?
असं का झालंय?
एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या गीतानं याविषयी प्रतिक्रिया पाठवली आहे. ती म्हणते, "अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाइन्स, घरच्या जबाबदाऱ्या, हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. सॉफ्टवेअरमध्ये मिळणारा पगार पाहून प्रत्येकाला इथं येण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे; पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आहे. एखादा संदीप क्षणात सगळं संपवतो, तर त्याच्यासारखे अनेक जण रोज थोडं थोडं मरत असतात.
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून... सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले रस्ते, डेडलाइन, ईएमआयचे चेक... असं का झालंय?'
संदीपच्या निमित्तानं...
Posted by Abhijit at 10:49 PM
Sunday, August 17, 2008
७ ऑगस्ट २००८.
सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं.
घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ही बातमी झपाट्यानं सगळीकडे पसरली. आणि सुरू झाली न संपणारी चर्चा.
पुणे प्रतिबिंब या ब्लॉगवर आठ तारखेला एक पत्र पोस्ट करण्यात आलं होतं. पत्र संदीपलाच लिहिलं होतं. त्यात कामाचा ताण, मानसिक ओढाताण आणि त्यातून घडलेली ही घटना यासंबंधाने काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न केला होता. या पोस्टवर अनेक कॉमेंट्स आल्या. आटीयन्सपासून ते एक आई, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून, सामाजिक स्तरांमधून या प्रतिक्रिया उमटल्या. घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतंय; पण आता तेवढंच वाटून उपयोग नाही. या घटनेचा आता गांभीर्यानं विचार व्हायला हवा. मुळात कामाचा अतिताण, आजच्या भाषेत सांगायचं, तर वाढती "वर्क प्रेशर्स' हा मुद्दा आजपर्यंत अनेकदा चर्चिला गेला आहे. माध्यमांतून त्यावर विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत. खूप ताण येतोय, त्यामुळे आपण तुटत चाललो आहोत, हेही सगळ्यांना जाणवतंय. फक्त हा विषय आजच्यासारखा ऐरणीवर आला नव्हता. आत्महत्त्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतर मात्र, सगळ्यांचा आपल्याच ताणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलाय, हे आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.
तुटेपर्यंत ताणलंय
मुळात हा प्रश्न फक्त आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अतिशय वेगानं धावणाऱ्या या जगात ताण सगळ्यांच्याच बोकांडी बसले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात विलक्षण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकायचं आणि पुढेही जायचं अशी ही दुहेरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत साऱ्यांचाच कस पणाला लागतो. ही स्पर्धा म्हणजे चरक झालाय आणि आपण ऊस! सगळंच स्वत्व पिळून निघाल्यानंतर आपलं चिपाड होईल नाहीतर काय? आत्महत्त्येचा प्रसंग आताच घडला; पण आपण स्वत:ला तुटण्यापर्यंत ताणलंय, याची लक्षणं आधीपासूनच दिसायला लागली होती. घरात सतत होणारी चिडचिड, अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही तडकणारं डोकं, बऱ्याचदा जाणवणारा थकवा, डोकं दुखण्याचं वाढलेलं प्रमाण ही सारी याचीच तर लक्षणं होती. याविषयी सगळेच मानसोपचार तज्ज्ञ पोटतिडकीनं बोलत होतेच. आपण आतातरी जागं व्हायला हवं. आपलं स्वत:कडचं हे दुर्लक्ष अक्षम्यच आहे. याचे परिणाम आपण तर भोगतोच; पण आपल्या आजूबाजूच्यांनाही भोगायला लावतो. हे "पॅसिव्ह स्मोकिंग'सारखं आहे. सिगारेट आपण ओढायची आणि त्याचे भोग आपल्याबरोबरच इतरांनीही भोगायचे, अतुलची ही प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.
पण ताण असतोच!
ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी बहुतेक साऱ्यांनीच "आयटीमध्ये ताण असणारच' असा उल्लेख केला होता. एकानं नाव न देता प्रतिक्रिया दिली, "प्रेशर्स सगळ्यांवरच असतात. मॅनेजर्स आम्हाला अक्षरश: राबवून घेतात. पण त्यांनाही पर्याय नसतो. त्यांचे बॉसेस त्यांच्यावर दबाव आणतात आणि ते आमच्यावर. यातून कोणाचीही सुटका नसते. मला कधीकधी खूप राग येतो; पण काही पर्यायही नसतो.' ही प्रतिक्रियाही बोलकी आहे. ताण असणार हे यानं मान्य केलंय, फक्त काही पर्याय नाही, हे मात्र चूक आहे. कारण एकदा ताण घ्यावा लागणार आहे, हे मान्य केलं, की तो सोसायचा कसा, कमी कसा करायचा हेही शोधायलाच हवं ना? पण तसं घडताना मात्र दिसत नाही. कॅप्टन सुभाष हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आताच्या पिढीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाटतं. ते म्हणतात, "आजकालची हुषार तरुण पिढी जरी नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असली, तरी त्यांना पूर्वीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात ताणतणावाखाली, वेळीअवेळी आणि प्रोजेक्ट डेडलाइनच्या टांगत्या तलवारीखाली नोकऱ्या कराव्या लागतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही लॅपटॉपवर करण्यासाठी काम असतंच. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात अडकल्यामुळे इंटरनेट, आयपॉड, मोबाईल अशी वेगवेगळी गॅजेट्स सतत हाताळण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना एक क्षणही विश्रांती घ्यायला फुरसत नसते.'
वेळ काढलाय कधी?
सुभाष यांचं म्हणणं तुम्हा-आम्हालाही पटेल. आपण स्वत:साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत, असं कधीकधी वाटतं. ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो, त्यांना आपण किती वेळ देतो? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो. जाम धमाल करायचो. आता तसं जमतं? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत? आपल्या जिगरी दोस्ताला फोन, एस.एम.एस. आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत? आईसाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण? अर्थात, लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय? यादी काढायला गेलो, तर खूपसारे प्रश्न आहेत. व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील. हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत का? कधीतरी नक्कीच पडतात. काम करता करता आपण "कलिग'ला तसं म्हणतोही. "यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया... अब थोडासा ब्रेक चाहिये...' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं. आणि मुद्दा इथंच आहे.
योगा, मेडिटेशन...
मधे एक मेल फिरत होती सगळीकडे. अनेक मेलच्या गर्दीत ही लक्षात राहिली. कोणीतरी अनामिक व्यक्तीनं खूप छान लिहिलं होतं त्यात. "एच.आर. कडून मेल आला. अमुकअमुकचं काल हार्टफेलमुळे निधन झालं. इतक्या तरुण वयात हार्टफेल...' आपल्यापैकी काहींना आठवत असेल तो मेल. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच ही मेल सगळीकडे फिरत होती. फक्त झालं एवढंच आपण ती वाचली, थोडं हळहळलो आणि इतरांना फॉरवर्ड केली. "लंच टाईममध्ये' इतरांशी थोडी चर्चा केली. सध्या अशा चर्चांचा शेवट ठरलेल्या वाक्यांनी होतो, "मेडिटेशन आणि योगा इज अ मस्ट!' ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी २५ टक्के प्रतिक्रियांमध्ये हाही उल्लेख होता. आपल्यावर असणारे ताण, त्यामुळे होणारा त्रास या साऱ्यावर हे दोन उपाय म्हणजे रामबाण आहेत, असं काहीसं वाटतं आपल्याला. पण ते पूर्ण खरं नाही. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं. "योगा'च्या क्लासला जायचं आणि दिवसभर घाण्याला जुंपून घ्यायचं, यानं मन:शांती मिळत नाही. ती काही "डिस्प्रिन'नाही. "योगा' आणि "मेडिटेशन' हे मन:शांती देतील; पण त्यासाठी उरलेल्या दिवसाचं नियोजनही तसंच हवं. आजकाल आपला "डिस्प्रिन'वर जास्त विश्वास बसत चाललाय. गोळी घेतली, डोकेदुखी थांबली. मुळात डोकं का दुखत होतं, हे शोधायचे कष्ट आपण कोणीच करत नाही. आणि "योगा', "मेडिटेशन' आणि आयुर्वेद हे रोग शोधण्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास या क्लासेसना जाऊन उपयोग नसतो. या आधीच्या परिच्छेदात जे प्रश्न विचारलेत ना, त्याची उत्तरं आधी देता यायला हवी. आपल्या "लाईफ'मध्ये तसा बदल घडायला हवा. तरच या उपायांचा उपयोग होईल.
शेवट... नाही सुरवात
ब्लॉगवरील प्रतिक्रिया आणि त्यानिमित्तानं असलेला लेख हा काही उपदेश नाही. तो माझा आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या साऱ्यांत मीही येतोच ना! आपण सारेच धावत सुटलो आहोत. नक्की काय मिळवायचंय हे आपलं आपल्याशी निश्चित नाही. ठरवलेला "गोल अचिव्ह' केला, की आपण तिथं थोडा वेळ रेंगाळत नाही. यशाचा आनंदही साजरा करत नाही. कारण तिथं उभं राहिल्यानंतर आणखी पलिकडची गोष्ट दिसत असते. मग ती मिळविण्यासाठी आपण सारेच आटापिटा करतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण कुठवर धावायचं, का धावायचं हे स्वत:शीच निश्चित करायला हवं. ब्लॉगवर "मेसअप इन थॉट' अर्थात "वैचारिक गोंधळ' या नावानं एक प्रतिक्रिया आली आहे. त्याचं म्हणणं आहे, "आपण अशा प्रकारे विचार केला आणि तसं वागू लागलो, की कधीतरी वाटतं, आपण स्वत:ला बांधून घेत नाही ना? आणखी काही करण्याची, मिळविण्याची शक्यता असताना स्वत:वर बंधनं घालणं किती योग्य आहे?' मुद्दा चूक नाही; पण हे काय किमतीवर, हे वाक्य पुढे जोडायला हवं. फिरून फिरून तोच मुद्दा समोर येतो, किती ताणायचं? आपण मिळवत असलेला पैसा आपल्याला एंजॉय करता येत नसेल, ज्या पोटासाठी हे सारं करतो त्यात "मिळेल ते' ढकलावं लागत असेल, कुटुंबाबरोबर चार क्षण घालवता येणार नसतील, आपल्या "बच्चू'ला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार करण्यातली मजा लुटता येणार नसेल आणि मुख्य म्हणजे स्वत:साठीही वेळ देता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा कशासाठी? आजचे हे श्रम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न पुढे आरोग्यावरच खर्च करायचं आहे का?
सकाळी उठलो, रोजच्या व्यायाम केला, आन्हिकं आवरली, सगळ्यांबरोबर हसत-खेळत नाष्टा केला, ऑफिसला आलो, मस्तपैकी काम केलं, संध्याकाळी घरी पोचलो, पिलाला घेऊन बागेत गेलो, त्याच्याबरोबर चक्क फुगा खेळलो, रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसलो.... हा दिनक्रम आपल्याला नको असतो का? माझ्या या लेखाचा, खरंतर स्वगताच ा शेवट या सुंदर दिनक्रमाच्या सुंदर स्वप्नानंच होणं योग्य आहे. फक्त हे स्वप्न ?हे, ते लवकरात लवकर प्रत्यक्षात यावं, ही भाबडी वाटली, तरी योग्य आशा आहे. म्हणूनच संदीपच्या जिवाची किंमत मोजून सुरू झालेली ही चर्चा हा शेवट नाही. ती सुरवात आहे सुंदर भविष्याची!
प्रिय संदीप,
Posted by Abhijit at 10:40 PM
Thursday, August 7, 2008
काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?
काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...
मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...
अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...
तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.
बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...
आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्वास आहे.
आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...
तुझा
अभिजित
वारी, वारकरी
Posted by Abhijit at 2:40 AM
Saturday, June 28, 2008
पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भावभक्तीच्या आनंदानं कोंदून गेलाय. पांडुरंगाच्या समचरणी लीन होण्यासाठी आतुर झालाय. किमान एक हजार वर्षाची परंपरा असणारी ही वारी म्हणजे एक आश्चर्यच आहे. हजारो माणसं जमतात काय आणि एका शिस्तीत देहू, आळंदी ते पंढरपूर पायी जातात काय. बरं यासाठी कोणी कोणाला आमंत्रण धाडत नाही, की मानधनही देत नाही, तरीही इतकी वर्षे हा सोहळा त्याच शिस्तिनं चालू राहतो तरी कसा, असा आचंबा सध्याच्या काळात वाटतोच.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारी ती नैतिकतेची पाठशाळाच आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचं ज्ञानस्वरूप उभं केलं, तर भोळ्या भाविकांनी त्याचं भावदर्शन अनुभवलं. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात,
ज्ञानियांचे ज्ञेन, ध्यानियांचे ध्येय।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तु।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य।
योगियांचे गौप्य, परमधाम।
ते हे समचरण उभे विटेवरी।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप।।
ज्याला ज्ञानाने जाणायचं ते म्हणजे ज्ञेय, तर ध्यानानं गाठायचं आहे ते ध्येय. असं ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, तपस्वियांचं तप, जपकांचं जाप्य, योगियांचं गौप्य जिथे विटेवर समचरण उभं आहे, त्याला प्रेमानं आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे वारी.
परब्रह्माला साठवत विवेकाच्या दिशेनं होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल म्हणजे वारी. प्रत्येक क्रियेमध्ये साधन आणि साध्य या दोन बाजू असतात. साधनेनंच साध्य गाठायचं असतं. साधन आणि साधना खडतर असते, तर साध्य हे आनंदरूप. वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य हे दोनीही आनंदरूपच. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य, तर भक्तिरूप वाटचाल हे साधन. तुकोबा म्हणतात,
होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।
काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।
अभिमान नुरे। कोंड अवघेचि पुरे।
तुका म्हजे डोळा। विठो बैसला सावळा।
वारीचा भाव असतो, प्रेमभाव. वारीत चालता चालता द्वैत कधी संपते आणि अद्वैत कधी निर्माण होते, हे वारकऱ्यालाही कळत नाही. मी, माझं असा आपपर भावच शिल्लक राहात नाही. मग चालणारा माऊली, वाढणारा माऊली, पाहणारा माऊली, टाळ वाजवणारा माऊली असं होऊन जातं. तो विशाल जनसागर माऊली होऊन जातो आणि संथपणे वाहात राहतो प्रेमभाव. वारकरी विठ्ठलाला आईच्या, माऊलीच्या रूपात पाहतात. आई आणि लेकरं एकरूप झाली, की प्रेमाचा पान्हा फुटणारच ना... या प्रेमपान्ह्यात न्हात न्हात पावलं पुढे चालत राहतात. कधी फुगडी खेळत तर कधी रिंगण घालत... एकमेकांच्या पायी लागत, एकमेकांना आधार देत हा जनसागर आंदोळत पुढे चालत राहतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी शेकडो वर्षांपूर्वी मागितलेल्या भिक्षेचं मोल समजतं,
भिक्षेची ही झोळी। नामधर्म मेळी।
प्रेमाची आगळी। सोयरीक।
प्रेम द्यावी भिक्षा। प्रेम घ्यावी भिक्षा।
प्रेम हीच भिक्षा। द्यावी मज।।
वारी ही "पिकनिक' नाही. ती चिंतनशील जाणिवेचं अंतरंग उलगडणारी लोकशाळा आहे. स्टिफन कॅव्हेनं "सेव्हन हॅबिट्स' सांगितल्या आहेत. वारीने याआधी किमान हजार वर्षे पुढील सेव्हन हॅबिट्स सांगितलेल्या आहेत 1) माणसातल्या देवत्वाला ओळखून समता अंगी बाणवेन. 2) अभ्यासाशिवाय झोपणार नाही. 3) स्वीकारलेलं काम देवपूजा मानून करीन. 4) आई-वडील, गुरू-अतिथींचा मान राखेन. 5) समाजाला विधायक प्रकल्प देईन. 6) चारित्र्याला विठ्ठल समजेन. 7) कालमान ओळखून सद्वृत्तीने वागेन.
ही वारीची सप्तपदी आहे. आत्मप्रकाशाच्या लख्ख वाटांनी चालत चालत हे सारं आपण शिकायचं, समाजाला शिकवायचं, विश्वाला आपलेपणाचं नवं सार्थ भान द्यायचं. समाज एकात्म करायचा. यातून सामाजिक - सांस्कृतिक संचित समृद्ध करायचं, यासाठी देवाला भेटायचं ही कल्पना केवढी भव्य आहे!
पालखी कशासाठी? पालखी म्हणजे जीवनमूल्यांना विनम्र भावाने दिलेला उजाळा. "मी'पणा सोडून जीवनमूल्यं खांद्यावर घेऊन समाजविकासासाठी अथक प्रयत्न करण्याला "पालखीबरोबर जाणं' म्हणतात. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचं अंतिम मूल्य. नामदेव म्हणजे सगुण भक्ती. एकनाथ म्हणजे प्रपंचाचा आदर्श. तुकाराम म्हणजे सक्रिय नामसाधनेचा श्रेष्ठ आदर्श. ही सारी जीवनमूल्यं आजही गरजेची आहेत. ही सारी आमच्यासाठी पालखीत आहेत. ती आमच्यात रुजवायची आहेत किंवा ती आपल्याला प्रतिवर्षी नूतन करून घ्यायची आहेत. त्यासाठी पालखीबरोबर जायचं. माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवायचं. कारण मस्तक हे संस्कृतीचे पुस्तक आहे आणि पादुका या संपूर्ण व्यक्तित्त्वाचा प्राण आहे. म्हणून संतांच्या पायी लागून स्वत:ला "चार्ज' करून घ्यायचं. संतांचं अस्तित्व त्यांनी दिलेल्या मूल्यांत असतं. अशी मूल्यं समाजाच्या विकासाला उपयुक्त ठरतात. यातून जो "अवेअरनेस' येतो तो महत्त्वाचा असतो. साऱ्या संतांच्या पालख्या वाखरीच्या रिंगणात येतात. त्या वेळी संतांची नाती मानवाला नैतिक शिक्षण देतात. "सोपानकाका आले', "मुक्ताई-जनाई आल्या', "गोरोबा आले', "सावंतोबा-चोखोबा आले' याला केवढा व्यापक अर्थ आहे! "आले' या एका क्रियापदात सारे आले. संतत्वाचा सारा माहोल यामध्ये भावार्थ होऊन येतो. तो प्रतिमा बनतो. या प्रतिमा सांस्कृतिक अन्वयाला साह्य करतात. माणसामाणसातली नाती घट्ट आणि बोलकी होतात. त्या त्याला जगण्याचा वर्तमान देतात.
टाळ-पखवाजांच्या घोषातला माउलींचा गजर मनाला आश्वस्त करतो. माणसाला नवं बळ देतो, पुन्हा नवं सामर्थ्य देतो. याचं कारण माउलींनी दिलेले मार्दव; त्यांची विनयशीलता, त्यांची अहिंसा ही मूल्ये आजही वारीतून मिळतात.ज्ञानेश्वर माऊली या मार्गावर रंगले आणि गाऊ लागले,
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिही लोक।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया।।
वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली. ग्रंथातील अद्वैतता कृतीत आली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघा संसार सुखाचा झाला. या वारीत देव देवपण विसरतो. भक्त भक्तपण विसरतो. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचं रिंगण फुलतं. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो. देहाची इंद्रायणी शुद्ध होते. सोन्याचा मनपिंपळ सळसळतो, भीमातीर दाटू येतो. आत्मप्रभेतला विठ्ठल आलिंगतो अन् हात सहज जुळतात नि गातात "तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।'
Labels: Dyneshwar, lekh, Pandharpur, Tukaram, Vari
ड्रीमगर्लची जीवनगाथा
Posted by Abhijit at 3:24 AM
Monday, June 9, 2008
"पूर्वायुष्याचा तटस्थपणे विचार करण्याची तयारी असली, तरच आत्मकथन करण्यात अर्थ आहे...'' ड्रीम गर्ल हेमामालिनीची जीवनगाथा पुण्यातील अमेय प्रकाशनने मराठीत आणली आहे. त्यातील निवडक उताऱ्यांचे वाचन ई-सकाळवर ऐकायला मिळतं.
Labels: Books
