पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भावभक्तीच्या आनंदानं कोंदून गेलाय. पांडुरंगाच्या समचरणी लीन होण्यासाठी आतुर झालाय. किमान एक हजार वर्षाची परंपरा असणारी ही वारी म्हणजे एक आश्चर्यच आहे. हजारो माणसं जमतात काय आणि एका शिस्तीत देहू, आळंदी ते पंढरपूर पायी जातात काय. बरं यासाठी कोणी कोणाला आमंत्रण धाडत नाही, की मानधनही देत नाही, तरीही इतकी वर्षे हा सोहळा त्याच शिस्तिनं चालू राहतो तरी कसा, असा आचंबा सध्याच्या काळात वाटतोच.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारी ती नैतिकतेची पाठशाळाच आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचं ज्ञानस्वरूप उभं केलं, तर भोळ्या भाविकांनी त्याचं भावदर्शन अनुभवलं. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात,
ज्ञानियांचे ज्ञेन, ध्यानियांचे ध्येय।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तु।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य।
योगियांचे गौप्य, परमधाम।
ते हे समचरण उभे विटेवरी।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप।।
ज्याला ज्ञानाने जाणायचं ते म्हणजे ज्ञेय, तर ध्यानानं गाठायचं आहे ते ध्येय. असं ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, तपस्वियांचं तप, जपकांचं जाप्य, योगियांचं गौप्य जिथे विटेवर समचरण उभं आहे, त्याला प्रेमानं आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे वारी.
परब्रह्माला साठवत विवेकाच्या दिशेनं होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल म्हणजे वारी. प्रत्येक क्रियेमध्ये साधन आणि साध्य या दोन बाजू असतात. साधनेनंच साध्य गाठायचं असतं. साधन आणि साधना खडतर असते, तर साध्य हे आनंदरूप. वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य हे दोनीही आनंदरूपच. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य, तर भक्तिरूप वाटचाल हे साधन. तुकोबा म्हणतात,
होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।
काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।
अभिमान नुरे। कोंड अवघेचि पुरे।
तुका म्हजे डोळा। विठो बैसला सावळा।
वारीचा भाव असतो, प्रेमभाव. वारीत चालता चालता द्वैत कधी संपते आणि अद्वैत कधी निर्माण होते, हे वारकऱ्यालाही कळत नाही. मी, माझं असा आपपर भावच शिल्लक राहात नाही. मग चालणारा माऊली, वाढणारा माऊली, पाहणारा माऊली, टाळ वाजवणारा माऊली असं होऊन जातं. तो विशाल जनसागर माऊली होऊन जातो आणि संथपणे वाहात राहतो प्रेमभाव. वारकरी विठ्ठलाला आईच्या, माऊलीच्या रूपात पाहतात. आई आणि लेकरं एकरूप झाली, की प्रेमाचा पान्हा फुटणारच ना... या प्रेमपान्ह्यात न्हात न्हात पावलं पुढे चालत राहतात. कधी फुगडी खेळत तर कधी रिंगण घालत... एकमेकांच्या पायी लागत, एकमेकांना आधार देत हा जनसागर आंदोळत पुढे चालत राहतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी शेकडो वर्षांपूर्वी मागितलेल्या भिक्षेचं मोल समजतं,
भिक्षेची ही झोळी। नामधर्म मेळी।
प्रेमाची आगळी। सोयरीक।
प्रेम द्यावी भिक्षा। प्रेम घ्यावी भिक्षा।
प्रेम हीच भिक्षा। द्यावी मज।।
वारी ही "पिकनिक' नाही. ती चिंतनशील जाणिवेचं अंतरंग उलगडणारी लोकशाळा आहे. स्टिफन कॅव्हेनं "सेव्हन हॅबिट्स' सांगितल्या आहेत. वारीने याआधी किमान हजार वर्षे पुढील सेव्हन हॅबिट्स सांगितलेल्या आहेत 1) माणसातल्या देवत्वाला ओळखून समता अंगी बाणवेन. 2) अभ्यासाशिवाय झोपणार नाही. 3) स्वीकारलेलं काम देवपूजा मानून करीन. 4) आई-वडील, गुरू-अतिथींचा मान राखेन. 5) समाजाला विधायक प्रकल्प देईन. 6) चारित्र्याला विठ्ठल समजेन. 7) कालमान ओळखून सद्वृत्तीने वागेन.
ही वारीची सप्तपदी आहे. आत्मप्रकाशाच्या लख्ख वाटांनी चालत चालत हे सारं आपण शिकायचं, समाजाला शिकवायचं, विश्वाला आपलेपणाचं नवं सार्थ भान द्यायचं. समाज एकात्म करायचा. यातून सामाजिक - सांस्कृतिक संचित समृद्ध करायचं, यासाठी देवाला भेटायचं ही कल्पना केवढी भव्य आहे!
पालखी कशासाठी? पालखी म्हणजे जीवनमूल्यांना विनम्र भावाने दिलेला उजाळा. "मी'पणा सोडून जीवनमूल्यं खांद्यावर घेऊन समाजविकासासाठी अथक प्रयत्न करण्याला "पालखीबरोबर जाणं' म्हणतात. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचं अंतिम मूल्य. नामदेव म्हणजे सगुण भक्ती. एकनाथ म्हणजे प्रपंचाचा आदर्श. तुकाराम म्हणजे सक्रिय नामसाधनेचा श्रेष्ठ आदर्श. ही सारी जीवनमूल्यं आजही गरजेची आहेत. ही सारी आमच्यासाठी पालखीत आहेत. ती आमच्यात रुजवायची आहेत किंवा ती आपल्याला प्रतिवर्षी नूतन करून घ्यायची आहेत. त्यासाठी पालखीबरोबर जायचं. माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवायचं. कारण मस्तक हे संस्कृतीचे पुस्तक आहे आणि पादुका या संपूर्ण व्यक्तित्त्वाचा प्राण आहे. म्हणून संतांच्या पायी लागून स्वत:ला "चार्ज' करून घ्यायचं. संतांचं अस्तित्व त्यांनी दिलेल्या मूल्यांत असतं. अशी मूल्यं समाजाच्या विकासाला उपयुक्त ठरतात. यातून जो "अवेअरनेस' येतो तो महत्त्वाचा असतो. साऱ्या संतांच्या पालख्या वाखरीच्या रिंगणात येतात. त्या वेळी संतांची नाती मानवाला नैतिक शिक्षण देतात. "सोपानकाका आले', "मुक्ताई-जनाई आल्या', "गोरोबा आले', "सावंतोबा-चोखोबा आले' याला केवढा व्यापक अर्थ आहे! "आले' या एका क्रियापदात सारे आले. संतत्वाचा सारा माहोल यामध्ये भावार्थ होऊन येतो. तो प्रतिमा बनतो. या प्रतिमा सांस्कृतिक अन्वयाला साह्य करतात. माणसामाणसातली नाती घट्ट आणि बोलकी होतात. त्या त्याला जगण्याचा वर्तमान देतात.
टाळ-पखवाजांच्या घोषातला माउलींचा गजर मनाला आश्वस्त करतो. माणसाला नवं बळ देतो, पुन्हा नवं सामर्थ्य देतो. याचं कारण माउलींनी दिलेले मार्दव; त्यांची विनयशीलता, त्यांची अहिंसा ही मूल्ये आजही वारीतून मिळतात.ज्ञानेश्वर माऊली या मार्गावर रंगले आणि गाऊ लागले,
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिही लोक।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया।।
वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली. ग्रंथातील अद्वैतता कृतीत आली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघा संसार सुखाचा झाला. या वारीत देव देवपण विसरतो. भक्त भक्तपण विसरतो. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचं रिंगण फुलतं. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो. देहाची इंद्रायणी शुद्ध होते. सोन्याचा मनपिंपळ सळसळतो, भीमातीर दाटू येतो. आत्मप्रभेतला विठ्ठल आलिंगतो अन् हात सहज जुळतात नि गातात "तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।'
वारी, वारकरी
Posted by Abhijit at 2:40 AM
Saturday, June 28, 2008
Labels: Dyneshwar, lekh, Pandharpur, Tukaram, Vari
ड्रीमगर्लची जीवनगाथा
Posted by Abhijit at 3:24 AM
Monday, June 9, 2008
"पूर्वायुष्याचा तटस्थपणे विचार करण्याची तयारी असली, तरच आत्मकथन करण्यात अर्थ आहे...'' ड्रीम गर्ल हेमामालिनीची जीवनगाथा पुण्यातील अमेय प्रकाशनने मराठीत आणली आहे. त्यातील निवडक उताऱ्यांचे वाचन ई-सकाळवर ऐकायला मिळतं.
Labels: Books
माझी तिखट गोड खाद्ययात्रा...
Posted by Abhijit at 11:08 PM
Sunday, June 8, 2008
आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांचाही शोध घेतला गेला. ब्लॉगच्या निमित्तानं या साऱ्याला उजाळा देण्याची संधी मिळते आहे.
खाण्याची आवड असली, तरी स्वयंपाकाबाबत कायमचा कंटाळा! म्हणजे बॅचलर असतानाही "चहा' या विषयापुढे धाव गेली नाही. कधीकधी मेसचा कंटाळा आला, तर मित्रांनी मिळून केलेले भाताचे विविध प्रकार! (लावलेली वाट...) आणि शोधलेले शॉर्टकट. सहज आठवलं. मी बेळगावला असताना नारळाची बर्फी करायचं ठरवलं! कृती अगदी सोपी वाटली. नारळ खोवायचा, साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यात खोवलेला नारळ घालायचा, ते मिश्रण आटवायचं आणि ताटात पसरून थंड करायचं! आहे काय त्यात? (त्यावेळी लग्नं झालं होतं. त्यामुळे एवढी आयुधं घरात होती; पण बायको पुण्याला आल्यानं आम्ही बॅचलरच होतो.) मी तयारीला लागलो. नारळ खोवण्याची माझी स्टाईल पाहून एक मित्र मदतीला धावला. मग आम्ही दोघांनी मिळून तीन नारळ खोवले. अर्धा किलो साखर गॅसवर ठेवली. जळाल्याचा वास आल्यानंतर त्यात पाणीही घालायचं असतं हे समजलं. (च्यायला ***, नीट वाचायला काय होतं तुला? इति मित्र) एकदाचा पाक झाला. त्यात नारळ घातला. आम्ही पिक्चर बघत पसरलो. होता होता तीन एक तास झाले. मिश्रण काही घट्ट होईना. आता गॅस संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली. अखेरीस चार तासांनंतर ते मिश्रण गॅसवरून उतरविण्यात आले. ताटात घालून थंड करण्यासाठी ठेवण्यात आले. (मरूदे... बघू गार झाल्यावर!) दोन दिवसांनंतरही ते तसंच थबथबीत होतं! या अनुभवावरून लक्षात आलं असेलंच, की आमचा करण्यापेक्षा खाण्यावर भर.
काल याच विषयावर विचार करता करता लक्षात आलं. (मी विचार करतो...!) ही खाद्ययात्रा शाळेपासूनच सुरू झाली. मी आधी नवीन मराठी (पहिली ते चौथी), नंतर रमणबाग. त्यातील नवीन मराठी सोडून देऊ. रमणबागेच्या बाहेर सूर्यकांत कुल्फी, उन्हाळ्यात काकडी, शाळेच्या बाहेर कॉर्नरला असलेल्या बेकरीतला क्रिमरोल आणि चौकात समोर असलेल्या दवे स्वीटमार्टमधले सामोसे (सध्या तिथे बेकरी नाही. कुल्फी आणि समोसे मिळतात. त्यांची चव अजूनही तशीच आहे.) अशी खाद्ययात्रा सुरू झाली. तिचा प्रवास आता "स्टार्टर' (पक्षी : चकणा. यातही खूप सुंदर प्रकार आहेत, आठवताहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) पर्यंत येऊन ठेपलाय.
याच प्रवासाच्या सुग्रास आठवणींमध्ये मी रमणार आहे, तेही तुम्हाला बरोबर घेऊन. (काय दिवस आलेत.... असं वाटलं ना?) ही फक्त खाद्य यात्रा नाही. त्याबरोबर तिथल्या आठवणी, वातावरण यांचाही वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न. मधेमधे काही पदार्थांच्या समजलेल्या रेसिपिज. (बर्फीसारख्या नाहीत!) आता इथेच थांबतो. बाकीचं पुन्हा केव्हा तरी...
भय इथले ...
Posted by Abhijit at 1:04 AM
Friday, June 6, 2008
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते...
ते झरे चंद्र सजणांचे
ही धरतीभगवी माया
झाडांसी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया...
- ग्रेस
मला हे गाणं सापडलं नेटवरच! साऱ्यांनीच आस्वाद घ्यायला हवा, म्हणून ऐकून तर पहा... मध्ये टाकलंय। नक्की ऐका...
Labels: poem
फक्त थोडा वेळ...
Posted by Abhijit at 11:24 PM
Thursday, June 5, 2008
एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले."
"पण का?''
"'सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
"भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्चितच फरक पडू शकतो. परमेश्वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''
या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, "त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.
''व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.
आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.
Labels: lifestyle
बिन पैशाचा दिवस
Posted by Abhijit at 10:45 PM
Wednesday, June 4, 2008
ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.
दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.
घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...
कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...
Labels: lifestyle
पेट्रोल वाढले... आता काय?
Posted by Abhijit at 3:11 AM
पेट्रोल वाढले, तर काय... याविषयीची एक भन्नाट क्लिप मला एकाने परवा मेल केली. ती इथे टाकतोय... आता आपल्यालाही हाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे...
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय...
Posted by Abhijit at 11:53 PM
Tuesday, June 3, 2008
काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?
दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम म्हणून इंटरनेट आणि मोबाईलकडे पाहायला हवं. टीव्ही हा एक स्वतंत्र विषय आहे. जाता जाता सांगतो. आजकाल, म्हणजे साधारणपणे महिन्याभरापासून मी संध्याकाळी टीव्ही पाहणं बंद केलंय. सकाळी एखादा तास पाहतो. तेही बातम्या आणि डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिकवर काही कार्यक्रम असेल तर तो. माझ्या आयुष्यात तरी काही फरक पडलेला नाही. आणि पडलाच असेल, तर तो चांगला. ऑफिसमधून घरी गेलं, की लेकीला घेऊन फिरायला जातो. आम्ही प्रचंड दंगा करतो. अंधार पडला, की गच्चीवर जाऊन खेळतो. नऊच्या सुमारास मी वाचत बसतो. संध्याकाळी सात ते दहा या तीन तासांचा इतका चांगला उपयोग टीव्ही पाहताना कधीच झाला नव्हता.असो, हा मुद्दा वेगळा आहे. तर मी बोलत होतो मोबाईल आणि इंटरनेटबाबत. या दोन्ही गोष्टी आपल्या खूप काही देणाऱ्या आहेत. आताही मला व्यक्त होण्यासाठी मी इंटरनेटचाच आधार घेतोय. पण सीमारेषा आखायलाच हवी ना! मला स्वत:वरूनच एक जाणवलं. आपण बऱ्याचदा वाहावत जातो. एक झालं की दुसरं असं करत जातो. मला काय करायचं आहे, हे एकदा डोक्यात स्पष्ट असलं, की सारेच मुद्दे संपतात...
Labels: lifestyle
पाऊस आला....
Posted by Abhijit at 6:01 AM
आपण सारे ज्याची मनापासून वाट पाहात होतो, तो पाऊस आज, मंगळवारी आला. आला कसला, जो काही थोडा वेळ होता, तो कोसळलाच! पावसाचं आगमन अगदी वाजत गाजत झालंय...आता कसं गार वाटतंय....
ऐकून तर पाहा...
Posted by Abhijit at 11:47 PM
Monday, June 2, 2008
हा एक नवा प्रयत्न. उत्तम कांबळे यांच्या आई समजून घेताना या पुस्तकातल्या काही प्रकरणांचं हे वाचन. ई-सकाळवर हे याआधी प्रकाशीत झालं आहे. सगळ्यात उजव्या हाताला ऐकून तर पाहा... या शीर्षकाखाली हे रेकॉर्डिंग आहे. एक क्लिक करा आणि ऐका...
थोडं समजून घ्यायला हवं ना?
Posted by Abhijit at 10:16 PM
माणसं समजून घेत नाहीत, याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. आपण काहीतरी चांगल्यासाठी करायला जावं, आणि तेच त्यांच्या दृष्टीनं वाईट ठरावं, यासारखं दु:ख नाही. एका हेतूनं करावं आणि तोच वाईट ठरावा.... माणसं समजून का घेत नाहीत? काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. त्या समजून घ्यायच्या असतात, हेसुद्धा समजावून सांगावं लागावं? खरंच डोकं बधीर होऊन जातं.
आपल्या चुका होत नाहीत, असंही नाही. चुका तर होतातच. अर्थात त्यापेक्षा मोठी चूक होऊ नये, याची आपण काळजी घेतच असतो ना... एखादी गोष्ट आत्ता सोपी वाटते. हवीहवीशी वाटते; पण तेव्हाचा तो मोह भविष्यासाठी घातक ठरू शकणारा असतो, हे आपण पाहतो. तो टाळण्याचा प्रयत्न करतो, हे चूक असतं का?मला वाटतं भविष्याच्या विचाराऐवजी क्षणिक मोहाचा पगडा खूपच मोठा असतो. आजच्या काळात हा विचार किती चालेल ते महित नाही. आजचा दिवस जगून घ्या... हेही तेवढंच खरं आहे. पण जगून घ्या, म्हणजे काय करा, इथं खरा मुद्दा येतो. गेला क्षण गेला, येणारा क्षण माझा, ही संकल्पनाही उत्तम. पण येणाऱ्या क्षणात कसं वागायचं, हे आपण ठरवू शकतो ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेलेला क्षण येणाऱ्या क्षणावर आपली छाप उमटवूनच जात असतो, त्याचं काय? आपल्याकडे ना थोडी गडबड झालीये. एकतर अगदी पारंपरिक किंवा अति आधुनिक. अर्थात अजूनही अति आधुनिक नाही, पण त्याकडे धावायचा प्रयत्न सुरू आहे. तर मुद्दा हाच आहे. पारंपरिक आणि अति आधुनिक याच्या मधला मार्ग काय? दोन्हीतलं चांगलं घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही का? तसं झालं, तर कितीतरी प्रश्न सुटतील...
Labels: mind, relationship
मी, बायको आणि भांडण...
Posted by Abhijit at 3:45 AM
काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशोबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील, पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू माझ्याशी... काय झालंय मलाच समजत नाही...
ऐकून मीच हादरलो. मी तर अजिबात भांडकुदळ नाही. मला रागही खूप कमी येतो, असं मी समजत होतो. कालच्या चर्चेनं थोडासा अंतर्मुख की काय म्हणतात, तो झालो. मग लक्षात आलं, आजकाल खरोखरच खटके जरा जास्तच उडायला लागले आहेत. तिला कळत नाही, आता हे बोलायलाच हवं का, तिला कुठे काय बोलावं हेच समजत नाही, असं काहीसं वाटत असतं मला. आणि दरवेळी खटका उडाल्यानंतर ती तेव्हा तशी का वागली, हे उशीरानं लक्षात येतं आणि स्वत:चीच चूक जाणवत राहते...तोंड उघडायच्या आधी या गोष्टी का जाणवत नाहीत, हेच समजत नाही. दुसरी बाजू का दिसत नाही? आधी आपण तोंड चालवून मोकळं व्हायचं... नंतर चूक लक्षात येते. तेव्हाही लगेच सॉरी वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीच आपल्याकडे... कधी सुधारणार आहे मी... अक्षरश: हताश झालो मी. आता मात्र सुधारायचं ठरवलंय... आधी ऑफिसमधले, बाहेरचे ताण-तणाव, ओढाताण असे सगळे पर्याय आणि कारणं स्वत:लाच देऊन झालीत. पण ती सारी स्वत:च्याच मनाची समजूत आहे, हे लक्षात आलंय. आपलं वागणं चुकतंय, आपणच सुधारायला हवं, हेच खरं...
Labels: lekh, relationship