ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.
दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.
घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...
कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...
बिन पैशाचा दिवस
Posted by Abhijit at 10:45 PM
Wednesday, June 4, 2008
Labels: lifestyle
पेट्रोल वाढले... आता काय?
Posted by Abhijit at 3:11 AM
पेट्रोल वाढले, तर काय... याविषयीची एक भन्नाट क्लिप मला एकाने परवा मेल केली. ती इथे टाकतोय... आता आपल्यालाही हाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे...
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय...
Posted by Abhijit at 11:53 PM
Tuesday, June 3, 2008
काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?
दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम म्हणून इंटरनेट आणि मोबाईलकडे पाहायला हवं. टीव्ही हा एक स्वतंत्र विषय आहे. जाता जाता सांगतो. आजकाल, म्हणजे साधारणपणे महिन्याभरापासून मी संध्याकाळी टीव्ही पाहणं बंद केलंय. सकाळी एखादा तास पाहतो. तेही बातम्या आणि डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिकवर काही कार्यक्रम असेल तर तो. माझ्या आयुष्यात तरी काही फरक पडलेला नाही. आणि पडलाच असेल, तर तो चांगला. ऑफिसमधून घरी गेलं, की लेकीला घेऊन फिरायला जातो. आम्ही प्रचंड दंगा करतो. अंधार पडला, की गच्चीवर जाऊन खेळतो. नऊच्या सुमारास मी वाचत बसतो. संध्याकाळी सात ते दहा या तीन तासांचा इतका चांगला उपयोग टीव्ही पाहताना कधीच झाला नव्हता.असो, हा मुद्दा वेगळा आहे. तर मी बोलत होतो मोबाईल आणि इंटरनेटबाबत. या दोन्ही गोष्टी आपल्या खूप काही देणाऱ्या आहेत. आताही मला व्यक्त होण्यासाठी मी इंटरनेटचाच आधार घेतोय. पण सीमारेषा आखायलाच हवी ना! मला स्वत:वरूनच एक जाणवलं. आपण बऱ्याचदा वाहावत जातो. एक झालं की दुसरं असं करत जातो. मला काय करायचं आहे, हे एकदा डोक्यात स्पष्ट असलं, की सारेच मुद्दे संपतात...
Labels: lifestyle
पाऊस आला....
Posted by Abhijit at 6:01 AM
आपण सारे ज्याची मनापासून वाट पाहात होतो, तो पाऊस आज, मंगळवारी आला. आला कसला, जो काही थोडा वेळ होता, तो कोसळलाच! पावसाचं आगमन अगदी वाजत गाजत झालंय...आता कसं गार वाटतंय....
ऐकून तर पाहा...
Posted by Abhijit at 11:47 PM
Monday, June 2, 2008
हा एक नवा प्रयत्न. उत्तम कांबळे यांच्या आई समजून घेताना या पुस्तकातल्या काही प्रकरणांचं हे वाचन. ई-सकाळवर हे याआधी प्रकाशीत झालं आहे. सगळ्यात उजव्या हाताला ऐकून तर पाहा... या शीर्षकाखाली हे रेकॉर्डिंग आहे. एक क्लिक करा आणि ऐका...
थोडं समजून घ्यायला हवं ना?
Posted by Abhijit at 10:16 PM
माणसं समजून घेत नाहीत, याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. आपण काहीतरी चांगल्यासाठी करायला जावं, आणि तेच त्यांच्या दृष्टीनं वाईट ठरावं, यासारखं दु:ख नाही. एका हेतूनं करावं आणि तोच वाईट ठरावा.... माणसं समजून का घेत नाहीत? काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. त्या समजून घ्यायच्या असतात, हेसुद्धा समजावून सांगावं लागावं? खरंच डोकं बधीर होऊन जातं.
आपल्या चुका होत नाहीत, असंही नाही. चुका तर होतातच. अर्थात त्यापेक्षा मोठी चूक होऊ नये, याची आपण काळजी घेतच असतो ना... एखादी गोष्ट आत्ता सोपी वाटते. हवीहवीशी वाटते; पण तेव्हाचा तो मोह भविष्यासाठी घातक ठरू शकणारा असतो, हे आपण पाहतो. तो टाळण्याचा प्रयत्न करतो, हे चूक असतं का?मला वाटतं भविष्याच्या विचाराऐवजी क्षणिक मोहाचा पगडा खूपच मोठा असतो. आजच्या काळात हा विचार किती चालेल ते महित नाही. आजचा दिवस जगून घ्या... हेही तेवढंच खरं आहे. पण जगून घ्या, म्हणजे काय करा, इथं खरा मुद्दा येतो. गेला क्षण गेला, येणारा क्षण माझा, ही संकल्पनाही उत्तम. पण येणाऱ्या क्षणात कसं वागायचं, हे आपण ठरवू शकतो ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेलेला क्षण येणाऱ्या क्षणावर आपली छाप उमटवूनच जात असतो, त्याचं काय? आपल्याकडे ना थोडी गडबड झालीये. एकतर अगदी पारंपरिक किंवा अति आधुनिक. अर्थात अजूनही अति आधुनिक नाही, पण त्याकडे धावायचा प्रयत्न सुरू आहे. तर मुद्दा हाच आहे. पारंपरिक आणि अति आधुनिक याच्या मधला मार्ग काय? दोन्हीतलं चांगलं घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही का? तसं झालं, तर कितीतरी प्रश्न सुटतील...
Labels: mind, relationship
मी, बायको आणि भांडण...
Posted by Abhijit at 3:45 AM
काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशोबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील, पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू माझ्याशी... काय झालंय मलाच समजत नाही...
ऐकून मीच हादरलो. मी तर अजिबात भांडकुदळ नाही. मला रागही खूप कमी येतो, असं मी समजत होतो. कालच्या चर्चेनं थोडासा अंतर्मुख की काय म्हणतात, तो झालो. मग लक्षात आलं, आजकाल खरोखरच खटके जरा जास्तच उडायला लागले आहेत. तिला कळत नाही, आता हे बोलायलाच हवं का, तिला कुठे काय बोलावं हेच समजत नाही, असं काहीसं वाटत असतं मला. आणि दरवेळी खटका उडाल्यानंतर ती तेव्हा तशी का वागली, हे उशीरानं लक्षात येतं आणि स्वत:चीच चूक जाणवत राहते...तोंड उघडायच्या आधी या गोष्टी का जाणवत नाहीत, हेच समजत नाही. दुसरी बाजू का दिसत नाही? आधी आपण तोंड चालवून मोकळं व्हायचं... नंतर चूक लक्षात येते. तेव्हाही लगेच सॉरी वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीच आपल्याकडे... कधी सुधारणार आहे मी... अक्षरश: हताश झालो मी. आता मात्र सुधारायचं ठरवलंय... आधी ऑफिसमधले, बाहेरचे ताण-तणाव, ओढाताण असे सगळे पर्याय आणि कारणं स्वत:लाच देऊन झालीत. पण ती सारी स्वत:च्याच मनाची समजूत आहे, हे लक्षात आलंय. आपलं वागणं चुकतंय, आपणच सुधारायला हवं, हेच खरं...
Labels: lekh, relationship
